Wednesday 25 November 2015

नाईट शिफ्ट...बातमी आणि मी

         मीडियाचा कोर्स करत असताना आम्हां सगळ्यांना रात्री जागून प्रोजेक्ट करण्याची,प्रेझेंटेशनची तयारी करण्याची सवय लागली...आणि रात्रभर कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी जमून कॉफी पित,गप्पा मारत अभ्यास व्हायचा..तेव्हा वाटायचं रात्री काम करण्यात एक वेगळी मज्जा आहे..इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्यावर नाईट शिफ्ट असते...आणि रात्री घुबडासारखं जाग राहून काम करण्याची इच्छा असल्याने नाईट शिफ्ट लागल्यावर खूप अप्रुप वाटलं...उत्साह वाटला..

मुंबईत नाईट शिफ्ट...रात्रीची मुंबई पहायला मिळणार याचं खूप कौतुक होतं...ईटीव्हीमध्ये ऑफिस सहाव्या मजल्यावर होतं आणि रात्री लिफ्ट नसते...सहा मजले चढून जाव लागणार .. तरीही नाईट शिफ्टचा उत्साह होता...नवीन नवीन लागल्यावर सर्व नाईट शिफ्टच्या रिपोर्टर्सचे नंबर घ्या...सगळ्यांशी बोला..संपर्कात रहा हे जमल..मग ठरवून नाईट रिपोर्टर्स चहा प्यायला भेटायचे...या भेटीतून दादर टीटी जवळील ज्यूस शॉपची ओळख झाली...जिथे पार मध्यरात्री दोननंतर पावभाजी,पिझ्झा मिळायचा...अगदी रस्त्यावर बसून लोक या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे...चर्चगेट बाजूला बनपाव,बटर,ब्रेडजाम मिळायचे...झीच्या चिंचपोकळी ऑफिसकडे पहाटे तीन नंतर गरम गरम पोहे आणि शीरा मिळायचा
झीमध्ये नाईट शिफ्ट असताना पोहे खायला जायचो..आणि मिलच्या सकाळच्या शिफ्टसाठी हे पोहे-शिरा लोक विकायचं हे कळलं...आता मिल राहिली नाही...त्या शिफ्ट राहिल्या नाही...पण पोहे शिराने नाईट शिफ्ट करणाऱ्या मिडीयामधील लोकांना आधार दिला....

            २००५मध्ये डान्स बार बंदी आल्यावर नाईट शिफ्ट पत्रकारांसाठी ठरलेली बातमी म्हणजे कोणत्या तरी बारवर पोलिसांनी घातलेली रेड...एकदा रविवारी घाटकोपरमध्ये रेड पडलेली...ईटीव्हीमध्ये रविवारी ऑफिसची गाडी नसायची त्यामुळे आम्ही टॅक्सी करून फिरायचो...रेड पडली कळल्यावर खाली टॅक्सी मिळण्यात वेळ गेला...नरिमन पॉ्ईन्ट वरून घाटकोपरला पोहचलो...तिथे त्या बारचं ठिकाण शोधत होतो...कॅमेरामनने काही लोकांना पत्ता विचारला..तर त्या लोकांनी माझ्याकडे पाहून हळूच त्याला सांगितल...अरे ,लडकी को लेके उस बार में मत जा...अभी वहा रेड हुवा हे...हे ऐकल्यावर त्याने सांगितलं..आम्ही पत्रकार आहोत...मग त्यांनी पत्ता सांगितला..आम्ही त्या बारकडे पोहचलो..तिथे काही चॅनेलचे इतर पत्रकार पोहचले होते..अजून एक महिला पत्रकार होती..आम्ही गप्पा मारत उभे होतो...पोलिसांची कारवाई होईपर्यंत बाईट मिळण्याची शक्यता नव्हती..त्या बारचा मालक साऊथ इंडियन होतो..त्याने ईटीव्हीचा बूम पाहिला..आणि अचानक चिडला...ईटीव्ही दक्षिणेकडे प्रसिध्द असल्यामुळे कदाचित त्याला भीती वाटली असले..बदनामाची..पण मग त्याने पोलिसापासून सुरूवात केली...की बारवर रेड का टाकतात..आम्ही काय केल...त्या बारबाला..मेहनतीने पैसे कमवतात...तुम्ही का विरोध करता...आम्ही गप्प...तर तो अजून चिडला...मग तो बारबालांवरून आम्हां मुलींवर घसरला...तो म्हणाला...ये लडकिया अंदर पेट के लिए नाचती है...तुम भी तो पेट के लिए यहा इतनी रात को रास्ते पे खडी हो... आम्ही    सगळे पत्रकार त्याच्यावर ओरडलो...वातावरण चिघळलं..पोलिस मधे पडले...या गडबडीत बाईट झाला...आम्ही पण निघून गेलो..मग सतत मनात विचार येत होता...राग कसला येत होता...आमची तुलना बारबालांशी केली म्हणून...आम्हांला रस्त्यावर उभं राहणार्या बोलला म्हणून..आम्ही बातमी साठी,लोकांच्या प्रश्नासाठी झगडतो...समाजासाठी काही चांगलं करता येईल म्हणून पत्रकारिते मध्ये आलो...कदाचित नऊ ते पाच नोकरी मिळाली असती पण स्वताहून हे क्षेत्र निवडल...आणि आमची तुलना बारबालाशी.. खूप मनस्ताप झाला...आज तर पत्रकारांना प्रेस्टीट्यूट बोलतात तेव्हा हा प्रसंग नेहमी आठवतो....तेव्हा वाटलं नव्हतं पत्रकारांचा प्रवास बारबाला ते प्रेस्टीट्यूट होईल.

असचं एका नाईट शिफ्टमध्ये माहिम चर्च भागात कोणतरी बातमी करून आम्ही थांबलेलो...एका चॅनेलची मैत्रिण येत होती..तिला फीड ट्रान्सफर हवं होते....गाडीत शांत बसले होते..रात्रीचे दोन अडीचं झाले होते... अचानक रस्त्यावर आरडा ओरडा झाला..एक गाडी खूप वेगाने निघून गेली होती...रस्त्यावर घोळक्याने लोकं उभं होती...रस्त्यात काहीतरी पडलं होतं...काय गडबड झाली म्हणून पाहायला गेले...तर रस्त्यात एका बोटाएवढं एक अर्भक...त्या सुसाट जाणार्या गाडीतून कोणीतरी ते अर्भक रस्त्यात टाकलं...लोकांची गडबड ऐकत पोलिस आले...मग गर्दी दूर झाली...आम्ही जाऊन ते अर्भक पाहिलं...नुकताच फुटलेले हात..छोटे पाय...बंद डोळे...आयुष्यात फक्त डॉक्युमेंटरी मध्ये असं अर्भक पाहिलं होत..आयुष्यात पहिल्यांदा हे असं पाहून धक्का बसला...आणि इतकं निर्दयी कोण कसं असून शकतं की त्यांनी धावत्या गाडीतून हे असं अर्भक फेकून दिलं होतं...पोलिसांनी त्याच्यावर एक पेपर टाकलं नंतर..तपास करून ते अर्भक काढून हॉस्पिटलमध्ये नेलं..पोलिसांनी त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली...पण ते छोट अर्भक त्यांचे इवलेसे हात..पाय..बंद डोळे हे दृश्य अख्खी रात्र डोळ्यासमोरून गेलं नाही....माणूस किती निर्द्यी होतं चालला आहे...रात्रीच्या अंधारात कदाचित केलेल्या चुका पुसण्याची धडपड माणसाची सुरू असते का...की अंधाराची वाट पाहतो तो....



                  सगळ्यात जास्त रात्री काम करण्याचं चॅलेंज आणि थ्रील अनुभवलं ते उत्तराखंड येथील ढगफुटीच्या वेळी...रूद्रप्रयागला जाणारे मार्ग बंद झाल्याने आधी उत्तरकाशी गेले...तिथे गंगोत्री आणि यमनोत्रीला अडकलेल्या यात्रींवर बातम्या केल्या..मग जेव्हा बातमी आली की रूद्रप्रयागला जाणारा रस्ता सुरू झाला आहे..तेव्हा आम्ही निघालो...१८४ किमीचा प्रवास आम्हांला करायचा होता....ठरवलेल..जितकं अंतर कापता येईल तितकं पार करायचं ..कारण रूद्रप्रयाग वरून पुढे जोशीमठला जायचं होतं..बद्रीनाथला सगळ्यात जास्त मराठी पर्यटक असल्याची माहिती होती..त्यामुळे जोशीमठला लवकरात लवकर पोहचण्याचं टार्गेट होतं...उत्तरकाशीहून निघाल्यावर अर्ध्या रस्त्यात एक डिझेल वाहून नेणारा मोठा टॅंकअडकला होता..त्या टॅंकमुळे डोंगराच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली...पाच तास वाट पाहूनही उपाय नव्हता सुचत...आर्मीचे ट्रक ही अडकले होते...अनेक जवान रस्त्यावर उतरले होते...विविध प्रयत्न करून पाहिले..शेवटी टॅंकमधलं इंधन बाहेर काढण्याचं ठरवलं...इंधन मोठ्या मोठ्या पिंपात ओतले...टॅकचा भार हलका झाला...मग त्या टॅंकला रस्त्यातून बाजूला करण्यात यश आलं...दुपारी बाराला सुरू केलेला प्रवास जो मध्ये सात तास थांबला...परत रात्री नऊ वाजता आमचा प्रवास सुरू झाला...रस्त्यात काही गरजू लोकांना लिफ्ट दिली....जेवायला एक हॉ़टेल नाही...टॉयलेटची सुविधा नाही...आपला प्रवास कसा होणार...सात तास कसे भरून निघणार..जोशीमठला जायला उशीर होतं होता..सगळे प्रश्न समोर.. 
    रात्री बाराला एके ठिकाणी टाटा कंपनीच्या लोकांनी औषध,पुरी भाजीचा स्टॉल लावलेला दिसला...ड्राईव्हर..मी कॅमेरामन त्यावर तुटून पडलो..किती तरी तासाने खायला मिळाल.....जवळ एक टॉयलेट होत....हायसं वाटल.. पुन्हा प्रवासाला सुरूवात..ड्राईव्हरला विचारलं...पुरी रात गाडी चलायेगा..तो तयार होता..त्याला म्हटलं..कुछ भी करके सुबह रूद्रप्रयाग पहुंचना है....रूद्रप्रयाग हे त्या ड्राईव्हरचं घरं असल्याने त्याला सगळे रस्ते माहितं होते..तो तयार झाला...प्रवास सुरू झाला...कॅमेरामॅन ड्राईव्हरच्या बाजूला बसून डुलक्या काढायला लागला...मग पुन्हा गाडी थांबवली...कॅंमेरामॅनला मागे बसवलं..मी पुढे बसले...आणि ठरवलं झोपायचं नाही....रस्त्यात गुडूप अंधार...कुठला तरी मधला रस्ता प्रशासनाने सुरू केलेला..तिथेही दरडी कोसळतं होत्या...पण वेळ कमी म्हणून आम्ही जात होतो...खूप खड्डे...दगडी...चिखल...आणि गुडूप अंधार...या रस्त्यावर बिबटे असतात हे ही काही लोकांनी सांगितलेलं...म्हणून अजून भीती वाटतं होती...झोप खूप येत होती...पण झोपू शकत नव्हतो...गाडीत ट्रक डाईव्हर गाणी लावतात तशी आयटम नंबर गाणी लावली...इतकी बकवास गाणी आयुष्य़ात ऐकली नव्हती ती त्या प्रवासात फक्त रात्री जागण्यासाठी ऐकली...मध्ये रस्त्यात बिबटा दिसला असं वाटल..आता भीती वाटायला लागली...रस्ते खूप खराब होते..मध्यरात्री तीनच्या सुमारास गाडी बंद पडली...एवढ्या अंधारात बाहेर पडण्याची भीती वाटतं होती..कुठून बिबटा आला तर...एक तास गाडी बंद ठेवली...गाडीत बसून राहिले..ड्राईव्हर एक तासाने पुन्हा खटपट करत होता..अखेरीस गाडी सुरू झाली.आणि प्रवास सुरू पुन्हा प्रवास सुरू झाला.......
पहाटे रूद्रप्रयागला पोहचलो असं वाटतं असताना अचानक तीन किमी अंतरावर रस्ता तुटल्याने पुन्हा पंचवीस किमी फिरून मागे येऊन दुसर्या रस्त्यांने रूद्रप्रयाग मध्ये आलो...गाडीतलं पेट्रोल संपत आलेल...पेशन्स संपले होते...खूप थकलो होतो....रूद्रप्रयाग समोर दिसताचं..जीव भांड्यात पडला....आज पर्यंत रात्रीचे अनेक प्रवास केले...पण हा प्रवास मात्र सहनशक्तीची परिक्षा घेऊन गेला.

      माझी अम्मा..जिने आम्हांला वाढवल...आई नोकरीला जात असल्यामुळे आमची काळजी तिचं घ्यायची..अशी अम्मा कॅन्सरने आजारी होती...उपचाराने थकल्याने अम्मा घरीचं होती...घरात रात्री एक बाई थांबायच्या ...नोकरी लागल्यावर आणि विरार ते चर्चगेट प्रवास झेपायचा नाही म्हणून मी घाटकोपरला पीजी रहात होते...नाईट शिफ्ट असली की घरी विरारला जायचे  ..तिथून मग ऑफिसला...त्या दिवशी रात्री अम्माशी बोलले..गप्पा मारल्या..नाईटसाठी ऑफिसला आले...मध्यरात्री साडे तीन वाजता आईचा फोन आला...आई काय बोलतेय..समजतं नव्हत....अम्माला मुंग्या लागल्या...मुंग्या लागल्या...बोलतं होती...काही समजलं नाही...पप्पानी फोन घेतला आणि सांगितलं...अम्मा गेली..डॉक्टर येत आहेत..मी सुन्न झाले....अम्माला कॅन्सर झाला..ती कधीतरी जाणार..किवा तिच्या वेदना पाहून वाटायचं ह्या वेदना संपल्या पाहिजे...आणि आज जेव्हा ती खरचं गेली तेव्हा विश्वास बसला नाही....पहाटे लवकर ट्रेन पकडून घरी गेले...अम्माचं पार्थिव होतं..सगळे नातेवाईक आले..दुपारपर्यंत अंत्यसंस्कार झाले...खूप रडू आलं नाही...पण काहीतरी रिकाम झालं..असं वाटतं होते...एका आठवड्याने ऑफिसला आले...पुन्हा नाईट शिफ्ट होती...पण यावेळी पिकअपला आलेल्या ड्राईव्हरला म्हटलं ...मला मरिन ड्राईव्हला सोड....बारा वाजेपर्यंत ये....साडेदहा वाजता मी तिथे गेले...मरिन ड्राईवच्या समुद्राबरोबर शांत बसले...ते कधी रडायला आलं..कळलं नाही...या जगात अम्मा आपल्याला एकटं टाकून गेली...आपण कायमचे एकटे पडलो...ही भावना काय असते...हे तेव्हा जाणवलं...खूप रडले...रात्री साडेबारानंतर ऑफिसला गेले...
     आणि तिथून नाईट शिफ्टला असताना मरिन ड्राईव्हला जाऊन एकटं बसण्याची सवय पडली...कधी गाणी ऐकत...तर कधी लाटांचा आवाज ऐकत...सगळ जग शांत होतं असताना...आपल्या मनातील अशांतता अजून ठळक होत जाते....मनातला राग,अस्वस्थता...उफाळून वर यायची....समु्द्र हे पाहत रहायचा...मूक साक्षीदार होत.. कधी मित्र बनून...अनेकदा रडले त्याच्या साक्षीने.. कधी त्याच्याकडेचं न्याय मागितला...तर कधी मार्ग ...रात्रीच्या अंधाराने आपलं दुख..एकटेपणा...लपवत...जगणं शिकवल...