Friday 30 March 2012

आई -लाडकी आई!!

आई म्हणजे- लहान असताना माझ्या दोन पोन्या बांधून देणारी,डब्यात न आवडणार्या भाज्या देणारी.....शाळेत निबंध आणि वकृत्व स्पर्धेसाठी स्वतः आधी निबंध आणि भाषण लिहून आमच्या कडून तयारी करून घेणारी ती म्हणजे आई...ऑफिस मधून थकून आल्यावरही मला आणि ताईला संगीताच्या आणि नृत्याच्या क्लासला नेणारी...रियाझ केला नाही म्हणून सणसणीत थोबाडीत मारणारी आणि संध्याकाळी माझी आवडती पाव भाजी खायला घेऊन जाणारी आई...ऑफिसला जाताना दररोज केसात फुल माळंनारी आई...माझा आणि ताईचा प्रत्येक स्टेजवरचा performance आवर्जून पाहणारी...मी आणि ताई भांडून दंगा गेल्यावर,अभ्यास केला नाही म्हणून बदडून काढणारी आई....आमच्या शिक्षणासाठी स्वतःचे दागिने ठेऊन कर्ज काढणारी आई....आम्ही मोठे होत असताना कोणाशी बोलतोय,कसे वागतोय,कोण मित्र-मैत्रिणी आहेत या वर बारीक लक्ष ठेवणारी आई आणि आज करियरसाठी बाहेर पडताना आमच्या प्रत्येक निर्णयात आमच्या पाठीशी असणारी आई...जिद्दीने संगीत शिकणारी आणि संगीताचे प्रयोग आमच्यावर करणारी आई..या वयातही फेसबुक शिकणारी आणि फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवायची हे मुंबईमधून फोन करून विचारणारी आई...महाशिवरात्रीला उपवास केला आणि तो तुटला नाही याची काळजी घेणारी आई..स्वतःच्या प्रमोशन साठी मेहनत घेणारी,क्लासेस लावून अभ्यास करणारी आई..आणि घरासाठी वेळ आली म्हणून ते प्रमोशन नाकारून आलेली आई...सर्वांचा धीर खचला तरी संयम ठेवणारी आई...किती ही कठीण वेळ आली तरी डोळ्यातून पाण्याचा एक थेंब ही न गाळणारी आई..खचलो तर आम्हाला उभं करणारी आई...आयुष्यात कशी शिस्त असावी,वेळच्या वेळी जेवावं म्हणून अगदी मी फोन केला तरी मी जेवतेय सांगून नंतर फोन करणारी आई....बाहेर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारून हवेत उडत असणाऱ्या मला,घरी जमीनीवर आणणारी आई...माझिया प्रियाला प्रीत कळेना पाहून,"प्रेमात बडून बघ!"असा खट्याळ सल्ला देणारी आई..(v must ban such serials)"तुम्हांला मुलगा नाही का?" असं कोणी हळहळून विचारलं की ,फरक नाही पडत असं सहज सांगणारी आई.....आई नुसती आईच्याच नाही तर बायको,मुलगी,काकी आणि आता आजी या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी...ती "ती' आहे म्हणून आम्ही घडलो...आई तुझ्या ऋणातच राहण्याची इच्छा!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछा!!

Thursday 29 March 2012

मृत्युचा क्षण मनापासून जगायचं!!

                              मृत्यू, किंवा त्याच्या विषयी बोलायचं म्हटलं की लोकांना आवडत नाही...एखादी व्यक्ती मृत्यूविषयी बोलायला लागली तर ती व्यक्ती दुखी आहे,आत्महत्या करेल असे विचार लोकांच्या मनात येतात...पण मृत्यू विषयी बोलन म्हणजे आयुष्याचा कंटाळा आला किंवा आयुष्य नकोय असा होत नाही!! मृत्यू हे एक सत्य आहे,अपरिचित आणि गूढ...जसं जन्माला येणं आपल्या हातात नाही तसं मरण ही आपल्या हातात नाही...एकदा जन्माला आल्यावर जगावं लागतच! भले ही कधी कधी जगण्याची इच्छा मेलेली असली तरी...कोणी मन मारुन जगत...कोणी हसतं हसतं...जन्मल्यापासून आपण कस जगायचं हे आपले आई-वडील मग शिक्षक ,समाज शिकवतं असतो...थोड मोठं झाल्यावर माणूस स्वतःच्या पूर्वानुभवातून कस जगायचं हे शिकतो..आयुष्य हे इतक मोठं असत की मग कधी कधी आपण ते जगत नसतो...आयुष्य आपलं आपलं जगायला लागतं..जेव्हा एखादा अनुभव नवीन किंवा पहिला असतो तेव्हा त्यातील आनंद,दुख किंवा भावना तीव्र असतात..पण जसं जसं जगायला शिकतो तसं अनुभवांची मज्जा घेण्याची वृत्ती आपण गमावतो...हे म्हणजे अर्थशास्त्रातल्या  Law of marginal diminishing utilityसारखा आहे..म्हणजे जेव्हा तुम्ही खूप तहानलेले असता तेव्हा पाण्याचा पहिला घोट खूप तृप्तता देतो..दुसरा घोट हा पहिल्या घोटापेक्षा कमी तृप्तता देतो..आणि एकदा तहान भागली की मग पाण्याचं कौतुक ही राहत नाही...आयुष्याचा ही तसंच आहे...लहान असताना जो आनंद मिळायचा तो मोठं झाल्यावर गमावतो...कारण आपण अनेक क्षण जगलो असतो..ते क्षण विसरून पुढे जायला शिकतो...आयुष्याचं कौतुक राहत नाही...पण मृत्युचं तसं नाही..मृत्यूचा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाचं येणारा आहे ...आणि तो कधी,कोणत्या स्वरुपात येईल हे कुणालाच माहित नाही..म्हणजे तो अपरिचित आहे...मृत्यूला कसं समोर जायचा हे कोणीच शिकवलं नाही..कुणालाच माहित नाही..मृत्यू कसा असतो,तो आल्यावर काय होतो..आणि तो आल्यावर कस वागायचं...त्या क्षणाला प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार,वृतीनुसार सामोर जायचंय...आणि म्हणूनच मला मृत्युचं आता जास्त आकर्षण वाटतं!गेले २६ वर्ष मी तर जगतच आहे...ती आता एक नियमित गोष्ट झाली..आता कदाचित खूप उत्कंठेन,किंवा खूप आर्ततेन आयुष्य जगू शकणार नाही...कारण आयुष्य जगताना अनेक वेळा अनेक अनुभव येऊन गेले आहेत...पण मृत्यू हा एकमेव आहे...म्हणूनच तो क्षण मला मनापासून जगायचं आहे!! मला नव्या कोऱ्या मनाने त्याला समोर जायचा आहे...काय माहित पुढे कधी जन्म मिळेल, परत कधी मृत्यू ची गाठभेट होईल का?? याचा अर्थ हा नक्कीच नाही मी आयुष्याचा अनादर करतेय किंवा मला त्याची किंमत नाही...मला माझ्या आयुष्याची किंमत आहे आणि मी कधी नव्हे ते मुक्त मनाने,भूतकाळाची ओझी उतरवून जगायला शिकलेय...पण त्याचा वेळी मृत्यूची पण ओढ लागलीये!!

एक प्रवास!!


           एकटेपणा कधीच कुणाला नकोसा असतो..तो कोणी मागून घेत नाही..तो लादला जातो..असं झाल की मग हादरायला होतं..अरे आपण तर होतो नेहमी इतरांसाठी..मग आपल्याला गरज होती तेव्हा कोणीच कसं नाही??किंवा कोणी असलं तरी त्यांना आपल्याला काय होतंय,आपल्याला काय हवंय..अगदी मायेचा हलकासा स्पर्श ही पुरेसा असतो..प्रेमाचे दोन शब्द आणि आणि एक स्पर्श ही मागून मिळवण्याची वेळ आली, तेव्हा कळलं अरे ही लोक आपली नाहीच मुळी!!आणि मग वेदना वाढत जातात..एखाद्या फिल्म मधलं एखाद पात्र,एखादा प्रसंग ,नाटक,गाणं..एखादा पुस्तकं वाचल्यावर मिळणारा अनुभव भन्नाट,  वेगळाचं असतो..आपण चिंब भिजलेलो असतो...आणि ते कुणाला सांगायला गेलो तर तो कोरडा प्रतिसाद... गप्प करून जातो ..मग हळूहळू आपणच एकटे भिजायला शिकतो..आपणच आपले कोरड व्हयला ही शिकतो..
                       कधी कधी कोणी मित्र,मैत्रिणींच्या रुपात भेटतातही  ही..पण त्याचं आपल्याला समजून घेणं  हे त्यांच्या परिघात,त्यांच्या  टाईम आणि स्पेसप्रमाणे..म्हणजे पुन्हा आपलं व्यक्तं होण  हे इतरांच्या गरजांनुसार,वेळेनुसार  असं वाटायला लागत.. चालायचंच..यातून ही शिकत जातो..आणि मग एक वेळ येते जेव्हा जाणवत,अरे आता आपण आपल्याच बरोबर मजेत आहोत..आपण एकटेचं एन्जोय करू शकतोय..जे अनुभव सांगायचे आहेत ते लिहून ठेवायचे..मग कधी कधी वाटत आपल्यातच काही तरी गडबड आहे..आपण उगीचच जास्त विचार करतो का,आपल्याला जे फील होत,जे जाणवत तेच मुळी चुकीच आहे का??स्वतः वरचाच विश्वास उडू लागतो..ओर्कुट अथवा फेसबुकवर अनोळखी मित्रानंमध्ये असं समजून घेणारं..आपल्या इतक इंटेन्स आणि वेड कोणी तरी भेटत आणि खात्री पटते अरे आपण इतके ही विचित्र नाही आहोत..अशा अनोळखी मित्रानं बरोबर मग मात्र गप्पा रंगतात,फुलतात..
आणि एकटेपणा पळून जातो....अन आता आयुष्यातला एकटेपणाची मज्जा येते..नशा चढते..कधी ही उठा ,हवी ती गाणी ऐका,वेड्यासारखी पुस्तकं वाचा..वाटल्यास लिहा..भटका..या सगळ्यात इतका भन्नाट आनंद मिळतो..तो कदाचित कोणी बरोबर असूनही मिळाला नसता..
एकटेपणाच्या प्रवासाची सुरुवात  पडतं,अडखळत ,ठेचकाळत झाली तरी नंतरचा प्रवास खूप शिकवणारा आणि जगायला लावणारा नक्कीच आहे..

"मी" चा शोध!

एक काळ होता जेव्हा मी अशा काही कल्पना बनवून घेतल्या होत्या ..म्हणजे आयुष्यात काय ACHIEVE करायचं,काय टप्पे असायला पाहिजे म्हणजे मी यशस्वी झाले असा आलेख बनवून ठेवला होता...माझ्या आयुष्याचं 'लक्ष्य' जणू मला मिळाल असं मला वाटलं तेव्हा ...आणि त्याच्या उन्मादात मी पळत सुटले...पहिल्यांदा मज्जा आली...मला हवे तसे काही यशाचे टप्पे लागले..काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या..पण तरी लक्ष्याच्या मार्गावरून धावत होते म्हणून आनंद...हळूहळू वेग कमी झाला...मग दम लागायला लागला...मग प्रश्न पडायला लागले...अन प्रश्न पडला...आपण का पळतोय??कशासाठी धावतोय??आपण जे लक्ष्य म्हणतोय ते आयुष्याचं खरंच लक्ष्य असू शकते का??आणि या सगळ्यांची उत्तर नकारार्थी आली...आणि मी विचार न करता चक्क ब्रेक मारला...दणकन अपघात झाला...एक वर्ष गेलं या अपघातामधून बाहेर यायला...पण त्या प्रश्नांनी केलेली अस्वस्थता वाढतचं होती...मधल्या काळात अजून समस्या, प्रश्न वाढत गेले...त्यातून एक गोष्ट शिकले आयुष्य कधीच कधीच आखून जगता येत नाही..त्यामुळे आपल्या हवे तसंच घडेल...हा हट्ट सोडला...पण प्रश्न तर होतेच ..हे असंच का...तसंच का??आणि मग प्रश्न इथवर आले...मीच का??आणि मग ठरवलं मीच का हा प्रश्न विचारण्याआधी मी कोण हे तरी सापडायला हवं...मी कोण, मी अस्वस्थ का??मी आवडीचं खाल्लं,छान छान कपडे घातले,आवडीचं काम केल...थोड्या वेळासाठी किक बसते..बरं वाटतं.....पण पुन्हा पोकळी,पुन्हा अस्वस्ताथा...ही पोकळी काय आहे आणि का??याचा उत्तर शोधता शोधता कळलं, एवढे दिवस जे चोचले पुरवले ते या शरीराचे....ध्यास घेतला तो काही भौतिक सुखाचा...शरीराची भूक ,शरीराला आनंद मिळावा,प्रतिष्ठा मिळावी म्हणून झटले...पण ते आतपर्यंत झिरपतचं नव्हत आणि आत्ता खात्री पटली...चूक झाली...आणि हळूहळू कळू लागलं की मी म्हणजे फक्त माझं शरीर नाही.!!आरशात जे दिसत..आई-वडिलांनी ज्याला रश्मी हे नाव दिलंय ते शरीर म्हणजे "मी" नाही...माझे विचार,भावना ,क्रिया-प्रतिक्रिया म्हणजे मी ! आरशात दिसत ते एक बाह्य रूप...खरी मी कोण ...जी आतमध्ये खोलवर रुतालीये...जी शरीराचे सर्व कर्म करते..पण त्यापलीकडे जाऊन पण जगते...जर शरीर म्हणजे मी असते...तर सर्वच लोक सारखी वागली असती,सगळ्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया सारख्या असल्या असत्या!...पण सगळ्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया वेगळ्या आहेत...विचार करण्याची,मांडण्याची पद्धत सगळ वेगळ आहे..आहे...जे वेगळं आहे.. तेचं खरं आहे...प्रत्येकाचा 'मी'..!...शरीर हे फक्त एक माध्यम आहे.या माध्यामाद्वारे आपण वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो..या माध्यमाला त्याच्या PROPERTIES आहेत...जसं शरीराला लिंग,जात,वर्ण, वय,सुंदर, असुंदर,पद पैसा, प्रतिष्ठा...अशा अनेक PROPERTIES आहेत...आणि या मिळवण्यासाठी आपण धडपडतो...पण आतल्या "मी" कडे दुर्लक्षच होतं ..आणि मग एक पोकळी येते...पोटाची भूक भागवली..पण" मी" ला गांभीर्याने घेतलंच नाही... "मी" हा महत्वाचा अशासाठी कारण तो आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतो....जर "मी" समाधानी असेल तर पोकळी असणारं नाही ....आता एकूणच या सापडलेल्या "मी" ला नक्की काय हवंय...ते अजून गवसत नाहीये!!कदाचित तो शोधही लागेल...वेळ लागेल त्याला..पण सापडेल कधीतरी उत्तरं!

लाडकी दुःख !


                                 लोकांना दुःख  बिलकुल आवडत नाही..दुःख ज्या गोष्टींमुळे होतं ती गोष्ट अप्रिय,NEGATIVEअसे शिक्के मारून सगळे जण दुःख  नाकारतात..पण इथेच तर चुकत ..प्रिय,अप्रिय आठवणी,POSITIVE,NEGATIVEविचार असं काही नसत..एखादी गोष्ट किंवा घटना घडल्यावर तुम्ही त्याला कसं REACTकरता यावर तुम्हीच ठरवता ती गोष्ट प्रिय की अप्रिय...दुःखाचं घेऊया...दुःख का होतं?..आपल्याला काही इच्छा असते..ती पूर्ण होतं नाही म्हणून दुःख होतं..पण जेव्हा गोष्ट मनासारखी होता नाही..त्रास होतो तेव्हा आपण चौकटीबाहेर जाऊन  विचार करायला लागतो..आपण उत्तर शोधायला लागतो,ती नाही मिळाली की तडफडतो..आपण दुःखातून  बाहेर पडण्यासाठी आकांडतांडव करतो...दुःख दूर करायला सगळी शक्ती पणाला लावतो..दुःखात माणूस RISK घेतो..प्रत्येक दुःखाची एक KICK बसते..प्रत्येक दुःख माणसाला शिकवतं..काहीना काही देऊन जातं..माणूस म्हणून आपण  सहनशील तर होतो..पण दुसर्यालाही समजून घ्यायला शिकतो...
                         आपल्याला एखादा विचार किंवा भावना आली की आपण त्यांना पकडून पटकन LABELING करतो..हा विचार चांगला..हा विचार वाईट..हा विचार POSOTIVE..हा विचार NEGATIVE ..का?करणं आपण ठरवलंय..जे वाईट,आहे त्यामुळे दुःख मिळणार..पण कधी कोणतीही भावना,विचार ही तशीच्या तशी जगलीयेत?एकदा अनुभव घेऊन पहा..त्या विचारात,भावनेत मस्त डुबकी मारा ..हळूहळू आत,खोलात जायचं ..कधी त्रास होईल ..भीती वाटेल ..मध्येच दम लागतो..पण पुन्हा मनाचा हिय्या करून  त्या भावनेचं अंतरंगात जायचं..एकदम आत गेल्यावर भीती वाटायला लागतं..की आता आपण बाहेर नाही जाऊ शकणार की काय..घुसमटायला होतं..मग सुरु होते पुन्हा परत फिरण्याची धडपड..आणि मग आपण हळूहळू प्रयत्न करून वर येतो,खूप थकतो.. किनार्याला धापा टाकत पोहचतो..किनार्यावर थकून बसले  असताना  जाणवतं , अरे बापरे..किती मोठा डोह आहे..आपण बरीच मजल मारून आलो..ती धाप पण खूप आनंद देऊन जाते .... आणि महत्वाचं म्हणजे पुढच्यावेळी डोहात किती उतरायचं हे पण नकळत कळत!
आपल्या  आयुष्यातलं कोणताही दुःख असू  दे..प्रेमभंग,हवी ती संधी न मिळण,आपल्या लोकांना गमावणं....कोणतही दुःख..प्रत्येक दुःखाने घडवलंय..किंबहुना दुःखाने आणि वेदनेनच आपल्याला घडवलंय..जगण्याचा एक नवीन पैलू दाखवला असेल..महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण माणूस आहोत,याची जाणीव करून दिली असेल ....आपला स्वाभिमान,अभिमान,दुराभिमान ,अहंकार,द्वेष यापलीकडे जाऊन गोष्टी पाहायला शिकवलं असेल..आपण  कुणावर प्रेम केल..मनापासून..भलेही ते प्रेम आयुष्यात टिकलं नाही..हे दुःख..पण म्हणून  प्रेम करणं वाईट नाही ठरत..कुणावर प्रेम करताना मनापासून आनंद होतो..कुणावर माया करताना,जीव लावताना..आपण  आतमध्ये झुरतो,कधी प्रेमपत्र लिहितो ,देवाकडे मनापासून काही उत्तर मागतो..हे किती सुंदर आहे..मग प्रेमाच्या या आठवणी अप्रिय होतात का?त्या व्यक्तीबरोबर घालवलेला क्षण आणि क्षण मौल्यवान होता..असतो...ते क्षण टिकले नाही..ती व्यक्ती आयुष्यात टिकली नाही म्हणून आधीचे क्षण,प्रेम अप्रिय होत नाही..आपल्याला हवी ती संधी मिळत नाही म्हणून त्रास होतो..पण त्यासाठी केलेली धडपड..मेहनत वाया जाते का?नाही..एक दरवाजा बंद झाला म्हणून आपण थांबत नाही..अजून चिडतो ..अजून पर्याय शोधतो ..जोपर्यंत आपल्याला  हवे ते उत्तर मिळत नाही तो पर्यंत वणवण करतो...हे वाईट आहे का ?नाही..यामध्ये आपण स्वतःला स्वतःच्या मर्यांदा तोडायला लावतो.. 
आपलं माणूस दुरावणं,त्याचा मृत्यू  हे सगळ्यात जास्त त्रासदायक..पण आयुष्यात जेव्हा असं माणूस दुरावतं तेव्हा एकं गोष्ट जाणवते..या आयुष्यात काहीच शाश्वत नाही....या जगात आपलं असं काही नाही..प्रत्येक जण भेटतं,कोणी चांगले तर कोणी वाईट अनुभव देऊन जातं..कोणी प्रेम करतं..कोणी माया करतं तर कोणी द्वेष.. आणि मग निरोप घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला जातो..कोणी जास्तवेळ आपल्याबरोबर असतं..कोणी कमी वेळ..बस...त्यामुळे या सर्व आपल्या लोकांकडून मिळालेली दुःख ही अप्रिय किंवा वाईट कशी ठरतात..त्यांच्या आठवणी अप्रिय कसी होणार?त्यांचा विचार करणं म्हणजे विचार करणं कसं काय असू शकत?ही तर हवीहवीशी दुःख आहेत..मी तर अशा दुःखांना खूप जपलंय..जेव्हा जेव्हा मला वाटतं..संपल सगळ ..मी थकलेय, अजून धडपडू शकत नाही.. तेव्हा अडगळीतून ही माझी लाडकी  दुःख काढते..त्यांना पुन्हा नव्याने उपभोगते..कारण मला माहितीये..ते मला पुन्हा अस्वस्थ करतात..एक छान  KICK देतात... पुन्हा लढायला..RISKघ्यायला,जगायला भाग पाडतात...

मी -एक पत्रकार !


'पत्रकार दिन' म्हणून शुभेछा आल्या तेव्हा अचानक विचार आला अरे,आपण पत्रकार व्हायचं असं का आणि कधी ठरवलं? नेमकं आठवत नाही..पण लहान असताना महाराष्ट्र टाइम्समध्ये कुमार केतकरांचे संपादकीये वाचायचे..खूप आवडायचं..मग METROवर आजतक यायचं..सुधीन्द्रप्रताप सिंघ दररोज रात्री बातम्या वाचायचे..त्यांचं ते वाक्य,"तो ये थी खबरे आजतक,इंतजार किजीये कल तक!" खूप आवडायचं. बारावीनंतर फायनल ठरवलं पत्रकारितेत जायचं..BMMला ADMISSIONघेतली..अभ्यास करत असताना आधी लोकसत्तामध्ये INTERNSHIPकेली..केतकर आवडायचे म्हणून! (दररोज हळूच लांबून त्यांच्या केबिनमध्ये पाहायचे..पण त्यांच्याशी कधीच बोलायला मिळाल नाही!एकदाचं ते मी जिथे बसायचे तिथे कोणाशी काम होतं,म्हणून आलेले,तेव्हा मी अशी वेड्यासारखा त्यांच्याकडे पाहत बसलेली.त्यांच्याकडे पाहून हसले..त्यांनी पण SMILE दिलं.आणि मी सगळ्या मित्र मैत्रीणीना फोन करून करून सांगितलं..केतकर सरांनी आज SMILE दिलं!) दररोज ऑफिसला PTIच्या बातम्यांचं भाषांतर करायचे..आशिष जाधव आणि सुजय शास्त्री हे तेव्हा माझे सर..सुरुवात तर- एका म्हशीला गाडीने टक्कर दिली अशा बातम्यांचं भाषांतर करून केली..मग हळूहळू जरा महत्वाच्या बातम्या मला भाषांतरासाठी दिल्या..केतकर सरांना पाहायला मिळतं ,इतकंच तेव्हा समाधान..पण मला ते भाषांतर वगैरे कधीच आवडलं नाही..मग सकाळमध्ये एक आठवडा INTERNSHIP..आणि मग मटामध्ये  INTERNSHIPकेली..मटामध्ये  INTERNSHIP मागायला गेले तेव्हा एकाHR MANAGER ने मुलाखत घेतली.त्यांनी विचारलं पत्रकारिता का करायचीये,"मी म्हंटल मला समाजात बदल करायचा आहे,प्रसारमाध्यम लोकांच्या मतांवर,राजकारण्यांवर काम करण्याचा दबाव आणू शकतात..म्हणून" त्यांनी  मला स्पष्ट सांगितलं,"असला विचार घेऊन पत्रकारीते मध्ये येणार असशील तर ते चुकीचं आहे..समाज वगैरे काही बदलता येत नाही!" पत्रकारितेची विद्यार्थिनी..असे मोठे मोठे विचार,स्वप्न घेऊन फिरणारी मी..ऐकून धक्काच बसला.. हे होऊनही मटामध्ये  INTERNSHIPकेली.पण त्यानंतर मला खरंच वाटायला लागलं मी पत्रकार बनू शकणार नाही.आत्मविश्वास गेला..आपण चुकीचा विचार केला की काय असं वाटायला लागलं..आता careerला दुसरा पर्याय काय ते पण शोधायला सुरवात केली..या सगळ्यात ETV MARATHIची परीक्षा दिली..आणि त्यात SELECT झाले..वयाच्या विसाव्या वर्षी पहिली नोकरी..ती ही ETV मराठी मध्ये!उडत उडत हैद्राबादला TRAININGसाठी गेले..तेव्हा पहिल्यांदा कॅमेरा,हातात BOOM..खूप छान वाटलं..मेघराज पाटील बातमी कशी लिहायची हे शिकवायचे ..राजेंद्र हुंजे,रुपेश,माणिक मुंडे,स्वप्नील,अपर्णा,केतकी सगळे मोठे,SENIOR COPY-EDITOR
..त्यांची बातमी पाहायचो..पण हे शिकत असतानाही जाणवत होतं,मला हे काम नाही आवडत.मला बाहेर FIELD वर गेलं पाहिजे..आणि लवकरच मुंबईला TRANSFER मिळाली..पहिल्यांदा हातात BOOM घेऊन जाताना इतका अभिमान..पहिला PTC करताना चेहऱ्यावर इतकं हसू..मला आठवत माझी पहिली BY-LINEवाली स्टोरी होती..आणि बाईट्स होते पण VISUALSची कॅसेट मिळाली नाही..बुलेटीनसाठी २ तास होते पण कॅसेट मिळेना..वाईट रडले..शेवटी कुठल्यातरी FOLDERमध्ये VISUALS SAVE करून ठेवलेले मिळाले..बातमी लागली..घरच्यांनी पाहिली..सगळे खुश..
पहिले नवीन नवीन दिवस खूप उत्साहात..१२-१४ तास काम करायचे..पत्रकार झाल्यामुळे अनेक थरातल्या,क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटायला मिळालं..आवडते कलाकार,लेखक,राजकारणी..त्यांना मस्त प्रश्न विचारायचे..INTERVIEWकरायचे.खूप छान वाटायचं..आनंद व्हायचा..पण हळूहळू या सर्व मोठ्या लोकांचा कॅमेरा बंद झाल्यावरच खरा चेहरा कळायला लागला,त्यांचं खरं वागण दिसलं..मी ज्यांना आदर्श मानायचे,ते कसे आदर्श नाहीत हे दिसलं ..खूप त्रास व्हायचा सुरवातीला..वाईट अनुभव आले की रडायचे माझे BOSS साठे सरांना सांगायचे..ते समजावयाचे-बातमीत जास्त कधीच गुंतू नये..तू पत्रकार म्हणून जा..तुला कोणी आवडत किंवा एखाद्या बातमीचं तुझं PERCEPTION घेऊन गेलीस तर त्रास होणार!आणि दिसतं तसं कधीच नसतं...बातमी मागची बातमी काय असू शकते याचाही विचार कर! मग हळूहळू बातमीकडे पाहण्याचा  तटस्थपणा आला..आणि कुणालाही फक्त बातमी म्हणूनच पाहायला लागले!
                  अनेकदा बातमी करताना कुणाला मदत करू म्हणून स्वताहून पुढाकार  घेतला आणि काम झाल्यावर लोक जशी वागणूक देतात ते पाहून जास्त राग यायचा..मुंबई ट्रेन ब्लास्ट झाल्यावर एका कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून आर.आर.पाटील यांच्याकडे घेऊन गेलेलो..आबांनी बातमी पाहिलेली..त्यांच्याकडून मदत मिळाली..त्या कुटुंबाने धन्यवाद दिले..आपण काहीतरी करू शकलो याचं समाधान होतं.. पण उगीच त्याची बातमी केली नाही. कशाला CREDIT घ्यायचं?..पण थोड्या दिवसांनी त्या कुटुंबीयांनी आम्हांला अबू आझमीमुळे मदत मिळाली असा एका वर्तमानपत्राला सांगितलं.आम्हाला सरकारने मदत केली नाही असं सांगितलं..ती बातमी वाचून राग आला,वाटलं आपण चुकीच्या लोकांना मदत केली नाही ना?त्याक्षणी ठरवलं कधीच अशी कुणाला मदत करायची नाही..कुणावर विश्वास ठेवायचा नाही.असंच मुंबई स्फोटातील अजून एक म्हातारे काका होते..त्यांची मुलगी मतीमंद होती,बायको अपंग,ते एकटेच कमावणारे.ते स्फोटात जखमी झालेले.सरकारकडून मदत मिळत नव्हती..अशी बातमी करून मदत मिळत नाही हे आता एक दोन वर्षाच्या अनुभवत कळलेलं..पण त्यांचं मन ठेवायचं,म्हणून बातमी केली..आणि त्यांना चक्क दोन महिन्याने पैसे मिळाले..ते फोन करून रडले..त्यांच्या ऑफिसमध्ये मला बोलावलेलं,धन्यवाद द्यायला..पण मी गेले नाही..म्हणजे त्यांना पैसे मिळाले,मदत मिळाली..याचं समाधान होतं..पण याचं आपल्याला CREDIT आहे,असं मला वाटलं नाही!
कोर्टाच्या बातम्या करताना BREAKING NEWSची नशा अनुभवली..इतकी मज्जा यायची..एक बातमी ब्रेक करायची मग सगळे फोन करून माहिती विचारायचे.दिवसभर तुमचीचं बातमी  CHANNELवर चालतेय..फक्त तुमचा PHONO,LIVE.याची खुमारी वेगळीच..आणि ते पाहून इतरांच्या प्रतिक्रिया..ओळखीचे,नातेवाईक..सगळ्यांचं कौतुक..हे असं सतत तीन वर्ष चालू होतं.एकदा कोर्टात एक बातमी होती एका महिलेला सातव्या महिन्यात  ABORTION करायचं होतं..पण कायद्याने परवानगी नव्हती..ती बातमी अशीच मिळाली..पहिल्यांदा त्या महिलेचे VISUALSमिळालेले..आपली बातमी याचं समाधान..पण न्यायालयाने ABORTION साठी परवानगी दिली नाही..दुसर्या दिवशी चर्चा तिचा गर्भपात झालाय..BREAKING बातमी..पण CONFIRM करायची होती..तिच्या नवर्याला घाबरत घाबरत फोन लावला..त्याने वाईट शिव्या दिल्या,बोलला,"तुमच्यामुळे आम्हांला त्रास झाला,जगणं हराम केलंत ..तुम्ही सारखा कॅमेरा घेऊन मागे येता..लाज वाटते का?" आणि आयुष्यात पहिल्यांदा खाडकन कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखं झालं.
CRIME BEATकरताना दररोज बातम्या शोधायचे.एकदा सकाळपासून बातमी शोधात होते..आणि कळलं एक बलात्काराची केस आहे..बातमी मिळाली..आनंद झाला..CRIMEच्या बुलेटीन PRODUCERला सांगितलं," तुला आज HEADLINEची बातमी देते..मस्त बलात्काराची बातमी मिळाली!" हे बोलल्यावर एका क्षणात जाणवलं..माणूस म्हणून मी अतिशय खालच्या पातळीवर गेलेय..माझ्या कामाच्या भरात मी जास्तीत जास्त कसं,किती वाईट काही मिळतंय का याचं शोध घेत होते.इतरांचं वाईट झालं तर मी खुश होतेय,हे चुकीचय !इतरांच्या वाईटावर बातम्या करून मी मिरवणार? आणि तेव्हा ठरवलं..बीट यापुढे करायची नाही.. आणि हे असं सतत विचार न करता चालू होतं..मुंबई ट्रेन ब्लास्ट,इतर अशा अनेक घटना,वाईट अपघात..यात त्या DEAD BODIES,रक्त पाहून कधीच रडू आल नाही..पण लोकांचा खोटारडेपणा,एकमेकांना वापरणं,खोट खोट वागणं,एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण,ते राजकारण..याचं तिटकारा येऊ लागला ..हळूहळू आपण का धावतोय,आपल्याला काय मिळवायचं,माणूस  म्हणून कुठे पोहोचलोय याचा विचार करून करून त्रास जास्त व्हायला लागला..आणि म्हणून शिस्तीत पत्रकारिता करायची नाही असा मुर्खासारखा निर्णय घेऊन नोकरीचा राजीनामा दिला..पण पुढे काय ते माहित नव्हतं...  RECESSIONमुळे मग पुढे अनेक महिने कुठेच नोकरी मिळत नव्हती..अगदी शेवटी CALL CENTER मध्ये पण नोकरीसाठी गेले..तर माझा RESUMEपाहून ते म्हणाले तुम्हांला नोकरी देऊ शकत नाही. हातात BOOM नसल्यावर लोक तुम्हांला कसे वागवतात..हे ही त्या काळात   कळलं...तुमच्या नावामागे एक BANNER असला की लोक तुमचे फोन उचलतात..मदत करतात..जर हे नसेल तर इतरांच्या लेखी तुम्ही शून्य आहात.. तुमचे मित्र ..मित्र राहत नाहीत..हा ही अनुभव घेतला..पत्रकारितेच्या आत आणि बाहेर राहून अशी अनेक सत्य कळली..पण त्यावेळी हे ही कळलं मी पत्रकारीतेशिवाय, शिवाय राहू शकत नाही..मला सारखं असं फिरायला, माहिती शोधायला,लोकांना भेटायला आवडत..ती  BREAKING NEWSची नशा मला हवीये..मी एखादी बातमी झाल्यावर अगदी घरी असल्यावरही,सुट्टी असली तरी शांत बसूच शकत नाही..भूक लागत नाही,झोप येत नाही..रक्त उसळत राहत...आणि तेव्हा पहिल्यांदा जाणवलं पत्रकारीतेशिवाय दुसरं मी काहीचं इतकं चांगल, PASSIONATLYकरू शकत नाही..आणि मी परत आले..पुन्हा नव्याने सुरवात केली..आता पहिल्या इतका त्रास होतं नाही..कशाचाही परिणाम आता पहिल्यासारखा होतं नाही माझ्यावर .माझ्या घरच्यांना वाटतं मी पटकन चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, प्रत्येक गोष्टीत दहा शंका घेते..खूप CROSS QUESTION करते..खूप विचार करते... पण पत्रकार असल्यामुळे किंवा काही अनुभव खूप लवकर आल्यामुळे असेल कदाचित! इतकं नक्की एखादा माणूस पत्रकार झाल्यावर त्याच्यातला पत्रकार कधीच सहजासहजी मरत नाही!


भीती - भिंत !


                                                                                            भीती कशाची वाटते?
                                                    तशी कशाचीच नाही..पण लोकांच्या त्या रोखून पाहणाऱ्या नजरा..आपल्याच विचारांचा होणारं POST MORTEM!..आणि त्यावर एका फटक्यात PASS केलेली JUDGEMENT!...त्रास होतो ना?..कोणी सांगत...तू ना खूप  विचार करतेस...इतकी का SENTI होतेस..सगळ्या गोष्टीना COMPLICATEDकरून ठेवतेस.. तू कुठल्या विश्वात जगतेस? .असं काही नसतं...नसेलही कदाचित..पण मला वाटतंय ना, हे असेल असं कदाचित! आता जास्तीत जास्त लोक म्हणतात...हे असं नाही..म्हणून  ते मानू! म्हणून त्यांचं निर्णय  स्वीकारू? का? नवनीत गाईडप्रमाणे  आयुष्याच, विचारांचं READYMADE MANUAL का स्वीकारू?एखादी गोष्टी कशी,ती का स्वीकारायची आणि कशी हे ही आता ते ठरवणार? बरं ते स्वीकारलं तरी मेंदूत, मनात येणाऱ्या विचारांना कसं थांबवायचं? विचार मेंदूत येतात कि मनात? येत असतील कुठूनतरी...ते येतात..त्यांना हे बहुमतातील मत पटत नाही...विरोध आहे!.कुठे त्यांचा गळा पकडू..कसं त्यांना संपवून टाकू?...कधी कधी  असा स्वतःचा राग येतो...तो आतमधला 'मी' सारखा किंचाळत असतो...ओरडत असतो...त्याला हे असं चित्र पाहून राग येतो..त्या नजरांचा, त्या आवाजांचा! त्यांना मारावास वाटतं...पण माणूस पशुसारखा वागू नाही शकत ना? मग काय...त्या आतल्या भिंतीवर रक्तबंबाळ होईपर्यंत डोक फोडून घेतो तो...तो 'मी'! आक्रंदून रडतो...त्याला उठून एक अशी सणसणीत ठेवून देते...साला..किती वेळा सांगितलं शांत बस..शांत बस...स्वतः पण विचार करणार..दंगा घालणार.. सगळ्याची नासधूस करणार..दरवेळी दरवेळी जरा काही आतमध्ये नीट व्यवस्था लावली... सगळ शांत ठेवण्याचा प्रयत्न...ते सगळं सगळं उध्वस्त  करणार ? काय काय मिळत ह्यातून
                                             .बर्याचदा तो 'मी'..दरीच्या टोकावर जाऊन उभा राहतो...शांत..त्याला सांगते..नको..नको ..मला उंचीची भीती वाटते! नाही..पण ऐकणार कुठे..त्याला उगीच वाटतं...मारून पहावी उडी..काय होईल..उडू शकू.. म्हणून  मागे एकदा मारलेली त्याने उडी!.  दणकन आपटला ना! .आता पुन्हा नको..अनेकदा असं खेचू खेचून मागे आणलंय...बाहेर फिरवून आणलं..  ऐकतो माझं  तसं...पण तरीपण खूप वैतागला तर दरीच्या टोकावर जाईल...एक पाय असा हवेत...मुंग्या येईपर्यंत..झुलवत ठेवेल...पण आता दुसरच सुरु झालंय! .आताशा दरीच्या टोकावर शांत बसण्याची सवय लागलीये...माझं जगणं हराम करून ठेवलय! याच्या  शेवटी फक्त, तो रक्तबंबाळ !गोंधळ घालून थकला की पडून राहणार...पण मला त्याचा त्रास होतो ना? मला अजूनही या शाश्वत आयुष्यात जगायचं ना? मी नाही ना नाकारू शकत हे! तुझ्यासारखा ताळतंत्र सोडून,नियम मोडून धिंगाणा घालू नाही शकत! तुझ्यापायी माझी का फरफट करतोस...त्याला संपण्याचे विचार येतात,घोळत राहतात...जरा शांत झाल्यावर जातात...ते आवाज बंद व्हावेत,त्या नजरांचा त्रास त्या आताल्याला होतात ना...त्याच्यासाठी आता एक छान भिंत बांधणार....त्याला त्याची छान एक SPACE देणार..आणि सांगणार बागड रे..मुक्तपणे बागड! ते बाहेरचे आहेत ना,सोड त्यांना...ही आपल्या दोघांचीच जागा...इथे कोणीही येणार नाही..इथे मारामारी करू,रडू,गप्पा मारू..खूप वाचू...इथे कुणाला म्हणून कुणाला येऊन द्यायचं नाही...आपली SECRET जागा..भीती कशाची वाटते...छे...कशाचीही नाही!