मनं उवाच...

Saturday, 31 December 2016

वर्ष २०१६ सरताना.....

ट्रेन मध्ये अचानक आलेली चक्कर....सतत अस्वस्थ वाटणं...शाळेत प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्यावर .. इतकं कौतुक होत असतानाही आनंद न वाटता उलट रडायला आलं.. 2016 सुरु झालं .... आणि एका मागून एक  विपरीत गोष्टी झाल्या...आणि जाणवलं... आयुष्य ट्रॅक वर राहिलेलं नाही.... गडबड होतेय..... नकारात्मक विचार भोवती येतात..पटकन डोळ्यात पाणी येत.. लोकांची भीती वाटत होती..विश्वास ठेवता येत नाही....गुदमरायला होत होत..पण मार्ग सापडत नव्हता...... डोक्यात विचारांची वारूळ....
  जवळचे सांगत होते  Councillor ला एकदा भेट पण मनाची तयारी नव्हती की आपल्याला Professional मदतीची गरज आहे!

शेवटी नाकात पाणी जातंय असं वाटू लागलं आणि मार्च मध्ये Councillor कडे गेले... दररोज दीड तास सेशन सुरु झाले...बोलायला सुरुवात केली.... लोक आपल्या पुढे जात आहेत ... आपण मागे पडत चाललोय ही भीती... इतरांसाठी काही गोष्टी पटकन easily होतात..आणि आपल्याला ती एक गोष्ट धड जमत नाही... आपण Failure आहोत... करियर आणि खासगी आयुष्यात दोन्हीकडे failure आहोत... सगळं हातातून निसटून जातंय.... Councillor शांतपणे ऐकून घ्यायचा... आयुष्यात घडलेले प्रसंग....तेव्हा काय वाटलं.. आता काय वाटत... प्रश्न विचारायचा..
 कधी कधी दीड तास नुसता रडण्याचा कार्यक्रम सुरु होता...

  स्वतः मध्ये असलेले न्यूनगंड , मनाची तयारी नसताना अचानक गमावलेले लोक... Heal न होता राहिलेल्या जखमा.... self respect वर झालेले आघात... अनेक गोष्टी... सगळ्या insecurities..... Councillor ने एक एक प्रश्न सोडवला.... डोक्यात उडालेला गोंधळ दूर केला.....शांत बसून नुसतं श्वास घ्यायला शिकवलं... आपण करत असलेल्या कामाला कोणाच्या Certificate ची गरज नाही समजवल.... नाती संपतात दरवेळी Closure मिळत नाही... Its ok....दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला पाहणं थांबव.... दुनिया गेली खड्ड्यात.... तुला जे हवं ते कर... हवं तसं कर... सगळे वाईट नसतात.... विश्वास ठेवायला शिक... अशा अनेक गोष्टी शिकवल्या.... महत्वाचं म्हणजे स्वतःचा आदर कर... तुम्ही काय काम करता ,कोणत्या पदावर आहात याने काडीचा फरक पडत नाही... तुमचं कर्तृत्व याने ठरत नाही....आदर आणि प्रेम हे तुम्ही कोणत्या पदावर आणि काम करता यावर अवलंबून नसतं.. कोणी आयुष्यात पुढे गेल असं नसत... प्रत्येकाचा वेग असतो.. प्रत्येकच Destination वेगळं असत... स्वतःचा वेळ घे.... हवे तस चालत रहा... वाटलं तर बसून रहा... यात चुकीचं नाही....पण हा प्रवास enjoy कर....तुला जे हवं तेच कर.... 

ज्या अंधाऱ्या खोलीत मी इतकी वर्षे लपून होते..त्या खोलीतून Councillor ने बाहेर काढलं.. मस्त सूर्यप्रकाशात उभं केलं.. माणूस म्हणून आपण स्पेशल आहोत... सुंदर आहोत हे फील करायला शिकवलं....

.. ठरवून नवीन नवीन मित्र मैत्रिणी भेटायला लागले..अशांना ज्यांना मी कुठे काम करते... काय करते याच्याशी देणं घेणं नाही... नुसत्या गप्पा मारल्या... वाह्यात गप्पा..मोकळेपणाने हसायला लागले.....जिथे लोक ठरवून त्रास देत आहेत हे दिसलं त्यांना स्वतःच्या परिघात येऊ न देता लांब राहणं शिकले...

 अनेक वर्षांपासूनची इच्छा होती कैलास मानसरोवर यात्रा करण्याची...यावर्षी यात्रा केली.. त्या अवाढव्य कैलास समोर उभं असताना आयुष्य आपल्यासाठी घडत नाही ही भावना संपली...  आणि आपण मागे पडलोय असं वाटणं थांबलं... आपण  track वर आहोत आणि पुढे आहोत हा आत्मविश्वास मिळाला..

खूप खूप छोट्या गोष्टी बदलल्या... इतकी वर्षे नुसते काळ्या रंगाचे कपडे घालायचे.. यावर्षी ठरवून दुसरे रंग घालायला शिकले...
ठरवून साडी विकत घेतली स्वतःसाठी... नटायला शिकले... स्वतःचे खूप फोटो काढले... वेळेत जेवायला शिकले... त्रास देणारा  विचार करणं बंद केलं... काय बरोबर काय चूक लेबल लावणं बंद केलं.... टीव्ही पाहणं बंद केलं... जे आवडत नाही ते मनाविरुद्ध करणं सोडलं... स्वतःला वेळ द्यायला शिकले...

   अजून ही मधून मधून धडपडायला होत...पण प्रवास सुरु आहे.... या एका वर्षात खूपदा पडले,खरचटलं.. पण  नव्याने चालताना पळताना छान वाटतंय...

मैत्रिणीने छान वाक्य सांगितल... तू  विचार करण्यापेक्षा फील कर... You dont let things to happen to You.... प्रवाहाबरोबर वाहायला शिक.... सोड स्वतःला.. घट्ट पकडून ठेऊ नकोस.... 2016 संपता संपता हा धडा पण गिरवायला सुरुवात केली  आहे..... 2016 वर्षात  तर मी अजून तिथेच आहे.. पण मानसिकदृष्ट्या खूप पुढे आले.... हे वर्ष न मागता खूप काही देऊन गेलं... नव्याने स्वतःची  ओळख करून दिली...आपण असे ही आहोत...आपल्याला असंही वाटू शकते हे स्वीकारलं...2016 मध्ये Learning Driverच  license मिळालेलं आहे...2017 मध्ये Expert Driver बनली असेन अशी अपेक्षा!
Thank you 2016 for everything....
You are the most important Year Happend to me....
Posted by मनं उवाच... at 05:58 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Saturday, 1 October 2016

यात्रा निसर्गाची...कैलास मानसरोवराची....

महादेव म्हणजे काय..लिंग पूजा का करतात हे न समजणाच्या वयात, वयाच्या अकराव्या वर्षी चार धाम यात्रा केली..त्या यात्रेत एकदम लांब असलेलं केदारनाथाचं मंदिर…बद्रीनाथ मंदीराच्या समोर केलेली लिंग पूजा हे थोडं अंधुक आजही आठवतं…मग वयाच्या अठराव्या वर्षी केलेली अमरनाथ यात्रा आणि त्यावेळी जाणवलेले महादेवाचं आध्यात्मिक महत्त्व..आणि त्यानंतर महादेवाच्या प्रती वाढलेली उत्सुकता…त्यानंतर कॉलेजमध्ये असताना कैलास मानसरोवर यात्रेविषयी वाचलं…कैलास म्हणजे महादेवाचं घर…तेव्हापासून ठरवलेलं आपण एकदा कैलास मानसरोवर यात्रा करायची…बकेटलिस्ट चित्रपट पाहिल्यावर माझी लिस्ट तयार झाली…त्यातील पहिली जागा लेह लडाख आणि नंतर कैलास मानसरोवर यात्रा…2012 ला लेह लडाख  झालं…2014 पासून मनात विचार होता..आता कैलास यात्रेला जायचं…माहिती काढायला सुरूवात केली…2015मध्ये यात्रेसाठी पैसे भरले,बुकिंग केलं…यात्रेसाठी जायचं म्हणून चालण्याचा सराव सुरू केला…आणि नेपाळचा भूकंप झाला….27 जूनचं तिकीट होतं…24 जूनला कळलं व्हिसा मिळाला नाही…यावर्षी यात्रा रदद…आता कैलास यात्रेसाठी 2016ची वाट पहावी लागणार..खूप निराश व्हायला झालं…महादेवाने बोलवलं नाही..यात्रा नाही…

वर्ष 2016 उजाडलं…पुन्हा कैलास यात्रेसाठी गेल्यावर्षी ज्या ग्रुपबरोबर जाणार होते,त्यांना पुन्हा विचारलं.त्यांनी जुलैमध्ये जाणार असल्याच सांगितलं…त्यांच्याकडे बुकींगसाठी पैसे भरले…पण गेल्यावर्षी ऐनवेळी यात्रा रद्द झाली म्हणून यावर्षी शांतच होते…जुलै जवळ आला…मेल आले,यात्रेची माहिती आली..अखेरीस 25 जूनला मीटींग ठरली…मीटींगला त्यांना विचारलं व्हिसाचं काय..यावेळी व्हिसा मिळेल,चिंता नसावी सांगितलं..10 जुलैला निघायचं असं सांगितलं…हातात फक्त दोन आठवडे म्हणजे दोन रविवार होते तयारीला…या एक वर्षात यात्रेसाठी स्वतःला फीट ठेवणं हे प्रयत्न सुरू होते..पण आपण खरंच जाऊ का,यात्रा होईल का यावर विश्वास ठेवायलं मन तयार नव्हतं…अखेरीस व्हिसा आला…10 जुलैला जाणार हे फायनल ठरलं…आणि जीव भांड्यात पडला…

22 जणांचा आमचा ग्रुप होता…मी एकटीच होती..माझ्यासारखी डॉ.शाखा संदीप पण एकटी होती..आम्ही एकमेकींबरोबर राहायचं असं मुंबई विमानताळावरूनच ठरवलं…आणि मागून एकत्र एक रूम  घेतली..आणि रूममेट झालो..

यात्रेची सुरूवात

कैलास मानसरोवर यात्रा ही केंद्र सरकार आणि खासगी टूर ऑपरेटर घेऊन जातात…खासगी यात्रा ही नेपाळ काठमांडूहून सुरूवात होते..काठमांडूला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन यात्रेला सुरूवात होते…आम्ही काठमांडूला पोहचल्यावर सकाळी माऊंट एव्हरेस्ट पाहण्यासाठी एक विमानाची राईड असते..त्याचं बुकिंग केलं..सकाळी विमानतळावर जाऊन बसले..एक तासाने कळलं की ढगाळ वातावरणामुळे आज एव्हरेस्टचं दर्शन होऊ शकणार नाही,त्यामुळे ती फ्लाईट रद्द झाली…आणि तिथून पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी गेलो…आणि यात्रेतला पहिला धडा महादेवाने दिला…तुमचं प्लॅनिंग त्याच्यासमोर चालत नाही…जे यापुढे होईल ते स्वीकारा….

याआधी कैलास मानसरोवर यात्रा काठमांडूहून नेपाळ-तिबेट मैत्री ब्रीजवरून सुरूवात होती..पण नेपाळ भूकंपानंतर हा ब्रीज आणि त्याच्या आसपासची गाव उद्ध्वस्त झाल्याने यात्रा आता तिबेटची राजधानी ल्हासा मार्गोने होते…काठमांडूहून ल्हासाचं फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर पोहचलो..चेक इन केलं…इमिग्रेशन केलं..आणि कळलं फ्लाईट तीन तास उशिराने आहे…पुन्हा विमानतळावर वाट पहाणं…पुन्हा महादेव सहनशक्तीची जणू परीक्षा घेत आहेत का, असंच वाटू लागलं..

तीन तास लेट फ्लाईट,मग दीड तास प्रवास ल्हासाला पोहचलो..तिथले विमानतळावरचे कर्मचारी काम संपवून घरी जाण्याच्या आधी पोहचलो म्हणून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून विमानतळाच्या बाहेर पडलो…आमच्या विमानानंतर अजून एक विमान आलं..पण ऑफिसची कामकाजाची वेळ संपल्याने आणि विमानताळावरचे कर्मचारी गेल्याने यात्रेकरूंना त्या दिवशी विमानतळाच्या आत रहावं लागलं..तिबेटमध्ये चीनची सत्ता असल्याने तिथले नियम खूप कडक आहेत….आणि भारतीयांसाठी ते जरा जास्तच कडक आहेत.

ल्हासा हे समुद्रसपाटीपासून अकरा हजार फीट उंचीवर असल्याने तिथे वातावरणात असलेला बदल जाणवतो…ऑक्सिजन हवेत विरळ असतो…high altitude मुळे डोकं दुखणं, श्वासोच्छवास जड होणं, थोडीशी शारीरिक हालचाल केली तरी शारीरिक थकवा जाणवणं..हात-पाय सुजणं अशा साईड इफेक्टला सुरूवात होते..यासाठी 48 तास आधीपासून डायमॉक्स हे औषध सुरू केलं..त्यामुळे त्रास कमी होत होता..

ल्हासावरून पुढे मानसरोवरचा प्रवास 1500 किमीचा होता….रस्त्याच्या मार्गाने होणाऱ्या या प्रवासाला तीन दिवस जातात..आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात मध्ये सार्वजनिक शौचालय जास्त नसतात..आणि जी शौचालय आहेत ती मुळीच जाण्याइतकी स्वच्छ नसल्याने नैसर्गिक विधींसाठी बाहेर जावं लागतं…थंडीत, वाऱ्यात ही अजून एक वेगळी परीक्षा असते.

ल्हासावरून आमचा प्रवास सुरू झाला…हसत खेळत..गप्पा मारत..गाण्याच्या भेंड्या खेळत…मध्येच रस्त्यात गाडी थांबवून सहभोजन करणं याची मज्जा वेगळी…हा संपूर्ण प्रवास काराकोरम महामार्गावरून झाला…चीन सरकारचं कौतुक केलं पाहिजे की हा संपूर्ण महामार्ग पक्का रस्ता बांधला आहे..खड्डे नाही..टोल नाही…चालकांना दोन थांब्याच्या मध्ये वेगाची मर्यादा आहे..पोलिसांचा एक प्रतिनिधी बसमध्ये बसून असतो तपासण्यासाठी वेगमर्यादा किती आहे….एका थांब्यावरून निघाल्यावर दुसऱ्या थांब्यावर पोहचण्यासाठी वाहन चालकाला वेळ दिलेला असतो..त्या वेळेच्या आधी पोहचल्यास चालकाला दंड बसतो..त्यामुळे वाहनचालक ठरवूनही जास्त वेगाने वाहन चालवू शकत नाही…दिलेल्या वेळेत आणि वेग मर्यादेत वाहन चालवणं बंधनकारक होतं…लवकर पोहचल्यास वाहनचालक थांब्याच्या आधी जाऊन रस्त्याच्या बाजूला थांबून ही पळवाट काढतात.

असा टप्प्याटप्प्याने प्रवास करत आम्ही सागाला पोहचलो. सागावरून प्रवास सुरू केल्यावर आम्ही थेट मानसरोवराला जाणार होतो…यात्रेतील महत्त्वाच्या प्रवासाला सुरूवात झाली….या प्रवासात मानसरोवराच्या जवळ कैलासची पहिली झलकही दिसणार त्यामुळे सगळेच उत्सुक होते..सकाळी आठपासून प्रवास सुरू झाला संध्याकाळी सहाच्या आसपास मानसरोवरला पोहचलो…नजरेत मावणार नाही इतकी निळाई….मानसरोवराची परिक्रमा सुरू झाली…मानसरोवराबाबत असं म्हटलं जात की देवी देवतांच्या स्नानासाठी ब्रम्हदेवाने मानसरोवराची निर्मिती केली..त्याबाबत असंही म्हटलं जात की ब्रह्माला कोणी विचारलं की तुझं मन कसं आहे,त्याची खोली ,रंग कसा आहे..तेव्हा ब्रह्माने मानसरोवराची निर्मिती केली….मानसरोवराच्या पाण्याला रंग नाही…मानसरोवर जो पाहिल,पाहणाऱ्याला जो रंग दिसेल त्या रंगाचं सरोवर असेल असं ब्रम्हाने उत्तर दिलं….अर्थात मानसरोवर निळं आहे,तो आकाशाचं रंग असतो..त्याची निळाई आहे…हिंदू धर्मीयांमध्ये मानसरोवरात आंघोळ केल्यास पापक्षालन होतं असं मानलं जात तर तिबेटीयन लोक मात्र मानसरोवराला हॉली वॉटर मानतात..त्यामुळे ते त्या पाण्यात आंघोळ करत नाही..

आमच्या ग्रुपमध्ये मोजक्याच जणांनी आंघोळ केली..इतरांनी डोक्यावरून पाणी घेतलं..मानसरोवराच्या काठावर खूप वेळ शांत बसता आलं…त्याचा आवाज,थंड वारे यामध्ये मनाला इतकं शांत वाटलं…शहरातील गोंधळ,वाहनांचे कर्कश हॉर्न, आवाज सगळ्यापासून लांब….इथे फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज होता…शांतता ही मनाला फक्त सुखवणारी होती….

मानसरोवरच्या जवळ राहण्याची सोय होती… तिथे मुक्काम हलवला… राहण्याच्या जागेपासून समोरच मानसरोवरचं दर्शन होत होतं पण कैलासचं मात्र अजून दर्शन नव्हतं… अस्वस्थ वाटतं होत, सतत ढगाळलेलं वातावरण, हवामान नीट कधी होईल, ढग कधी जातील याचीच वाट पाहत होतो

परिक्रमेचा दिवसही जवळ आला आणि अचानक आम्हाला सांगण्यात आलं की वय वर्ष 60 हून अधिक जे आहेत ते परिक्रमा करू शकणार नाहीत. चीन सरकारने नियम आणला आहे.. हे कळताच आमच्या ग्रुपमधील अनेकांचा हिरमोड झाला… 22 जणांच्या ग्रुप मध्ये 12 जण वय वर्ष 60 हून अधिक होते. त्यातील एक तर एवरेस्ट बेस कॅम्प करून आले होते, ट्रेकिंग करणारे होते… एक अमेरिकेहून डॉक्टर आल्या होत्या त्याही फिट होत्या… तयारी करून आल्या होत्या… कैलास मानसरोवर यात्रेतील महत्वाची गोष्ट म्हणजे परिक्रमा… परिक्रमेशिवाय यात्रा परिपूर्ण झाली असे वाटत नाही.. परिक्रमेत कैलासच जवळून दर्शन होतं… त्यामुळे अनेकांची चिडचिड होत होती

उरलेल्या 10 मध्ये पण दोन जण परिक्रमा नव्हते करणार … मग आठ जणांनी परिक्रमेला जायचं ठरवलं.. त्यासाठी वेगळी पॅकिंग झाली… मानसरोवरची काठावरून दारचेनला पोहचलो… परिक्रमेची सुरुवात इथून होते… तिथे यमद्वार ओलांडून परिक्रमेला जाता येतं… यमद्वार ओलांडलं तर तुमचे आज पर्यंत सर्व पाप नष्ट होत… नवीन आयुष्य सुरु होतं.. म्हणजे जणू आपली सिस्टीम रिबुट होणं…

यमद्वारापासून परिक्रमेला सुरुवात झाली… पहिला दिवस साधारण 10 किमी चालण्याचा होता…प्रवासाला सुरुवात झाली आणि पाऊस आला… अगदी 15 मिनिटाने पाऊस थांबला ..मग गरम व्हायला लागलं आणि हे असं सतत दिवसभर सुरु राहील.. कधी पाऊस तर कधी गारा कधी थंड हवा तर कधी सूर्यप्रकाश… दर थोड्या वेळेना रेनकोट घाला, काढा, जॅकेट घाला असाच खेळ सुरू होता…
परिक्रमेला सुरुवात होऊनही कैलास दर्शन अजून झालं नव्हतं…
सारखं असं वाटत होत काय झालंय, काय चुकलं आपलं का कैलास दर्शन होत नाही .. मानसरोवरच्या काठी येऊन तीन दिवस झाले… तिथून कैलासची दक्षिणी कडा दिसते पण तिथे दर्शन नाही.. परिक्रमा सुरुवात झाली तरी दर्शन नाही.. इतक्या लांब येऊन कैलास दर्शन नाही.. हा विचारच त्रास देणारा होता…
महादेव, पार्वती, गणपती जे देव आठवले सगळ्यांचा जप करणं, प्रार्थना करणं सुरु होत… आता तरी कैलास दिसावा इतकीच अपेक्षा घेऊन प्रवास सुरु होता.

दुपारी जेवणासाठी थोड्यावेळ थांबलो पुन्हा चालायला सुरुवात केली… मोठे मोठे पर्वत, बाजूने वाहणारी नदी.. सगळं मन मोहून टाकणार वातावरण होत.. मध्ये एक नेपाळी गाईड भेटला.. तो विचारत होता “क्या हुवा?” त्याला म्हंटल “कैलास दर्शन नही हुवा” तो म्हणाला “मुझे follow करो, दर्शन होगा” आणि तो पुढे चालायला लागला..तो खूप पुढे निघून गेला… काही वेळाने तो एके ठिकाणी उभा असलेला दिसला… तिथपर्यंत गेलो त्याला विचारलं “क्या हुवा?” त्याने वरती बोट दाखवलं आणि समोर कैलास… अखेरीस ढग बाजूला झालेले आणि कैलासच सुंदर दर्शन झालं… कैलासच्या पश्चिम कड्याच दर्शन झालं… त्या क्षणी काही सुचल नाही.. घुडघे टेकले आणि मातीत डोकं टेकलं… नमस्कार केला… डोळ्यातून कधी पाणी आलं काहीच कळलं नाही.. इतर सहप्रवासी सगळ्यांची अवस्था तशीच… डोळ्यात पाणी हात जोडलेले… मातीत डोकं टेकवून कैलास समोर नतमस्तक…पर्वत शिखरावर बर्फ… शांत भासणारा पर्वत… जणू महादेवाचं दर्शन…
तोंडातून शब्द फुटत नव्हते… दर्शनाने मन भरून आलेलं… डोळे भरून कैलास पहिला कृतकृत्य झालो.. वाटलं हा क्षण इथेच थांबावा… अजून काही नको…

फोटो काढले, कोणी तिथे प्रार्थना केली आणि पुन्हा परिक्रमेला सुरुवात केली.. मनात ओम नमः शिवाय जप ही होता.. मन आता जरा शांत झाल…कशासाठी आपण इतका अट्टाहास केला…ज्याच्या दर्शनाने कोणतीच इच्छा उरली नाही..फक्त आणि फक्त ओम नमः शिवाय शिवाय काही सुचतं नव्हत…कैलासच्या दर्शनाबरोबर परिक्रमा करताना  आसपासचं निसर्ग सौंदर्य पण अचंबित करणारं होतं…

पहिल्या दिवसाची परिक्रमा संपता संपता कैलासच्या उत्तरी कडेच दर्शन झालं… ढगाआडून दिसणारा कैलास… मनशांती देत होता…

गेस्ट हाऊसला पोहचलो.. त्याच्या समोरच कैलास दिसत होता… इच्छापूर्ती अजून काय असावी की सतत कैलासच दर्शन… तीन दिवस कैलास दर्शन नाही झालं हि तक्रार संपली… इतकं मन भरेपर्यंत कैलास दर्शन होत… मधेच ढगांच्या आड लपणार…मध्यरात्री दोन वाजता चंद्राच्या दुधाळ प्रकाशात कैलासला पाहिलं….तेव्हा कैलासवर खूप ढग होते…थंड,बोचरा वारा….15-20 मिनीट त्या थंडीत फक्त  उभे राहू शकले….कैलासचं संपूर्ण दर्शन झाल नाही…पण तरीही..दुधाळ प्रकाशात,ढगांच्या आड  लपलेल्या कैलासच्या या रूपाचही आकर्षण वाटल..

पहाटे दुसऱ्या दिवसाच्या परिक्रमाची सुरूवात होणार होती..पण आमच्या ग्रुपमधील एका काकाचं ऑक्सिजन लेवल कमी झाली..त्यांची पत्नी चिंतेत,एका प्रवाशाच्या बायकोची तब्येत खराब झालेली…एका प्रवाशाच्या पायाला मायनर फ्रॅक्चर झाल्याची शक्यता वाटत होती..आमच्या ग्रुपमधील एकेक जण आजारी पडत होता…त्यामुळे पुढे परिक्रमा न करता परत फिरण्याचा निर्णय झाला…या निर्णयाने मुळीचं खूश नव्हते..झालेल्या मीटींगमध्ये चर्चा झाली..चिडचिड झाली….चिडून रूममध्ये झोपायला आले…आणि एकचं विचार मनात आला…काल अख्खा दिवस फक्त कैलास दर्शन व्हाव ही एकचं इच्छा होती,ती पूर्ण झाली…इतक दर्शन झाल…मग आता परिक्रमा पूर्ण व्हावी यासाठी हट्ट का,चिडचिड का….आपल्या मनाची हाव संपंत नाही का….आपल्याला एक गोष्ट मिळाली की मग दुसरी हवी असते….महादेव काय शिकवतात..या संपूर्ण प्रवासात महादेव काय शिकवत आलेत…आमच्या प्लॅननुसार प्रवास झाला का,आम्हांला जेव्हा जे हवं होतं ते मिळाल का,कैलास दर्शनाला किती दिवस लागले….DETACHMENT is the word…आपल्याला जे जे हवं…त्याच्यापासून Detachment…इच्छा पूर्ण नाही झाली तरी आहे त्यात समाधान मानणं…कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं…बाहेरच्या किंवा meterialistic गोष्टींपासून detach होण, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न पडण…हेचं तर महादेव शिकवत आलेत….मग आता का रडायचं…महादेवाने दर्शन दिल…इतक्या लांब येऊनही आमच्या ग्रुपमधील अनेकांना कैलास दर्शन झाल नाही…मग किती नशीबवान आहे….हे सगळ्या विचारानंतर शांत झाले….

सकाळी पुन्हा कैलासचं दर्शन घेतल….थोड्या वेळ समोर बसून ध्यान आणि नामस्मरण केल….आणि  पुन्हा बेस कॅम्पला परत जायच्या प्रवासाला सुरूवात झाली…..आता चालताना महादेवाशी संवाद सुरू होता…त्याच्यासमोर जणू गाऱ्हाण सांगत होते…काय झाल,महादेवाशी संवाद संपला असं का वाटतयं…चालता चालता पुन्हा कैलासच्या पश्चिमी  कड्याचं दर्शन…

कैलासच्या विविध कडां प्रवाशांना आकर्षित करतात कोणाला दक्षिण तर कुणाला उत्तर…मला कैलासच्या पश्चिम कड्याने प्रचंड आकर्षित केल…पुन्हा जेव्हा पश्चिमी कड्याच्या खाली आले..तेव्हा भडभडून आल…डोळ्यात नुसतं पाणी….कैलासच्या समोर बसले….काठमांडूहून आणलेले बेेलपत्रं…तिथेच मातीत वाहिले…खूप वेळ रस्त्यावर बसून राहिले…..आयुष्यात हे असचं का झाल,तसं का झालं नाही…कोणतीही तक्रार उऱली नव्हती…काही कमी आहे वाटतं नव्हत….महादेवासमोर फ्कत उभं राहिलं…तरी त्याला सगळं समजल…असचं वाटलं पाहिजे….त्याक्षणी महादेवाला इतकचं म्हटल….आता जसा माझ्याबरोबर आहेस…तसाचं कायम रहा…आणि फक्त मुक्ती दे…या चक्रात अडकायचं नाही…कायमचं मुक्त व्हायचयं….


खूप शांत मनाने बस कॅम्पला आले….घरच्यांना कळवल….पाच दिवस आंघोळ नाही…टॉयलेट नाही…बाहेरचं सगळ्या नैसर्गिक विधी….थंडी…बदलणार हवामान….ग्रुपमध्ये कोणी ना कोणी आजारी…पण मला अजूनही काही झालेलं नव्हत….अमरनाथ यात्रेला अकरा हजार फीटवर पण त्रास झालेला…आणि कैलास परिक्रमेत 16 हजार फीटवर जाऊनही… विशेष त्रास नाही…नाकातून थोडं रक्त येण,चेहरा सूजण याव्यतिरिक्त सगळं नीट होत….घरचे कोणीही आसपास नसताना आपण स्वतची काळजी घेऊ शकतो,विषम परिस्थिती टिकू शकतो याहून मोठा आनंद परत आल्यावर नव्हता..घरी दररोज गरम पाणी हवं आंघोळीला,आई-वडिलांना किती गृहित धरतो,आवडती भाजी ताटात हवी..ऑक्सिजन किती मौल्यवान याची कधीच जाणीव झाली नव्हती…पण कैलास मानसरोवर यात्रेत खूप सहजपणे आयुष्यात मिळालेल्या गोष्टी किती अनमोल आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली…..

बेस कॅम्पहून बसने सागाला पोहचलो…आणि तब्बल सहा दिवसाने आंघोळीला गरम पाणी मिळाल…त्यातला आनंद ही वेगळाच…परतीचा प्रवास सुरू झाला होता…कैलास परिक्रमेला सुरू करताना यमव्दार मधून प्रवेश करायचा असतो,तिथून प्रवेश केला की तुमच्या आयुष्यातील सर्व अकाऊंट क्लियर होत…सगळी पाप रद्द…नवीन पाटी,…नवीस सुरूवात होते…जणू आपली संपूर्ण सिस्टीम फॉरमेट होऊन पुन्हा नवीन सिस्टीम….हे सगळ माझ्याबाबत ही घडल….पण ते यमव्दारमुळे नाही…तर कैलास मानसरोवराच्या या प्रवासाने….निसर्गाने,महादेवाने पदोपदी जाणीव करून दिली…..DETACHMENT चा धडा घालून दिला…..
Click here to Reply or Forward
6.63 GB (44%) of 15 GB used
Manage
Terms - Privacy
Last account activity: 3 minutes ago
Details
Posted by मनं उवाच... at 04:20 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

Blog Archive

  • ►  2018 (1)
    • ►  March (1)
  • ▼  2016 (2)
    • ▼  December (1)
      • वर्ष २०१६ सरताना.....
    • ►  October (1)
      • यात्रा निसर्गाची...कैलास मानसरोवराची....
  • ►  2015 (3)
    • ►  November (1)
    • ►  September (2)
  • ►  2014 (2)
    • ►  July (1)
    • ►  February (1)
  • ►  2013 (6)
    • ►  December (3)
    • ►  August (1)
    • ►  June (1)
    • ►  April (1)
  • ►  2012 (11)
    • ►  April (4)
    • ►  March (7)

About Me

My photo
मनं उवाच...
पत्रकार असले तरी त्या पत्रकारचं पत्रकारितेच्या पलीकडे ही एक मनं असतं!त्याला Editorial policyची मर्यादा माहित नसते..त्यामुळे त्याची बडबड नेहमीच चालू असते,म्हणून हा उद्योग!
View my complete profile
Travel theme. Powered by Blogger.