महादेव म्हणजे काय..लिंग पूजा का करतात हे न समजणाच्या वयात, वयाच्या अकराव्या वर्षी चार धाम यात्रा केली..त्या यात्रेत एकदम लांब असलेलं केदारनाथाचं मंदिर…बद्रीनाथ मंदीराच्या समोर केलेली लिंग पूजा हे थोडं अंधुक आजही आठवतं…मग वयाच्या अठराव्या वर्षी केलेली अमरनाथ यात्रा आणि त्यावेळी जाणवलेले महादेवाचं आध्यात्मिक महत्त्व..आणि त्यानंतर महादेवाच्या प्रती वाढलेली उत्सुकता…त्यानंतर कॉलेजमध्ये असताना कैलास मानसरोवर यात्रेविषयी वाचलं…कैलास म्हणजे महादेवाचं घर…तेव्हापासून ठरवलेलं आपण एकदा कैलास मानसरोवर यात्रा करायची…बकेटलिस्ट चित्रपट पाहिल्यावर माझी लिस्ट तयार झाली…त्यातील पहिली जागा लेह लडाख आणि नंतर कैलास मानसरोवर यात्रा…2012 ला लेह लडाख झालं…2014 पासून मनात विचार होता..आता कैलास यात्रेला जायचं…माहिती काढायला सुरूवात केली…2015मध्ये यात्रेसाठी पैसे भरले,बुकिंग केलं…यात्रेसाठी जायचं म्हणून चालण्याचा सराव सुरू केला…आणि नेपाळचा भूकंप झाला….27 जूनचं तिकीट होतं…24 जूनला कळलं व्हिसा मिळाला नाही…यावर्षी यात्रा रदद…आता कैलास यात्रेसाठी 2016ची वाट पहावी लागणार..खूप निराश व्हायला झालं…महादेवाने बोलवलं नाही..यात्रा नाही…
वर्ष 2016 उजाडलं…पुन्हा कैलास यात्रेसाठी गेल्यावर्षी ज्या ग्रुपबरोबर जाणार होते,त्यांना पुन्हा विचारलं.त्यांनी जुलैमध्ये जाणार असल्याच सांगितलं…त्यांच्याकडे बुकींगसाठी पैसे भरले…पण गेल्यावर्षी ऐनवेळी यात्रा रद्द झाली म्हणून यावर्षी शांतच होते…जुलै जवळ आला…मेल आले,यात्रेची माहिती आली..अखेरीस 25 जूनला मीटींग ठरली…मीटींगला त्यांना विचारलं व्हिसाचं काय..यावेळी व्हिसा मिळेल,चिंता नसावी सांगितलं..10 जुलैला निघायचं असं सांगितलं…हातात फक्त दोन आठवडे म्हणजे दोन रविवार होते तयारीला…या एक वर्षात यात्रेसाठी स्वतःला फीट ठेवणं हे प्रयत्न सुरू होते..पण आपण खरंच जाऊ का,यात्रा होईल का यावर विश्वास ठेवायलं मन तयार नव्हतं…अखेरीस व्हिसा आला…10 जुलैला जाणार हे फायनल ठरलं…आणि जीव भांड्यात पडला…
22 जणांचा आमचा ग्रुप होता…मी एकटीच होती..माझ्यासारखी डॉ.शाखा संदीप पण एकटी होती..आम्ही एकमेकींबरोबर राहायचं असं मुंबई विमानताळावरूनच ठरवलं…आणि मागून एकत्र एक रूम घेतली..आणि रूममेट झालो..
यात्रेची सुरूवात
कैलास मानसरोवर यात्रा ही केंद्र सरकार आणि खासगी टूर ऑपरेटर घेऊन जातात…खासगी यात्रा ही नेपाळ काठमांडूहून सुरूवात होते..काठमांडूला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन यात्रेला सुरूवात होते…आम्ही काठमांडूला पोहचल्यावर सकाळी माऊंट एव्हरेस्ट पाहण्यासाठी एक विमानाची राईड असते..त्याचं बुकिंग केलं..सकाळी विमानतळावर जाऊन बसले..एक तासाने कळलं की ढगाळ वातावरणामुळे आज एव्हरेस्टचं दर्शन होऊ शकणार नाही,त्यामुळे ती फ्लाईट रद्द झाली…आणि तिथून पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी गेलो…आणि यात्रेतला पहिला धडा महादेवाने दिला…तुमचं प्लॅनिंग त्याच्यासमोर चालत नाही…जे यापुढे होईल ते स्वीकारा….
याआधी कैलास मानसरोवर यात्रा काठमांडूहून नेपाळ-तिबेट मैत्री ब्रीजवरून सुरूवात होती..पण नेपाळ भूकंपानंतर हा ब्रीज आणि त्याच्या आसपासची गाव उद्ध्वस्त झाल्याने यात्रा आता तिबेटची राजधानी ल्हासा मार्गोने होते…काठमांडूहून ल्हासाचं फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर पोहचलो..चेक इन केलं…इमिग्रेशन केलं..आणि कळलं फ्लाईट तीन तास उशिराने आहे…पुन्हा विमानतळावर वाट पहाणं…पुन्हा महादेव सहनशक्तीची जणू परीक्षा घेत आहेत का, असंच वाटू लागलं..
तीन तास लेट फ्लाईट,मग दीड तास प्रवास ल्हासाला पोहचलो..तिथले विमानतळावरचे कर्मचारी काम संपवून घरी जाण्याच्या आधी पोहचलो म्हणून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून विमानतळाच्या बाहेर पडलो…आमच्या विमानानंतर अजून एक विमान आलं..पण ऑफिसची कामकाजाची वेळ संपल्याने आणि विमानताळावरचे कर्मचारी गेल्याने यात्रेकरूंना त्या दिवशी विमानतळाच्या आत रहावं लागलं..तिबेटमध्ये चीनची सत्ता असल्याने तिथले नियम खूप कडक आहेत….आणि भारतीयांसाठी ते जरा जास्तच कडक आहेत.
ल्हासा हे समुद्रसपाटीपासून अकरा हजार फीट उंचीवर असल्याने तिथे वातावरणात असलेला बदल जाणवतो…ऑक्सिजन हवेत विरळ असतो…high altitude मुळे डोकं दुखणं, श्वासोच्छवास जड होणं, थोडीशी शारीरिक हालचाल केली तरी शारीरिक थकवा जाणवणं..हात-पाय सुजणं अशा साईड इफेक्टला सुरूवात होते..यासाठी 48 तास आधीपासून डायमॉक्स हे औषध सुरू केलं..त्यामुळे त्रास कमी होत होता..
ल्हासावरून पुढे मानसरोवरचा प्रवास 1500 किमीचा होता….रस्त्याच्या मार्गाने होणाऱ्या या प्रवासाला तीन दिवस जातात..आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात मध्ये सार्वजनिक शौचालय जास्त नसतात..आणि जी शौचालय आहेत ती मुळीच जाण्याइतकी स्वच्छ नसल्याने नैसर्गिक विधींसाठी बाहेर जावं लागतं…थंडीत, वाऱ्यात ही अजून एक वेगळी परीक्षा असते.
ल्हासावरून आमचा प्रवास सुरू झाला…हसत खेळत..गप्पा मारत..गाण्याच्या भेंड्या खेळत…मध्येच रस्त्यात गाडी थांबवून सहभोजन करणं याची मज्जा वेगळी…हा संपूर्ण प्रवास काराकोरम महामार्गावरून झाला…चीन सरकारचं कौतुक केलं पाहिजे की हा संपूर्ण महामार्ग पक्का रस्ता बांधला आहे..खड्डे नाही..टोल नाही…चालकांना दोन थांब्याच्या मध्ये वेगाची मर्यादा आहे..पोलिसांचा एक प्रतिनिधी बसमध्ये बसून असतो तपासण्यासाठी वेगमर्यादा किती आहे….एका थांब्यावरून निघाल्यावर दुसऱ्या थांब्यावर पोहचण्यासाठी वाहन चालकाला वेळ दिलेला असतो..त्या वेळेच्या आधी पोहचल्यास चालकाला दंड बसतो..त्यामुळे वाहनचालक ठरवूनही जास्त वेगाने वाहन चालवू शकत नाही…दिलेल्या वेळेत आणि वेग मर्यादेत वाहन चालवणं बंधनकारक होतं…लवकर पोहचल्यास वाहनचालक थांब्याच्या आधी जाऊन रस्त्याच्या बाजूला थांबून ही पळवाट काढतात.
असा टप्प्याटप्प्याने प्रवास करत आम्ही सागाला पोहचलो. सागावरून प्रवास सुरू केल्यावर आम्ही थेट मानसरोवराला जाणार होतो…यात्रेतील महत्त्वाच्या प्रवासाला सुरूवात झाली….या प्रवासात मानसरोवराच्या जवळ कैलासची पहिली झलकही दिसणार त्यामुळे सगळेच उत्सुक होते..सकाळी आठपासून प्रवास सुरू झाला संध्याकाळी सहाच्या आसपास मानसरोवरला पोहचलो…नजरेत मावणार नाही इतकी निळाई….मानसरोवराची परिक्रमा सुरू झाली…मानसरोवराबाबत असं म्हटलं जात की देवी देवतांच्या स्नानासाठी ब्रम्हदेवाने मानसरोवराची निर्मिती केली..त्याबाबत असंही म्हटलं जात की ब्रह्माला कोणी विचारलं की तुझं मन कसं आहे,त्याची खोली ,रंग कसा आहे..तेव्हा ब्रह्माने मानसरोवराची निर्मिती केली….मानसरोवराच्या पाण्याला रंग नाही…मानसरोवर जो पाहिल,पाहणाऱ्याला जो रंग दिसेल त्या रंगाचं सरोवर असेल असं ब्रम्हाने उत्तर दिलं….अर्थात मानसरोवर निळं आहे,तो आकाशाचं रंग असतो..त्याची निळाई आहे…हिंदू धर्मीयांमध्ये मानसरोवरात आंघोळ केल्यास पापक्षालन होतं असं मानलं जात तर तिबेटीयन लोक मात्र मानसरोवराला हॉली वॉटर मानतात..त्यामुळे ते त्या पाण्यात आंघोळ करत नाही..
आमच्या ग्रुपमध्ये मोजक्याच जणांनी आंघोळ केली..इतरांनी डोक्यावरून पाणी घेतलं..मानसरोवराच्या काठावर खूप वेळ शांत बसता आलं…त्याचा आवाज,थंड वारे यामध्ये मनाला इतकं शांत वाटलं…शहरातील गोंधळ,वाहनांचे कर्कश हॉर्न, आवाज सगळ्यापासून लांब….इथे फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज होता…शांतता ही मनाला फक्त सुखवणारी होती….
मानसरोवरच्या जवळ राहण्याची सोय होती… तिथे मुक्काम हलवला… राहण्याच्या जागेपासून समोरच मानसरोवरचं दर्शन होत होतं पण कैलासचं मात्र अजून दर्शन नव्हतं… अस्वस्थ वाटतं होत, सतत ढगाळलेलं वातावरण, हवामान नीट कधी होईल, ढग कधी जातील याचीच वाट पाहत होतो
परिक्रमेचा दिवसही जवळ आला आणि अचानक आम्हाला सांगण्यात आलं की वय वर्ष 60 हून अधिक जे आहेत ते परिक्रमा करू शकणार नाहीत. चीन सरकारने नियम आणला आहे.. हे कळताच आमच्या ग्रुपमधील अनेकांचा हिरमोड झाला… 22 जणांच्या ग्रुप मध्ये 12 जण वय वर्ष 60 हून अधिक होते. त्यातील एक तर एवरेस्ट बेस कॅम्प करून आले होते, ट्रेकिंग करणारे होते… एक अमेरिकेहून डॉक्टर आल्या होत्या त्याही फिट होत्या… तयारी करून आल्या होत्या… कैलास मानसरोवर यात्रेतील महत्वाची गोष्ट म्हणजे परिक्रमा… परिक्रमेशिवाय यात्रा परिपूर्ण झाली असे वाटत नाही.. परिक्रमेत कैलासच जवळून दर्शन होतं… त्यामुळे अनेकांची चिडचिड होत होती
उरलेल्या 10 मध्ये पण दोन जण परिक्रमा नव्हते करणार … मग आठ जणांनी परिक्रमेला जायचं ठरवलं.. त्यासाठी वेगळी पॅकिंग झाली… मानसरोवरची काठावरून दारचेनला पोहचलो… परिक्रमेची सुरुवात इथून होते… तिथे यमद्वार ओलांडून परिक्रमेला जाता येतं… यमद्वार ओलांडलं तर तुमचे आज पर्यंत सर्व पाप नष्ट होत… नवीन आयुष्य सुरु होतं.. म्हणजे जणू आपली सिस्टीम रिबुट होणं…
यमद्वारापासून परिक्रमेला सुरुवात झाली… पहिला दिवस साधारण 10 किमी चालण्याचा होता…प्रवासाला सुरुवात झाली आणि पाऊस आला… अगदी 15 मिनिटाने पाऊस थांबला ..मग गरम व्हायला लागलं आणि हे असं सतत दिवसभर सुरु राहील.. कधी पाऊस तर कधी गारा कधी थंड हवा तर कधी सूर्यप्रकाश… दर थोड्या वेळेना रेनकोट घाला, काढा, जॅकेट घाला असाच खेळ सुरू होता…
परिक्रमेला सुरुवात होऊनही कैलास दर्शन अजून झालं नव्हतं…
सारखं असं वाटत होत काय झालंय, काय चुकलं आपलं का कैलास दर्शन होत नाही .. मानसरोवरच्या काठी येऊन तीन दिवस झाले… तिथून कैलासची दक्षिणी कडा दिसते पण तिथे दर्शन नाही.. परिक्रमा सुरुवात झाली तरी दर्शन नाही.. इतक्या लांब येऊन कैलास दर्शन नाही.. हा विचारच त्रास देणारा होता…
महादेव, पार्वती, गणपती जे देव आठवले सगळ्यांचा जप करणं, प्रार्थना करणं सुरु होत… आता तरी कैलास दिसावा इतकीच अपेक्षा घेऊन प्रवास सुरु होता.
दुपारी जेवणासाठी थोड्यावेळ थांबलो पुन्हा चालायला सुरुवात केली… मोठे मोठे पर्वत, बाजूने वाहणारी नदी.. सगळं मन मोहून टाकणार वातावरण होत.. मध्ये एक नेपाळी गाईड भेटला.. तो विचारत होता “क्या हुवा?” त्याला म्हंटल “कैलास दर्शन नही हुवा” तो म्हणाला “मुझे follow करो, दर्शन होगा” आणि तो पुढे चालायला लागला..तो खूप पुढे निघून गेला… काही वेळाने तो एके ठिकाणी उभा असलेला दिसला… तिथपर्यंत गेलो त्याला विचारलं “क्या हुवा?” त्याने वरती बोट दाखवलं आणि समोर कैलास… अखेरीस ढग बाजूला झालेले आणि कैलासच सुंदर दर्शन झालं… कैलासच्या पश्चिम कड्याच दर्शन झालं… त्या क्षणी काही सुचल नाही.. घुडघे टेकले आणि मातीत डोकं टेकलं… नमस्कार केला… डोळ्यातून कधी पाणी आलं काहीच कळलं नाही.. इतर सहप्रवासी सगळ्यांची अवस्था तशीच… डोळ्यात पाणी हात जोडलेले… मातीत डोकं टेकवून कैलास समोर नतमस्तक…पर्वत शिखरावर बर्फ… शांत भासणारा पर्वत… जणू महादेवाचं दर्शन…
तोंडातून शब्द फुटत नव्हते… दर्शनाने मन भरून आलेलं… डोळे भरून कैलास पहिला कृतकृत्य झालो.. वाटलं हा क्षण इथेच थांबावा… अजून काही नको…
फोटो काढले, कोणी तिथे प्रार्थना केली आणि पुन्हा परिक्रमेला सुरुवात केली.. मनात ओम नमः शिवाय जप ही होता.. मन आता जरा शांत झाल…कशासाठी आपण इतका अट्टाहास केला…ज्याच्या दर्शनाने कोणतीच इच्छा उरली नाही..फक्त आणि फक्त ओम नमः शिवाय शिवाय काही सुचतं नव्हत…कैलासच्या दर्शनाबरोबर परिक्रमा करताना आसपासचं निसर्ग सौंदर्य पण अचंबित करणारं होतं…
पहिल्या दिवसाची परिक्रमा संपता संपता कैलासच्या उत्तरी कडेच दर्शन झालं… ढगाआडून दिसणारा कैलास… मनशांती देत होता…
गेस्ट हाऊसला पोहचलो.. त्याच्या समोरच कैलास दिसत होता… इच्छापूर्ती अजून काय असावी की सतत कैलासच दर्शन… तीन दिवस कैलास दर्शन नाही झालं हि तक्रार संपली… इतकं मन भरेपर्यंत कैलास दर्शन होत… मधेच ढगांच्या आड लपणार…मध्यरात्री दोन वाजता चंद्राच्या दुधाळ प्रकाशात कैलासला पाहिलं….तेव्हा कैलासवर खूप ढग होते…थंड,बोचरा वारा….15-20 मिनीट त्या थंडीत फक्त उभे राहू शकले….कैलासचं संपूर्ण दर्शन झाल नाही…पण तरीही..दुधाळ प्रकाशात,ढगांच्या आड लपलेल्या कैलासच्या या रूपाचही आकर्षण वाटल..
पहाटे दुसऱ्या दिवसाच्या परिक्रमाची सुरूवात होणार होती..पण आमच्या ग्रुपमधील एका काकाचं ऑक्सिजन लेवल कमी झाली..त्यांची पत्नी चिंतेत,एका प्रवाशाच्या बायकोची तब्येत खराब झालेली…एका प्रवाशाच्या पायाला मायनर फ्रॅक्चर झाल्याची शक्यता वाटत होती..आमच्या ग्रुपमधील एकेक जण आजारी पडत होता…त्यामुळे पुढे परिक्रमा न करता परत फिरण्याचा निर्णय झाला…या निर्णयाने मुळीचं खूश नव्हते..झालेल्या मीटींगमध्ये चर्चा झाली..चिडचिड झाली….चिडून रूममध्ये झोपायला आले…आणि एकचं विचार मनात आला…काल अख्खा दिवस फक्त कैलास दर्शन व्हाव ही एकचं इच्छा होती,ती पूर्ण झाली…इतक दर्शन झाल…मग आता परिक्रमा पूर्ण व्हावी यासाठी हट्ट का,चिडचिड का….आपल्या मनाची हाव संपंत नाही का….आपल्याला एक गोष्ट मिळाली की मग दुसरी हवी असते….महादेव काय शिकवतात..या संपूर्ण प्रवासात महादेव काय शिकवत आलेत…आमच्या प्लॅननुसार प्रवास झाला का,आम्हांला जेव्हा जे हवं होतं ते मिळाल का,कैलास दर्शनाला किती दिवस लागले….DETACHMENT is the word…आपल्याला जे जे हवं…त्याच्यापासून Detachment…इच्छा पूर्ण नाही झाली तरी आहे त्यात समाधान मानणं…कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं…बाहेरच्या किंवा meterialistic गोष्टींपासून detach होण, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न पडण…हेचं तर महादेव शिकवत आलेत….मग आता का रडायचं…महादेवाने दर्शन दिल…इतक्या लांब येऊनही आमच्या ग्रुपमधील अनेकांना कैलास दर्शन झाल नाही…मग किती नशीबवान आहे….हे सगळ्या विचारानंतर शांत झाले….
सकाळी पुन्हा कैलासचं दर्शन घेतल….थोड्या वेळ समोर बसून ध्यान आणि नामस्मरण केल….आणि पुन्हा बेस कॅम्पला परत जायच्या प्रवासाला सुरूवात झाली…..आता चालताना महादेवाशी संवाद सुरू होता…त्याच्यासमोर जणू गाऱ्हाण सांगत होते…काय झाल,महादेवाशी संवाद संपला असं का वाटतयं…चालता चालता पुन्हा कैलासच्या पश्चिमी कड्याचं दर्शन…
कैलासच्या विविध कडां प्रवाशांना आकर्षित करतात कोणाला दक्षिण तर कुणाला उत्तर…मला कैलासच्या पश्चिम कड्याने प्रचंड आकर्षित केल…पुन्हा जेव्हा पश्चिमी कड्याच्या खाली आले..तेव्हा भडभडून आल…डोळ्यात नुसतं पाणी….कैलासच्या समोर बसले….काठमांडूहून आणलेले बेेलपत्रं…तिथेच मातीत वाहिले…खूप वेळ रस्त्यावर बसून राहिले…..आयुष्यात हे असचं का झाल,तसं का झालं नाही…कोणतीही तक्रार उऱली नव्हती…काही कमी आहे वाटतं नव्हत….महादेवासमोर फ्कत उभं राहिलं…तरी त्याला सगळं समजल…असचं वाटलं पाहिजे….त्याक्षणी महादेवाला इतकचं म्हटल….आता जसा माझ्याबरोबर आहेस…तसाचं कायम रहा…आणि फक्त मुक्ती दे…या चक्रात अडकायचं नाही…कायमचं मुक्त व्हायचयं….
खूप शांत मनाने बस कॅम्पला आले….घरच्यांना कळवल….पाच दिवस आंघोळ नाही…टॉयलेट नाही…बाहेरचं सगळ्या नैसर्गिक विधी….थंडी…बदलणार हवामान….ग्रुपमध्ये कोणी ना कोणी आजारी…पण मला अजूनही काही झालेलं नव्हत….अमरनाथ यात्रेला अकरा हजार फीटवर पण त्रास झालेला…आणि कैलास परिक्रमेत 16 हजार फीटवर जाऊनही… विशेष त्रास नाही…नाकातून थोडं रक्त येण,चेहरा सूजण याव्यतिरिक्त सगळं नीट होत….घरचे कोणीही आसपास नसताना आपण स्वतची काळजी घेऊ शकतो,विषम परिस्थिती टिकू शकतो याहून मोठा आनंद परत आल्यावर नव्हता..घरी दररोज गरम पाणी हवं आंघोळीला,आई-वडिलांना किती गृहित धरतो,आवडती भाजी ताटात हवी..ऑक्सिजन किती मौल्यवान याची कधीच जाणीव झाली नव्हती…पण कैलास मानसरोवर यात्रेत खूप सहजपणे आयुष्यात मिळालेल्या गोष्टी किती अनमोल आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली…..
बेस कॅम्पहून बसने सागाला पोहचलो…आणि तब्बल सहा दिवसाने आंघोळीला गरम पाणी मिळाल…त्यातला आनंद ही वेगळाच…परतीचा प्रवास सुरू झाला होता…कैलास परिक्रमेला सुरू करताना यमव्दार मधून प्रवेश करायचा असतो,तिथून प्रवेश केला की तुमच्या आयुष्यातील सर्व अकाऊंट क्लियर होत…सगळी पाप रद्द…नवीन पाटी,…नवीस सुरूवात होते…जणू आपली संपूर्ण सिस्टीम फॉरमेट होऊन पुन्हा नवीन सिस्टीम….हे सगळ माझ्याबाबत ही घडल….पण ते यमव्दारमुळे नाही…तर कैलास मानसरोवराच्या या प्रवासाने….निसर्गाने,महादेवाने पदोपदी जाणीव करून दिली…..DETACHMENT चा धडा घालून दिला…..
|
|
|
Saturday, 1 October 2016
यात्रा निसर्गाची...कैलास मानसरोवराची....
Wednesday, 25 November 2015
नाईट शिफ्ट...बातमी आणि मी
मीडियाचा कोर्स करत असताना आम्हां सगळ्यांना रात्री जागून प्रोजेक्ट करण्याची,प्रेझेंटेशनची तयारी करण्याची सवय लागली...आणि रात्रभर कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी जमून कॉफी पित,गप्पा मारत अभ्यास व्हायचा..तेव्हा वाटायचं रात्री काम करण्यात एक वेगळी मज्जा आहे..इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्यावर नाईट शिफ्ट असते...आणि रात्री घुबडासारखं जाग राहून काम करण्याची इच्छा असल्याने नाईट शिफ्ट लागल्यावर खूप अप्रुप वाटलं...उत्साह वाटला..
मुंबईत नाईट शिफ्ट...रात्रीची मुंबई पहायला मिळणार याचं खूप कौतुक होतं...ईटीव्हीमध्ये ऑफिस सहाव्या मजल्यावर होतं आणि रात्री लिफ्ट नसते...सहा मजले चढून जाव लागणार .. तरीही नाईट शिफ्टचा उत्साह होता...नवीन नवीन लागल्यावर सर्व नाईट शिफ्टच्या रिपोर्टर्सचे नंबर घ्या...सगळ्यांशी बोला..संपर्कात रहा हे जमल..मग ठरवून नाईट रिपोर्टर्स चहा प्यायला भेटायचे...या भेटीतून दादर टीटी जवळील ज्यूस शॉपची ओळख झाली...जिथे पार मध्यरात्री दोननंतर पावभाजी,पिझ्झा मिळायचा...अगदी रस्त्यावर बसून लोक या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे...चर्चगेट बाजूला बनपाव,बटर,ब्रेडजाम मिळायचे...झीच्या चिंचपोकळी ऑफिसकडे पहाटे तीन नंतर गरम गरम पोहे आणि शीरा मिळायचा
झीमध्ये नाईट शिफ्ट असताना पोहे खायला जायचो..आणि मिलच्या सकाळच्या शिफ्टसाठी हे पोहे-शिरा लोक विकायचं हे कळलं...आता मिल राहिली नाही...त्या शिफ्ट राहिल्या नाही...पण पोहे शिराने नाईट शिफ्ट करणाऱ्या मिडीयामधील लोकांना आधार दिला....
२००५मध्ये डान्स बार बंदी आल्यावर नाईट शिफ्ट पत्रकारांसाठी ठरलेली बातमी म्हणजे कोणत्या तरी बारवर पोलिसांनी घातलेली रेड...एकदा रविवारी घाटकोपरमध्ये रेड पडलेली...ईटीव्हीमध्ये रविवारी ऑफिसची गाडी नसायची त्यामुळे आम्ही टॅक्सी करून फिरायचो...रेड पडली कळल्यावर खाली टॅक्सी मिळण्यात वेळ गेला...नरिमन पॉ्ईन्ट वरून घाटकोपरला पोहचलो...तिथे त्या बारचं ठिकाण शोधत होतो...कॅमेरामनने काही लोकांना पत्ता विचारला..तर त्या लोकांनी माझ्याकडे पाहून हळूच त्याला सांगितल...अरे ,लडकी को लेके उस बार में मत जा...अभी वहा रेड हुवा हे...हे ऐकल्यावर त्याने सांगितलं..आम्ही पत्रकार आहोत...मग त्यांनी पत्ता सांगितला..आम्ही त्या बारकडे पोहचलो..तिथे काही चॅनेलचे इतर पत्रकार पोहचले होते..अजून एक महिला पत्रकार होती..आम्ही गप्पा मारत उभे होतो...पोलिसांची कारवाई होईपर्यंत बाईट मिळण्याची शक्यता नव्हती..त्या बारचा मालक साऊथ इंडियन होतो..त्याने ईटीव्हीचा बूम पाहिला..आणि अचानक चिडला...ईटीव्ही दक्षिणेकडे प्रसिध्द असल्यामुळे कदाचित त्याला भीती वाटली असले..बदनामाची..पण मग त्याने पोलिसापासून सुरूवात केली...की बारवर रेड का टाकतात..आम्ही काय केल...त्या बारबाला..मेहनतीने पैसे कमवतात...तुम्ही का विरोध करता...आम्ही गप्प...तर तो अजून चिडला...मग तो बारबालांवरून आम्हां मुलींवर घसरला...तो म्हणाला...ये लडकिया अंदर पेट के लिए नाचती है...तुम भी तो पेट के लिए यहा इतनी रात को रास्ते पे खडी हो... आम्ही सगळे पत्रकार त्याच्यावर ओरडलो...वातावरण चिघळलं..पोलिस मधे पडले...या गडबडीत बाईट झाला...आम्ही पण निघून गेलो..मग सतत मनात विचार येत होता...राग कसला येत होता...आमची तुलना बारबालांशी केली म्हणून...आम्हांला रस्त्यावर उभं राहणार्या बोलला म्हणून..आम्ही बातमी साठी,लोकांच्या प्रश्नासाठी झगडतो...समाजासाठी काही चांगलं करता येईल म्हणून पत्रकारिते मध्ये आलो...कदाचित नऊ ते पाच नोकरी मिळाली असती पण स्वताहून हे क्षेत्र निवडल...आणि आमची तुलना बारबालाशी.. खूप मनस्ताप झाला...आज तर पत्रकारांना प्रेस्टीट्यूट बोलतात तेव्हा हा प्रसंग नेहमी आठवतो....तेव्हा वाटलं नव्हतं पत्रकारांचा प्रवास बारबाला ते प्रेस्टीट्यूट होईल.
असचं एका नाईट शिफ्टमध्ये माहिम चर्च भागात कोणतरी बातमी करून आम्ही थांबलेलो...एका चॅनेलची मैत्रिण येत होती..तिला फीड ट्रान्सफर हवं होते....गाडीत शांत बसले होते..रात्रीचे दोन अडीचं झाले होते... अचानक रस्त्यावर आरडा ओरडा झाला..एक गाडी खूप वेगाने निघून गेली होती...रस्त्यावर घोळक्याने लोकं उभं होती...रस्त्यात काहीतरी पडलं होतं...काय गडबड झाली म्हणून पाहायला गेले...तर रस्त्यात एका बोटाएवढं एक अर्भक...त्या सुसाट जाणार्या गाडीतून कोणीतरी ते अर्भक रस्त्यात टाकलं...लोकांची गडबड ऐकत पोलिस आले...मग गर्दी दूर झाली...आम्ही जाऊन ते अर्भक पाहिलं...नुकताच फुटलेले हात..छोटे पाय...बंद डोळे...आयुष्यात फक्त डॉक्युमेंटरी मध्ये असं अर्भक पाहिलं होत..आयुष्यात पहिल्यांदा हे असं पाहून धक्का बसला...आणि इतकं निर्दयी कोण कसं असून शकतं की त्यांनी धावत्या गाडीतून हे असं अर्भक फेकून दिलं होतं...पोलिसांनी त्याच्यावर एक पेपर टाकलं नंतर..तपास करून ते अर्भक काढून हॉस्पिटलमध्ये नेलं..पोलिसांनी त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली...पण ते छोट अर्भक त्यांचे इवलेसे हात..पाय..बंद डोळे हे दृश्य अख्खी रात्र डोळ्यासमोरून गेलं नाही....माणूस किती निर्द्यी होतं चालला आहे...रात्रीच्या अंधारात कदाचित केलेल्या चुका पुसण्याची धडपड माणसाची सुरू असते का...की अंधाराची वाट पाहतो तो....
सगळ्यात जास्त रात्री काम करण्याचं चॅलेंज आणि थ्रील अनुभवलं ते उत्तराखंड येथील ढगफुटीच्या वेळी...रूद्रप्रयागला जाणारे मार्ग बंद झाल्याने आधी उत्तरकाशी गेले...तिथे गंगोत्री आणि यमनोत्रीला अडकलेल्या यात्रींवर बातम्या केल्या..मग जेव्हा बातमी आली की रूद्रप्रयागला जाणारा रस्ता सुरू झाला आहे..तेव्हा आम्ही निघालो...१८४ किमीचा प्रवास आम्हांला करायचा होता....ठरवलेल..जितकं अंतर कापता येईल तितकं पार करायचं ..कारण रूद्रप्रयाग वरून पुढे जोशीमठला जायचं होतं..बद्रीनाथला सगळ्यात जास्त मराठी पर्यटक असल्याची माहिती होती..त्यामुळे जोशीमठला लवकरात लवकर पोहचण्याचं टार्गेट होतं...उत्तरकाशीहून निघाल्यावर अर्ध्या रस्त्यात एक डिझेल वाहून नेणारा मोठा टॅंकअडकला होता..त्या टॅंकमुळे डोंगराच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली...पाच तास वाट पाहूनही उपाय नव्हता सुचत...आर्मीचे ट्रक ही अडकले होते...अनेक जवान रस्त्यावर उतरले होते...विविध प्रयत्न करून पाहिले..शेवटी टॅंकमधलं इंधन बाहेर काढण्याचं ठरवलं...इंधन मोठ्या मोठ्या पिंपात ओतले...टॅकचा भार हलका झाला...मग त्या टॅंकला रस्त्यातून बाजूला करण्यात यश आलं...दुपारी बाराला सुरू केलेला प्रवास जो मध्ये सात तास थांबला...परत रात्री नऊ वाजता आमचा प्रवास सुरू झाला...रस्त्यात काही गरजू लोकांना लिफ्ट दिली....जेवायला एक हॉ़टेल नाही...टॉयलेटची सुविधा नाही...आपला प्रवास कसा होणार...सात तास कसे भरून निघणार..जोशीमठला जायला उशीर होतं होता..सगळे प्रश्न समोर..
रात्री बाराला एके ठिकाणी टाटा कंपनीच्या लोकांनी औषध,पुरी भाजीचा स्टॉल लावलेला दिसला...ड्राईव्हर..मी कॅमेरामन त्यावर तुटून पडलो..किती तरी तासाने खायला मिळाल.....जवळ एक टॉयलेट होत....हायसं वाटल.. पुन्हा प्रवासाला सुरूवात..ड्राईव्हरला विचारलं...पुरी रात गाडी चलायेगा..तो तयार होता..त्याला म्हटलं..कुछ भी करके सुबह रूद्रप्रयाग पहुंचना है....रूद्रप्रयाग हे त्या ड्राईव्हरचं घरं असल्याने त्याला सगळे रस्ते माहितं होते..तो तयार झाला...प्रवास सुरू झाला...कॅमेरामॅन ड्राईव्हरच्या बाजूला बसून डुलक्या काढायला लागला...मग पुन्हा गाडी थांबवली...कॅंमेरामॅनला मागे बसवलं..मी पुढे बसले...आणि ठरवलं झोपायचं नाही....रस्त्यात गुडूप अंधार...कुठला तरी मधला रस्ता प्रशासनाने सुरू केलेला..तिथेही दरडी कोसळतं होत्या...पण वेळ कमी म्हणून आम्ही जात होतो...खूप खड्डे...दगडी...चिखल...आणि गुडूप अंधार...या रस्त्यावर बिबटे असतात हे ही काही लोकांनी सांगितलेलं...म्हणून अजून भीती वाटतं होती...झोप खूप येत होती...पण झोपू शकत नव्हतो...गाडीत ट्रक डाईव्हर गाणी लावतात तशी आयटम नंबर गाणी लावली...इतकी बकवास गाणी आयुष्य़ात ऐकली नव्हती ती त्या प्रवासात फक्त रात्री जागण्यासाठी ऐकली...मध्ये रस्त्यात बिबटा दिसला असं वाटल..आता भीती वाटायला लागली...रस्ते खूप खराब होते..मध्यरात्री तीनच्या सुमारास गाडी बंद पडली...एवढ्या अंधारात बाहेर पडण्याची भीती वाटतं होती..कुठून बिबटा आला तर...एक तास गाडी बंद ठेवली...गाडीत बसून राहिले..ड्राईव्हर एक तासाने पुन्हा खटपट करत होता..अखेरीस गाडी सुरू झाली.आणि प्रवास सुरू पुन्हा प्रवास सुरू झाला.......
पहाटे रूद्रप्रयागला पोहचलो असं वाटतं असताना अचानक तीन किमी अंतरावर रस्ता तुटल्याने पुन्हा पंचवीस किमी फिरून मागे येऊन दुसर्या रस्त्यांने रूद्रप्रयाग मध्ये आलो...गाडीतलं पेट्रोल संपत आलेल...पेशन्स संपले होते...खूप थकलो होतो....रूद्रप्रयाग समोर दिसताचं..जीव भांड्यात पडला....आज पर्यंत रात्रीचे अनेक प्रवास केले...पण हा प्रवास मात्र सहनशक्तीची परिक्षा घेऊन गेला.
माझी अम्मा..जिने आम्हांला वाढवल...आई नोकरीला जात असल्यामुळे आमची काळजी तिचं घ्यायची..अशी अम्मा कॅन्सरने आजारी होती...उपचाराने थकल्याने अम्मा घरीचं होती...घरात रात्री एक बाई थांबायच्या ...नोकरी लागल्यावर आणि विरार ते चर्चगेट प्रवास झेपायचा नाही म्हणून मी घाटकोपरला पीजी रहात होते...नाईट शिफ्ट असली की घरी विरारला जायचे ..तिथून मग ऑफिसला...त्या दिवशी रात्री अम्माशी बोलले..गप्पा मारल्या..नाईटसाठी ऑफिसला आले...मध्यरात्री साडे तीन वाजता आईचा फोन आला...आई काय बोलतेय..समजतं नव्हत....अम्माला मुंग्या लागल्या...मुंग्या लागल्या...बोलतं होती...काही समजलं नाही...पप्पानी फोन घेतला आणि सांगितलं...अम्मा गेली..डॉक्टर येत आहेत..मी सुन्न झाले....अम्माला कॅन्सर झाला..ती कधीतरी जाणार..किवा तिच्या वेदना पाहून वाटायचं ह्या वेदना संपल्या पाहिजे...आणि आज जेव्हा ती खरचं गेली तेव्हा विश्वास बसला नाही....पहाटे लवकर ट्रेन पकडून घरी गेले...अम्माचं पार्थिव होतं..सगळे नातेवाईक आले..दुपारपर्यंत अंत्यसंस्कार झाले...खूप रडू आलं नाही...पण काहीतरी रिकाम झालं..असं वाटतं होते...एका आठवड्याने ऑफिसला आले...पुन्हा नाईट शिफ्ट होती...पण यावेळी पिकअपला आलेल्या ड्राईव्हरला म्हटलं ...मला मरिन ड्राईव्हला सोड....बारा वाजेपर्यंत ये....साडेदहा वाजता मी तिथे गेले...मरिन ड्राईवच्या समुद्राबरोबर शांत बसले...ते कधी रडायला आलं..कळलं नाही...या जगात अम्मा आपल्याला एकटं टाकून गेली...आपण कायमचे एकटे पडलो...ही भावना काय असते...हे तेव्हा जाणवलं...खूप रडले...रात्री साडेबारानंतर ऑफिसला गेले...
आणि तिथून नाईट शिफ्टला असताना मरिन ड्राईव्हला जाऊन एकटं बसण्याची सवय पडली...कधी गाणी ऐकत...तर कधी लाटांचा आवाज ऐकत...सगळ जग शांत होतं असताना...आपल्या मनातील अशांतता अजून ठळक होत जाते....मनातला राग,अस्वस्थता...उफाळून वर यायची....समु्द्र हे पाहत रहायचा...मूक साक्षीदार होत.. कधी मित्र बनून...अनेकदा रडले त्याच्या साक्षीने.. कधी त्याच्याकडेचं न्याय मागितला...तर कधी मार्ग ...रात्रीच्या अंधाराने आपलं दुख..एकटेपणा...लपवत...जगणं शिकवल...
Tuesday, 15 September 2015
11 जुलैचा बॉम्बस्फोट , रक्ताचे पाट, प्रेतांचे ढीग आणि मी.....
11 जुलै 2006 दुपारची शिफ्ट होती, सकाळी TV वर 'पेज 3' मूव्ही पाहत होते. त्यात ती पत्रकार मुलगी बॉम्बस्फोट बघून कशी घाबरते तो सीन पाहिला आणि मनात विचार आला, आपण स्वतः बॉम्बस्फोट झाला तर कसे रिअक्ट होऊ?. आपण अशी कोणती घटना आजपर्यंत रिपोर्टिंग केलेली नाही. हा विचार असाच रेंगाळला. ऑफिसला पोहोचले.
संध्याकाळी 6.30 नंतर ऑफिसमध्ये लँडलाईनवर रिपोर्टर्सना फोन आले. बॉम्बस्फोट झालाय. ऑफिसमधून पहिली टीम बाहेर निघाली ती आमची.. तेव्हा स्फोट रेल्वेच्या कोणत्या डब्यात झाला. याबाबतची काहीही माहिती नव्हती. माटुंगा आणि माहिम ब्लास्ट इतकंच कळलेलं.
नरीमन पॉइंटवरुन माटुंग्याला पोहचायला 2 तास लागले. ट्रेन ब्लास्ट झाल्यामुळे सगळं ट्रॅफिक रस्त्यावर. काय करायचं समजेना. दादर नंतर बरंच अंतर चालत गेलो.. मध्येच बातमी आली एका फोटोग्राफर मित्राला माहिमला मारहाण झाली. त्यामुळे जे करायचं ते नीट हे स्वतःला बजावून माटुंगाला पोहचलो.
माटुंगा स्टेशन पूर्वेला गेलो. रेल्वेच्या भिंतीवरून उडी मारून ट्रॅकवर आत जाऊन व्हिज्युअल्स घ्यायचे असं ठरलं. कॅमरामन जाताच आसपास उभे असलेले लोक, महिला चिडल्या. आम्हांला खूप ऐकवलं. तरी कॅमरामेन चढला. त्याला कॅमरा दिला तो आत ट्रॅक वर गेला. पण बाहेरच्या लोकांनी मला घेरलं. सगळ्यांना पुढे हात जोडले. म्हंटलं जे झालं ते दाखवणे आमचं काम आहे. समजून घ्या... ही मोठी बातमी आहे. तेव्हा जे सुचलं ते सांगितलं. थोडा वेळ वाद सुरु होता. मी त्यांना माझा मोबाईल दिला, कुणाला घरी फोन करायचा तर करा. मेसेज करा. इथे लोकांना मदत करण्यासाठी आलो आहोत. शेवटी सगळे शांत झाले.
कॅमरामेन व्हिज्युअल्स घेऊन परत आला. लोकांच्या बाहेर प्रतिक्रिया घेतल्या. आमचे रनर अण्णा त्यांच्या हातात टेप दिली. माहिमच्या दिशेने गेलो. माहिम स्टेशनला आत शिरल्यावर त्या पांढऱ्या फर्शीवर रक्त...काही समजेना. ट्रॅक वर गेलो. फाटलेला आख्खा डब्बा समोर. ट्रॅक वर काही मांस, रक्त, माहिम स्थानकातील जखमी, मृतदेह सगळं गेलेला. पण तरीही मागे खुणा ठसठशीत.
ट्रॅक वर चालताना पाऊस आला. जणू रक्त साफ करून गेला. त्या खुणा मिटवून गेला.. लोकांचे एक एक अनुभव. अंगावर काटे आणत होते. टॅक्सी थांबली नाही. समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनी चादरी आणल्या. शरीराचे तुकडे उचलून टाकले. काही टॅक्सी वाल्यांनी मार खाल्ला. सीट ख़राब होईल म्हणून जखमींना घ्यायला नाकारत होते.
माहिमला व्हिज्युअल्स, प्रतिक्रिया घेऊन अंधेरीच्या दिशेने निघालो. ऑफिसकडून मेसेज आला, सोनिया गांधी कूपर हॉस्पिटला भेट देऊ शकता तिथे जा.
रस्त्यात ज्यांना जमेल त्यांना लिफ्ट दिली. जागोजगी मुंबईकर उभे राहून बिस्किट, फळं आणि पाणी वाटत होते, जबरदस्ती हातात बिस्किटाचा पुडा कोंबत होते. त्यांनी दिलेलं आम्ही इतरांना वाटत होतो. कूपरला पोहोचलो. कूपर मध्ये सगळ्यात जास्त मृतदेह आले आहेत ते कळलं. जिथे जखमी आणि मृतदेह होते, तिथे पत्रकारांची तपासणी करून पाठवत होते. आतमध्ये गेले. आयुष्यात पहिल्यांदा इतके मृतदेह पाहिले एकाच वेळी. काळे...नीळे...केस जळलेले.... कुठे नुसते हात.. तिथून जखमींच्या वॉर्ड मध्ये गेले. छर्रे डोक्यात गेलेले काही जण....काही बेशुद्ध...काही शुद्धित.... तेवढ्यात एक बाई जोरात किंचळली.. नर्स धावत तिच्याकडे गेली... इंजेक्शन दिलं...झोपवलं तिला.... नर्सने सांगितलं.... शॉक लागला आहे तिला...ती मध्येच उठून ओरडते.
हे सगळं एकामागून एक घडत होतं. आजपर्यंत असं काहीच पाहिलं नव्हतं. हे सगळं आतमध्ये अजूनsync पण नव्हतं झालं. ह्या सगळ्यात आई नेमकी कुठे आहे ह्याचा पत्ता लागत नव्हता. आई पण त्याचवेळी घरी जायची. फोन लागत नव्हते. पप्पा घरी पोहचले होते इतकं माहित होतं.
आम्हांला जखमींची किंवा मृतांची जी नावं हॉस्पिटलमध्ये मिळतील ती ऑफिसला द्यायला सांगितली. कारण अनेकजण एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वेड्या सारखे फिरत होते. आपला माणूस कुठे आहे..जिवंत आहे की मेला, जिवंत आहे तर काय अवस्था, मेला तर मृतदेह कुठे? हॉस्पिटलमध्ये इतका गोंधळ. नातेवाईकांची रडारड, कोणी अस्वस्थ मनाने कुणाला तरी शोधत होतं. आसपासची लोक पाणी, जेवणाच सामान घेऊन आले होते. प्रत्येकाला आस्थेने विचारत होते. त्यात काही राजकारणी पण पांढरे शुभ्र कपडे घालून आले. काही चॅनेलवाल्यांना बाईट दिला. की मी कशी मदत करतोय. खाण्याचं सामान दिलं... त्यांचं बोलणं ऐकून लोक चिडले. आरडा ओरडा झाला...नेता गुपचुप निघून गेला.
ह्या सगळ्या गडबडीत एक काका भेटले.. ते त्यांच्या मुलाला शोधत होते. त्यांचे इतर कुटुंबातील सदस्य दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शोधत होते. त्यांनी मला पण विचारलं... ह्या नावच कुठे कोणी दिसलं, भेटलं का... ते अस्वस्थ होऊन फिरत होते. ते एकटेच फिरत होते. आम्ही बातम्या करत फिरत होतो. काही वेळाने ते काका एका कोपऱ्यात रडत असताना दिसले. ते इतकंच म्हणाले बॉडी यही है.
गेले चार-पाच तास ज्या मुलाला शोधत होते, त्याचा मृतदेह तिथेच होता. इतर कुटुंबियांना कळवलं होतं. पण आता बंध तुटला. एकटे रडत होते.. त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला.... पाणी दिल..... गप्प रडत होते.... थोड्या वेळाने काही कुटुंबातील सदस्य आले... आम्ही परत बातम्यांच्या मागे..
हॉस्पिटल मध्ये रक्तदान करा.. असा बोर्ड लावला होता... मी आणि कॅमरामेन दोघं रक्तदान करायला गेलो... तर तिथे कळलं की आसपासच्या इतक्या लोकांनी रक्तदान केलं की हॉस्पिटलने सांगितलं आता रक्ताची गरज नाही.... गरज पडल्यास संपर्क करू... नाव आणि फोन नंबर दया.... आम्ही नाव नोंदवलं.... अंधेरी ऑफिसला जाऊन फिड, बातम्या दिल्या.
मध्यरात्री कधी तरी आईशी बोलण झालं.. ती सुरक्षित होती.. बोरिवालीला आईच्या ट्रेनमध्ये ब्लास्ट झालेला... आई बोरीवली वरुन बस, रिक्षा, टेंपो... असा प्रवास करत विरारला पोहोचली होती.. रात्री 3.30 च्या सुमारास पुन्हा नरीमन पॉइंट ऑफिसच्या दिशेने निघालो....आता जाणवलं की आपण आज जेवलोच नाही आहोत... दादरच्या जवळ कोणत्या तरी हॉटेलच शेल्टर खाली खेचलेलं..पण पोलिस बाहेर खात उभे होते. तिथेच मी, कॅमेरामन आणि ड्राईवरने पाव भाजी खाल्ली..
नरीमन पॉइंट ऑफिसला आलो.. काही रिपोर्टर सकाळी पुन्हा लोकल ट्रेन सुरु झाल्या ती बातमी करायला गेले..मी घरी आले.. फ्रेश होऊन पुन्हा ऑफिसला गेले... या बॉम्बस्फोटात अनेक जखमीचे अनुभव त्यांच्या बातम्या करायला..
ह्या बोम्बस्फोटच्या वेळी मराठी न्यूज चॅनेल्स 24 तास नव्हते.. ई टीव्ही मराठीला तर काही तासांनी बातमीपत्र होतं. संध्याकाळी 7 चे 'महाराष्ट्र माझा', रात्री आपली मुंबई ही बातमीपत्रं सगळ्यात जास्त पाहिली जात होती. संध्याकाळी 6.25 ला ब्लास्ट झाले तरी एवढ्या कमी वेळात 7 वाजता बातमी गेली. बातमीपत्रांमध्ये खाली टिकरवर हॉस्पिटल आणि रुग्णांची नावं द्यायला सुरुवात केली. आम्ही सगळे रिपोर्टर्स ही नावं अपडेट करत होतो. बातमीपत्र नसतानाही माहिती देणारे टिकर सुरु होते.
पत्रकारितेत आल्यावर पाहिलेला , रिपोर्टिंग केलेला हा पहिला दहशतवादी हल्ला होता. तेव्हा मीडियाकडे स्मार्ट फोन नव्हते. शूट केलेला फिड पाठवण्याची साधनं कमी होती.. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया रांगत असताना झालेला हा हल्ला होता.
बातम्या कशा करायच्या काय करायचं. हे सगळं आम्ही तेव्हा शिकलो. अशा घटनांच्या वेळी डोकं शांत ठेवून काय टाळायचं. नेमके काय करायचं. ही घडण झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा वेळी पत्रकार असलो तरी माणूस म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजे हा धडा ह्या रेल्वे बॉम्बस्फोटाने दिला
Wednesday, 2 September 2015
राजधानीची शिकवण!
दिल्ली सोडून एक वर्ष झाल..दिल्लीतील शेवटचे काही दिवस हे दिल्लीत चार वर्षाची शिकवण पुन्हा एकदा देणार ठरल.
2010-2014 चार वर्ष दिल्लीत काढली..लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं होत..
२०१४ लोकसभा निवडणुका झाल्या...मुंबईत परतं जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले...नोकरीच्या शोधात होते...या सगळ्यात एक समस्या अशी होती की,ज्या घरात रहात होते,तिथे साधारण लोकसभा निवडणुकीपर्यंत राहिन अशी कल्पना होती..रूममेटचं लग्न ठरलेलं...ती लग्न करून ऑगस्टमध्ये नवर्याबरोबर परत येत होती,त्यामुळे ते घरं सोडण्याशिवाय पर्याय नव्हता..चार वर्ष,चार घर झाल्यावर मलाही घराचे वेध लागलेले..पुन्हा घरं शोधा,सामान शिफ्ट करा...सगळ नकोसं झालेल...एकीकडे घर सोडण्याची डेड लाईन....दुसरीकडे नोकरी मिळेना....
रूममेट येणार म्हणून माझ टीव्ही,फ्रिज सामान दीड-दोन हजार रूपयात विकून टाकल..घरातील पुस्तक कपडे बॅगा भरल्या...एक मुव्हरर्स आणि पॅकर्स जस्ट डायल वरून शोधला...त्याला सांगितलं हे सामान मुंबईत घरी पाठवायचं,पैसे दिले,,,तो घरी आला तेव्हा असं जाता जाता म्हणाला..."आप तो अकेली है,घर में मर्द नही..कितनी परेशानी होती होगी..कैसे कर लेते है आप..." आता या माणसाला काय उत्तर द्यायचं म्हणून गप्प बसले...सामान वेळेत गेल..म्हणून टेन्शन गेल...
आता रहायला घरं हवं होतं...रक्षाबंधानानिमित्त पंधरा दिवस एक मैत्रिण गावी जात होती..ती म्हणाली माझ्या घरी रहा..त्यामुळे किमान पंधरा दिवस राहण्यासाठी घरं मिळाल..या दरम्यानं नोकरीचा शोध सुरू होता..घरी पाठवलेलं सामान घरी दहा दिवस होऊनही पोहचलं नव्हतं...फोन केला तर तो मुव्हर्स आणि पॅकर्सवाला फोन उचलतं नव्हता,,थोड टेन्शन आलं..
दोन-तीन दिवसाने त्याने फोन उचलला,म्हणाला,"मॅडम टेन्शन मत लो,सामान पहुंच जायेगा"
परत काही दिवस वाट पाहिली..सामान अजून पोहचल नव्हत...एकदा त्याला फोन केल्यावर तो इतक्या वाईट टोनमध्ये बोलला,"मॅडम इतना टेन्शन मत लो,आईना,जरा हम से मिलीये..बैठ के बाते करेंगे" तिथेचं डोकं खराब झालं...आणि मग त्याला शिव्या दिल्या...दिवसेंदिवस त्या माणसाशी बोलण कठीण झाल..फोन केला तर उचलणार नाही...उचलला तरं हे असं बोलण....सामान घरी पोहचलं नव्हत...परत दहा फोन केल्यावर कळलं सामान मुंबईत गोडाऊन मध्ये पडलं आहे..आणि सामान घरी शिफ्ट करण्यासाठी मी दिलेले पैसे त्याने मुंबईतल्या माणसाला दिले नव्हते..उलटं मलाचं फोन करून सांगितल,सामान घेऊन जा गोडाऊनमधून...
मग अजून चिडचिड झाली...पैसे दिले,विश्वास ठेवला आणि आपल्याला खड्ड्यात घातल..मुंबईतला मुव्हर्सवाला चांगला होता,तो म्हणाला"दीदी हमे पैसा नहीं दिया हम क्या करे"
ह्या सगळ्या गडबडीत मुंबईत नोकरी मिळाली...लवकर दिल्ली सोडावी लागणार होती कारण पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस मैत्रिणीकडे राहत होते..ती पण गावावरून परत आलेली..तिचे घरमालक ही विचारत होते..
मुंबईत परत जाण्याची तयारी सुरू होती... पण मुंबईत माझं सामान गेलं नव्हतं...शेवटी त्या मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याच्या ऑफिसला नोएडामध्ये गेले...पत्ता शोधता शोधता नाकेनाऊ आले...दिलेल्या पत्त्यावर गेल्यावर धक्का बसला,तिथे त्याचं ऑफिसचं नव्हत..त्याने दिलेल्या पत्त्यावर दुसऱ्याचं एका मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याचं ऑफिस होतं...आता तर खूपचं राग आला..आपल्याला एका माणसानं फसवल..आपण शिकलेले,दिल्लीचा अनुभव नेहमीचं वाईट येऊनही आपण आपलं सामान असं दिलचं कसं...बाजूच्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की त्या मुव्हर्सवाल्यानं असं अनेक महिलांना फसवलं आहे...काही महिला इथेही येऊन गेल्या आहेत...हे ऐकून तर वाटतं होतं, आपण इतके मूर्ख कसे...कोणी आपल्याला इतक्या सहजपणे टोपी घालून जाऊ शकतो..
शेवटी नोएडा पोलिसांकडे गेले...त्यांना सगळा प्रकार सांगितला,नोएडा रिपोर्टर पण पोलिसांशी बोलला..पोलिसांनी त्यांच्या मोबाईल वरून त्या मुव्हर्सवाल्याला फोन लावला..त्याची चौकशी केली..मग विचारलं, हे रश्मी पुराणिकचं सामान का नाही घरी पाठवल...पैसे घेतलेस तरी सामान गोडाऊनला पडून आहे,वरून त्यांना सांगतोस सामान घेऊन जा..पोलिसांचा चढता सूर पाहताच पाच मिनीटात मुव्हर्सवाल्याने हार मानली..आजच्या आज सामान घरी पोहचवतो..असं सांगितल..पोलिस मला म्हणाले तुम्ही मला संध्याकाळी सामान घरी पोहचलं की नाही कळवा..मी जस्ट डायलाला पण फोन करून या मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याची तक्रार केली..त्याचं ऑफिस नाही,खोटा पत्ता दिलाय,सर्विस अनेकांना दिलेली नाही,वाईट भाषेत बोलतो...जस्ट डायलने मेलवरून तक्रार घेतली,त्याला डिलीस्ट करू सांगितल.
तिथून ऑफिसला गेले,काही काम बाकी होतं...ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन आला...जो माणूस एवढे दिवस माझा फोन उचलतं नव्हता...उचलला तर अर्वाच्य भाषेत बोलतं होता..तो आता माफी मागत होता..
मला म्हणाला,"मॅडम,क्या आप..पुलिस के पास क्यू गई..मैंने आपको कहा था सामान घरं पहुंच जायेगा."
इतकचं ऐकून डोक असं सटकल....आजपर्यंत आयुष्यात ज्या शिव्या दिल्या नव्हत्या...ग.भ.भ.न ची संपूर्ण बाराखडी त्याला बोलून दाखवली आणि..सांगितलं तुझ्यासारख्या लोकांना पोलिसांची भाषा समजते..तू अनेक महिलांना फसवलं तेव्हा लाज वाटली नाही का...मग म्हणाला, इतरांचं सोडून द्या,तुमचं सामान घरी पोहचवतो..त्याचा आवाज ऐकून इतका राग येत होती की फोन कट केला.
दोन तासात मुंबईत घरी सामान आलं...त्यानंतर चोवीस तासाने मी दिल्ली सोडली मुंबईसाठी...पण शेवटच्या दिवसापर्यंत दिल्ली शिकवतं राहिली...कोणावरही विश्वास ठेवू नये..
Friday, 25 July 2014
महाराष्ट्र सदन आणि चपातीचं राजकारण!
आज संसदेत कामासाठी गेले तेव्हा एका हिंदी चॅनेलच्या पत्रकारानं प्रश्न विचारला, "कहा पे दबा के रखा था व्हिडिओ?" हा प्रश्न ऐकून डोक तडकल,त्याला म्हटल, "इतना घटीया सवाल मुझेसे किसीने नही किया ..पिछले हफ्ते से मराठी मीडिया क्या स्टोरी दिखा रहा था, ये पहले देखो,फिर बात करो"..मी चिडलेय पाहून त्यानं विषय बदलला..पण इंग्रजी दैनिकात सदनातील शिवसेना खासदारांच्या आंदोलनाबाबत बातमी आली आणि तेव्हापासून दिल्लीत मराठी मीडियावर टीका केली जातेय,संसदेत कुणी हिंदी पत्रकारानं मराठी मीडिया Communal आहे,असा आरोप केला..म्हणूनज ठरवलं,जे झालं ते लिहायचं..
इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीनुसार, शिवसेनेच्या खासदारांना चांगल जेवण मिळालं नाही.म्हणून चिडले,सदनातील कॅटीनचे मॅनेजर जे मुस्लिम होते,ज्यांचा 'रोजा' होता,त्यांना शिवसेना खासदारांनी घेरलं आणि जबरद्स्ती अख्खी पोळी खायला लावली..त्यांचा रोजा तोडायला लावला,त्याला धडा शिकवण्यासाठी!पण हे सत्य नाही..त्यादिवशी असं मुळीचं झालं नाही..मग त्या दिवशी नेमकं काय झाल हे समजून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी
-गेले वर्ष सदन सुरू झाल्यापासून सदनाच्या खोल्या गळक्या,टॉयलेटस घाण,खोल्यामध्ये घाण पाणी,रूम सर्विस नाही,त्यात कॅटीनमध्ये मराठी जेवण नाही,ऑर्डर दिल्यावर कमीत कमी चाळीस मिनीट ऑर्डर देण्यासाठी लागतो,बऱ्याचदा मेनू लिहिलेले पदार्थ मिळत नाही..त्यामुळे कॅटीनमध्ये गेल्यावर जे मिळेल ते गिळावं अशी वागणूक ही सामान्य लोकांपासून ते लोकप्रतिनीधी आणि नेत्यांना मिळत होती.
- मे महिन्यात नवीन सरकार आल्यापासून शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉग्रेस-कॉग्रेसचे खासदार ज्याची दिल्लीत घरं नाही ते सदनात आले..सदनात मुख्यमंत्री-राज्यपाल,मंत्री,खासदार,आमदार यांच्यासाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत.जेव्हा खासदार आले,तेव्हा त्यांना जनरल रूम देण्यात आल्या....त्यातही आंघोळीला घाण पाणी,सोयी सुविधा नाही यावर गेले दोन महिने खासदार त्रस्त होते.ह्यात भरीस निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी उत्तर प्रदेशातील पहिल्यांच असलेले खासदार सत्यपाल सिंह यांना मंत्र्यासाठी असलेली खोली दिली.. (राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार धनंजय महाडिक सदनात आपल्या खोलीतील टॉयलेटची अवस्था पाहून पाच मिनीटात सदन सोडलं.)
-खासदारांचे कुटूंबिय आले तर छोट्या खोलीत जिथे फक्त दोन बेड आहेत,तिथं राहू शकत नाही,त्यात एक ज्यादा खोली मिळावी म्हणून सदन व्यवस्थापनाबरोबर खासदारांना भांडाव लागलं..म्हणून शेवटी खासदारांनी बिपीन मलिक यांना भेटण्यासाठी सांगितल.
-या सर्व प्रश्नाबाबत खासदार शिवाजीराव अढळराव-पाटील यांनी बिपीन मलिक यांना याआधीचं पत्र लिहिलं होत..पण मलिकांनी त्यावर उत्तर दिल नव्हतं.सदनात १७ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मलिक यांना भेटण्यासाठी खासदार सदनात आले...पण मलिक आले नाही..खासदार संसदेत गेले..आणि मलिकांना दुपारी १२.३० वाजता भेटायचा निरोप दिला
-दुपारी १२.३०ला महाराष्ट्र सदनात शिवसेनेचे खासदार आले,मीडियारूममध्ये ४५मिनीटं खासदारांनी मलिकांची वाट पाहिली,मलिकांनी मी विमानतळावर मुख्य सचिवांना घ्यायला गेलो,असा निरोप देऊन कनिष्ठ कर्मचाऱयांना खासदारांना भेटण्यासाठी पाठवलं.
-पत्र लिहून,निरोप देऊन,वाट पाहूनही बिपीन मलिक येत नाही,सदनातर्फे बोलण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी नेमकी नियम काय,कुणाला कोणती खोली का दिली,मराठी जेवणाचं काय,पाणी का घाण येत,याबाबत खासदारांना काहीचं समाधानकारक उत्तर दिली नाही..खासदार अजून चिडले...सगळे सदनातील बिपीन मलिक यांच्या कार्यालयाकडे जायला निघाले,त्याआधी कॅटीन होत..जेवणाची परिस्थिती पाहण्यासाठी खासदार तिथे गेले..
-सदनातील कर्मचार्यांनी पण खासदारांना पाण्यासारख सूप,पाण्याची डाळ,रबरासारख्या चपत्या सगळं दाखवल..खासदार किचनमध्ये शिरले...चिडलेले खासदार येत आहेत,म्हणून अनेक जण पळून गेले,काही अचानक साफ सफाई करू लागले..
-यात हा मॅनेजर खासदारांच्यासमोर आला (त्याचं नाव अर्शद आहे, वर्तमानपत्रात वाचून समजल)..राजन विचारेंनी समोर असलेली चपाती त्यांच्या तोडांकडे नेली, त्यांची तत्काळ प्रतिक्रिया होती, "हे खाऊन बघ, तू तरी असं अन्न खाशील का?"..त्यावेळी मॅनेजर "माझा उपवास आहे," हे म्हटल्यावर आणि त्या गोंधळात हे विचारेंना कळल्यावर ते थांबले,खाली पडलेली चपाती उचलून बाजूला ठेवली..पण तेव्हा मॅनेजरने चपाती मुळीच खाल्ली नाही.
-कॅटीन पाहून खासदार बाहेर पडले,मीडिया बाहेर निघत होता,आम्ही बाहेर जात असताना मॅनेजर त्याच्या आसपासच्या लोकांना सांगत होता,"मेरा रोजा था,मेरा रोजा तूट गया!"..हे ऐकल्यावर त्या गडबडीत Sorry म्हणतं बाहेर पडले!
-थोड्या वेळाने राज्याचे मुख्य सचिव आले,त्यांच्यासमोर खासदारांनी सगळं सांगितल..महाराष्ट्र सदनाच्या कर्मचाऱ्यांनी तेव्हा माहिती दिली की सदनातील एका महिला कर्मचाऱ्यांने कॅटीनमधील कर्मचाऱ्यांना चपाती कशी लाटायची,करायची हे प्रात्यक्षिक स्वत करून दाखवलय..सचिवांनी सगळं ऐकून घेतल म्हणाले योग्य ती कारवाई करू!
आता प्रश्न असे
-शिवसेना खासदारांच्या आंदोलनाची पध्दत चुकली का?- उत्तर हो, कुणावर जबरदस्ती अन्न खा,हे चुकल.
-पण हे ठरवून खासदारांनी केल का?-नाही
-हा प्रसंग घडत असताना तो मॅनेजर मुस्लिम होता हे खासदारांना माहित होत का?- तर नाही..हे घडत असताना मॅनेजर म्हणाला उपवास आहे- 'रोजा' आहे, हे त्यानं नाही सांगितल.
-खासदारांनी मॅनेजरला अख्खी पोळी खायला लावली का?- नाही..
मग असं सगळं असताना अशी दोन समाजात द्वेष पसरवणारी बातमी आली कशी?महाराष्ट्र सदनात बिपीन मलिक या निवासी आयुक्तांचा मनमानी कारभार सुरू आहे..सदनाची -कॅटीनची अवस्था,मराठी जेवण नाही,खासदारांना होणारा त्रास,मराठी कार्यक्रमांना दिली न जाणारी परवानगी या सगळ्याबाबत गेले एक आठवडा मराठी मीडिया बिपीन मलिक यांच्याविरोधात सतत बातम्या देत आहे..अगदी मराठी केंद्रीय नेत्यांच्या सह्याद्री कार्यक्रमाला या बिपीन मलिक यांनी परवानगी दिली नाही..पण हे मलिक आपल्या सनदी अधिकारी मित्रांना सदनात बोलवून जेवणाची मेजवानी मात्र देतात..(सदनात कसेही नियम लावले जातात-याचा सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे गेल्या वर्षी एका महिलेला,ज्यांनी पाच हजार रूपये भरून खोली घेतली होती,तिला अचानक रात्री बारा वाजता बाहेर काढलं..आणि जुन्या महाराष्ट्र सदनात सामानाच्या खोलीत सोय केली,हे प्रकरण National Human Rights Commissionमध्ये गेलेलं..)हे सगळं बिपीन मलिक यांच्याविरोधात जात असताना, शिवसेना खासदारांच्या विरोधात इंग्रजी माध्यमात बातमी आल,. हा काही निव्वळ योगायोग नाही.
पण यावेळी मात्र हद्द झाली...शिवसेनेच्या खासदारांनची जिरवण्यासाठी जे झाल नाही ,ते झालं असं दाखवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.राजकारण,एकमेकांवर कुरघोडी हे नेहमीच सुरू असते...पण समाजात व्देष पसरेल,हिंदू-मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण होईल अशा बातम्या देण,ही मोठी चूक आहे. स्वतच्या स्वार्थासाठी दुसर्याच्या खांद्यावर धर्माची बंदूक ठेवून समोरच्याला मात देण-राजकारण या पातळीवर आणण-हे भयावह आहे.दिल्लीत येणार्या प्रत्येक माणसासाठी आपल्या राज्याचं सदन-भवन हे आपल्या घरासारखं अत...पण निवासी आयुक्त मात्र मराठीचा व्देष करतात.हे अजून किती काळ..आपल्या घरात आपलाचं अपमान होणार असेल,आपल्याचं घरात आपल्याला न्याय मागण्याची वेळ आली याहून वाईट काय?
हे सगळं मुख्यमंत्र्यांना माहिती आहे..महाराष्ट्र सदनात येणारे अनेक नेते,पत्रकार यांनी वेळोवेळी कल्पना देण्यात आली..पण मुख्यमंत्री मात्र इतकं होऊनही ढिम्म आहेत. अस का? याचं उत्तर शोधताना मला नारायण राणेनी राजीनामा देताना दिलेली काही कारण आठवली राणे म्हणाले, मुख्यमंत्री निर्णय घेत नाही आणि त्यांचा प्रशासनावर अंकुश नाही...महाराष्ट्र सदनात सध्या झालेलं हे प्रकरण पाहताना राणेंचे हे आरोप पटतात...दिल्लीत मराठी माणसासाठी घर असलेल्या सदनाला लागलेल्या दुरावस्थेचं ग्रहण खरचं कधी संपणार?...राजकारणापलिकडे जाऊन या वास्तूचा सन्मान सरकार आणि राजकारणी करणार क?
Saturday, 15 February 2014
त्यागामागचं राजकारण!!
अरविंद केजरीवालयांनी राजीनामा देऊन एक मुद्दा तरी सिध्द केला...आम आदमी पक्ष हा इतरपक्षांपेक्षा वेगळा नाहिये..केजरीवाल हे प्रचंड महत्त्वाकांक्षी नेते आहेत-सत्तेचंत्यांना आकर्षण आहे..आणि सत्ता मिळवण्यासाठी लोकांशी भावनात्मकरित्या जोडणंमहत्त्वाचं असतं..हे त्यांना समजतं असल्याने काल त्यांनी मुख्यमंत्रीचा आपण कसात्याग करत आहोत,असं चित्र उभं करण्यात त्यांना यश मिळवलं...आणि दिल्लीतील जनता असेल आणि अनेकांना वाटतं..की कुठे सत्तेसाठी हपालेले नेते आणि कुठे त्याग करणारेअरविंद केजरीवाल....
खरयं...पण यात मेख हीआहे..केजरीवाल काल म्हणाले, आता आपण विधानसभेत जनलोकपालला समर्थन करणारे सत्तर जणपाठवू..म्हणजे आम आदमी पक्ष बहुमतानं विधानसभेत यावे,ही त्यांची खरीमहत्त्वकांक्षा आहे...आता ही पूर्ण कशी होणार?..तर ती –अशी की लोकांना मी कसा सत्तेचात्याग केला..मला कॉग्रेस-भाजपाने कसं काम करून दिलं नाही हे दाखवतं ते पुन्हामतदारांकडे जाणार...पण याचाचं अर्थ Majorityने निवडून येण्यासाठी त्यांनी हा डावखेळला..त्यांना माहितीये,जनमत आपल्या बाजूने आहे..त्यामुळे त्यागाचं हे चित्र खपून जातयं.
अर्थात अनेक राजकीयपक्ष असे इमोशनल मुद्दे वापरतात..त्यात गैर काही नाही...फक्त आपण तेवढे सोवळे...आणि बाकीचे वाईट..हे मात्र चुकीचं..तुम्ही ही इतर राजकीय पक्षांप्रमाणेचं लोकांच्या भावनांशी खेळतं आहात..आणि तुम्हीही त्यांच्यापासून वेगळे नाही आहात..आणि मला आनंद आहे..काल राजीनामा देऊन केजरीवाल यांनी हे सिध्द केलं.
आता मुद्दा जनलोकपालचा...अनेकांना वाटतयं अरविंद केजरीवाल यांच्यावर कसा अन्याय होतोय..पण जनलोकपालचा हट्टाहासचं मुळी चुकीचा आहे..अरविंद केजरीवाल आणि अण्णांनी आंदोलन करून तेव्हा जनलोकपालची मागणी केली..ज्यानुसार केंद्रात जनलोकपाल आणि राज्यात लोकायु क्तबंधनकारक असणार..आता केंद्र सरकारनं लोकपाल कायदा आणला आहे..त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लोकायुक्त कायदा येणार..मग दिल्ली यासाठी अपवाद का?...मला जनलोकपालचं हवं-हा हट्ट का?..
बरं केंद्र सरकारचा आदेश आहे-दिल्लीतील कायदे-bill सभागृहात मांडण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते कारण दिल्ली Union territory आहे..हा केंद्राचा आदेश पटतं नसला तर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देणं केजरीवाल यांना शक्य होतं..केंद्र सरकारचा हा आदेश खरचं जाचकं आहे..पण त्याला आव्हान देता येतं ना!!
-म्हणजे २जीप्रकरणात सुब्रहमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली..केंद्र सरकारने auction न करता दिलेले २जी ची सर्व लायसेन्स त्यांनी रद्द करायला लावली..यूपीए सरकारमधील मंत्र्यांना तुरूंगात जावं लागल..
कोळसा खाण घोटाळ्याचमहाराष्ट्राचे खासदार हंसराज अहिर यांना काहीतरी गडबड आहे जाणवली.. त्यांनी CAGला या प्रकरणात लक्ष घालायला सांगितल..कॅगने ऑडिट केलं घोटाळा बाहेर आला!
मग जर अरविंद केजरीवाल यांना खरचं जनलोकपाल आणायचं होतं..तर त्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच आव्हान का दिलं नाही?...त्यापुढे जाऊन दिल्लीत लोकायुक्त आणून त्यात त्यांना हवे तसे बदलं करता आले असते...पण असं काहीही न करता फक्त आणि फक्त लोकांच्या समोर एक नाट्य उभं करत..कॉग्रेस-भाजपा माझ्या विरोधात कट करतात असा कांगावा करणं कितपत योग्य आहे?
यापुढे जाऊन काल विधानसभेत आप सरकारनं जनलोकपाल आणण्यासाठी जे काही केलं ते संविधान नियमांच्या किती विरोधात होतं...सरकार जे सांगणार तसचं होणार..तुमच्या पक्षाच्या स्पीकरलादावणीला बांधून मनासारखं –पण नियमांच्या विरोधात काम करणं किती चुकीचं!!
काल उपराज्यपालांनी स्पष्ट पत्र लिहून सांगितलं –की माझी परवानगी घेतलेली नाही..त्यामुळे असं बिलं सदनात मांडल जाऊ शकत नाही..आणि नियमांनुसार उपराज्यपालांच्या या पत्रावर मतदान होऊन विषय संपला पाहिजे होता..पण स्पीकर आधी पत्र वाचायला तयार नव्हते..दबाव आणला भाजपा आणि कॉग्रेसने म्हणून पत्र वाचल..मग त्यावर मतदानासाठी तयार नव्हतं सरकार...मग जनलोकपाल बिल प्रस्तुत करायचं का? यावर मतदान करून- बघा भाजपा-कॉग्रेसकसे जनलोकपालच्या विरोधात आहेत-हे चित्रं आपने उभं केल..पण खरी गोष्ट हीआहे..नियमानुसार कामकाज झालं पाहिजे..जर आता केजरीवाल छोटे नियम तोडणार आणि विरोधीपक्षांनी बोलू नये अशी अपेक्षा आहे का?..मग उद्या तुम्ही अजून मोठे नियम तोडाल! लोकशाहीतं विरोधीपक्ष हे सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठीचं आहे..अर्थात त्यातही राजकारणं असतं..हे कोणी नाकारतं नाही..पण जनलोकपालच्या कालच्या मुद्दयावर तरी नियम तोडण्याचे प्रयत्न दिल्ली सरकारकडून सुरू होते...
आता शेवटचा मुद्दा-आज योगेंद्र यादव म्हणाले २०१४च्या निवडणुकीत कॉग्रेस-युपीए Politically irrelevant झाले आहेत..नरेंद्र मोदी सत्ता परिवर्तनाची लढाई लढणार असतील तर आम्ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढणारं...ऐकायला इतंक छान वाटतं...पण जर तुम्हांला दिल्लीच्या जनतेनं सत्ता दिली..त्यांच्यासाठी काम करण्याची संधी दिली..तुम्हीव्यवस्थेत राहून काही केलं का?...तुम्ही पुन्हा व्यवस्थेच्या विरोधाच बंडाचा झेंडा फडकावला!...व्यवस्था बदलण्यासाठी वेळ लागतो...त्यासाठी व्यवस्थेत राहून झगडावं लागतं..ही संधी तुम्हांला मिळाली पण..ती सोडून लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही धावलात..?
आणि पुन्हा व्यवस्था परिवर्तनाचा राग आळवताय..हे काही बरोबर नाही..
आपल्या देशात त्यागाचा इतका बागुलबुवा केला जातो...पण राजकारणात तुम्ही येता,निवडणुकीसाठी उभे राहता तेव्हा सत्तेत येऊन काही करणं हे ध्येयं असतं..मग सत्तेत आल्यावर तिथं टिकणं,काम करणं..सतत झटतं राहण महत्त्वाचं...जर इतकाचं त्याग करायचाय आणि सत्ता नको वाटते..मग राजकारण कशाला हवे...समाजकारण आहेच की...
त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या या त्यागा मागचं राजकारणं कुणाला कळेल की नाही माहितं नाही..पणकेजरीवाल हे किमान हे इतर राजकीननेत्यांसारखे आणि आम आदमी पक्ष हा इतर राजकीय पक्षांसारखाचं आहे -हे मात्र स्पष्ट झालं.
Saturday, 28 December 2013
राजकारण- आम आदमीच्या (समजुतीच्या) पलिकडेचं!!
आम आदमीपक्षाविषयी लिहिलं तो एक राजकारणाचा Emotional भाग होता..आपल्या देशात मतदार असाचं विचारकरतात...जेव्हा सरकार विरोधात प्रचंड राग आणि चीड असते...आणि अशावेळी जर कोणी छोटीशी पण दाखवली..तर लोकं त्यांना मतदान करतात...पण राजकारणाचा एक Practical भाग आहे, ज्यानुसार राजकारण चालतं...
दिल्लीत निवडणुकाझाल्या..भाजपाला 31 (अकाली दल 1) , आपला 28, कॉग्रेसला 8, अपक्ष 2 जागा मिळाल्या.
#भाजपा
-भाजपाने दिल्लीत सत्तास्थापन केली नाही कारण त्यांच्याकडे बहुमत तर नव्हतं पण त्यांना राष्ट्रपती राजवटलागू होऊन, विधानसभा आणि लोकसभा पुन्हा व्हाव्यात असं वाटतं होतं
-कारण दिल्लीतविधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकं म्हणतं होती..."विधानसभा के लिए अरविंद और लोकसभा के लिए मोदी!"
-कोणाला मानायचं नसलं तरी नरेंद्र मोदी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे..जो तरूणाईला, मध्यमवर्गीयांना,कॉग्रेसविरोधात प्रचंड राग असलेल्या जनतेत आहे....जर दिल्लीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर सगळ्यात जास्त फायदा भाजपाला होईल.
-त्याहून महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्ष दिल्लीतचं अडकून पडेल...आम आदमी पक्षाकडे कार्यकर्ते नाहीआहेत..या पक्षाचा एकचं चेहरा आहे, अरविंद केजरीवाल...जर केजरीवाल हे दिल्लीतल्या दोन निवडणुकांमध्ये गुंतले तर आम आदमी पक्ष दिल्लीबाहेर जास्त ताकद लावू शकणार नाही, मर्यादा येतील त्यांच्यावर!
#आम आदमी पक्षाविषयी
-आम आदमी पक्षविरोधी पक्षात बसायला तयार होता..त्यांना आपल्याला सत्ता स्थापन करावी लागेलं असं वाटलचं नाही...पण कॉग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची अडचण झाली.
-सत्ता स्थापन केलीनाही तर लोकंच दोष देणारं...संधी मिळून पण जबाबदारी टाळली...आणि कॉग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली तर दोष..म्हणून जनसभा करून त्यांनी हे दाखवलं दिल्लीची जनता सांगतेय म्हणून आम्ही सत्ता स्थापन करतोय.
-पण हे करताना आम आदमी पक्षाने हे स्पष्ट केलं की आम्ही कोणाचाही पाठिंबा घेतला नाही..तीन जानेवारीला विश्वासमत सिध्द करताना ज्यांना पाठिंबा द्यायचाय त्यांनी द्यावा..
-आम आदमी पक्ष तीनजानेवारी पर्यंत सात दिवस सरकार स्थापन करण्याच्या हिशोबानं आलयं...जर टिकलं तर त्यांना दोन महिने मिळतात.(फेब्रुवारी पर्यंत लोकसभा निवडणुक जाहीर होईल, Code of Conduct लागल्यावर कोणतेही निर्णय होत नाही) या दरम्यानं लोकांसाठी काही मोठे निर्णय घेऊन आपण करून दाखवलं हे सांगत लोकसभा निवडणुकीला सामोरं जाता येईलं.
-जर तीन जानेवारीला सरकार पडलं तरी लोकांचा पुन्हा emotional पाठिंबा मिळेल, "अरे इन्होंने कोशिश तो की...दुसरीपार्टीयों ने सरकार चलने नहीं दी.." .त्यामुळे आपचं सरकार चालण ही आप पेक्षा दुसऱ्यापक्षांवर जबाबदारी जास्त आहे...कारण हे सरकार पाडल्याचं पातकं कुणालाही नकोय..
-आपने दिल्लीत सरकार स्थापन केल्यामुळे दिल्लीबाहेर हा पक्ष वाढायला, त्यांना मदत होतेय...राजकारणात असाही बदल घडू शकतो दाखवल्यामुळे आपकडे अनेक तरूण, सुशिक्षित वळतं आहेत..आपची सध्या वेगवेगळ्या राज्यात कार्यकर्ता नोंदणी सुरू आहे..त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय..लोकसभा निवडणुकीसाठी किमान आपकडे दिल्लीबाहेर कार्यकर्ते तरी वाढत आहेत ...जे आता कमी आहेत..
#आता सगळ्यातमहत्त्वाचं म्हणजे कॉग्रेस
-कॉग्रेस हासत्ताधाऱ्यांचा पक्ष आहे...हे उगीचं कोणी म्हणतं नाही...कॉग्रेसला नुसत्या निवडणुकाचं जिंकता येत नाही...तर विरोधकांना सत्ता स्थापण्यापासून अडवता ही येतं..चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये सडकून मार खाल्यावर कॉग्रेसने किमान दिल्लीत भाजपाला सत्ता स्थापन करू दिली नाही.. म्हणून त्यांनी आपला पाठिंबा देत पुढे केलं..
-नितीन गडकरी काल जे म्हणाले त्यात तथ्य आहे...कॉग्रेसला या गोष्टीची पुरेपूरं कल्पना आहे की २०१४ च्यालोकसभा निवडणुकीत त्यांचं पानिपत होतं आहे....पण ही सत्ता काहीही झालं तरी नरेंद्र मोदींच्या हातात त्यांना जाऊ द्यायची नाही....त्यासाठी जे जमेल ते करायचंय!! ( नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये बारा वर्ष जितका त्रास कॉग्रेसने दिलाय, त्याची परतफेड करण्याची एकही संधी कॉग्रेसला त्यांना द्यायची नाही! )
-कॉग्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना ताकद देतंय...जसं बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांना ते जवळ करणार आहेत..(लालू तुरूंगातून बाहेर येताचं नरेंद्रमोंदीच्या विरोधात बोलले)..उत्तर प्रदेशात मायावतींना ते जवळ करतील...ज्या ज्या राज्यांमध्ये जमेल तिथे ते मोदींच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करतील....
-२००९ लोकसभाच्यावेळी मुंबईत लोकांनी Emotional होऊन मनसेला भरभरून मत दिली...याचा फायदा झाला कॉग्रेसला...त्यांचे खासदार निवडून आले...असाच फायदा कॉग्रेसला आपचा शहरी भागात करून घ्यायचा आहे.
- आपला दिल्लीत तरूणांनी, पहिल्यांदा मतदान करणारे, मध्यमवर्गीय, सुशिक्षित,सोशल नेटवर्किंगचा प्रभावअसलेल्या मतदारांनी मत दिली...ही नरेंद्र मोदींची VOTE BANK आहे...आप आता ज्या ज्याशहरांमध्ये-राज्यांमध्ये जाईल तिथं ते कॉग्रेस विरोधातील पण नरेंद्र मोंदींनाअपेक्षित असलेली मतं घेतील..आणि कॉग्रेसचा फायदा होईल, असं कॉग्रेसला वाटतय....त्यामुळे आप जितकी मजबूत तितका कॉग्रेसचा फायदा
सध्या विविध राजकीयपक्षात, ज्येष्ठ पत्रकारांमध्ये ज्या चर्चा चालू आहेत, त्यातून आलेले मुद्दे आणि मला जे दिसतयं, कळतयं ते इथे मांडण्याचा प्रयत्न आहे..हे चित्र दुसर्यांच्या नजरेतून वेगळही असेल...पण राजकारण हा अतिशय Interesting Game आहे...मतदार हा Emotional असल्यामुळे त्याला कोणीभाबडी आशा दाखवली की तो त्याला मत देतो...पण त्याला हे समजतं नाही की त्यानेज्याला मत दिलं त्याचा खरा फायदा होतोयं कुणाला...आणि राजकीय पक्ष अशीच रणनीतीआखतं असतात...
Subscribe to:
Posts (Atom)
