Saturday 28 December 2013

राजकारण- आम आदमीच्या (समजुतीच्या) पलिकडेचं!!

            
                आम आदमीपक्षाविषयी लिहिलं तो एक राजकारणाचा Emotional भाग होता..आपल्या देशात मतदार असाचं विचारकरतात...जेव्हा सरकार विरोधात प्रचंड राग आणि चीड असते...आणि अशावेळी जर कोणी छोटीशी पण दाखवली..तर लोकं त्यांना मतदान करतात...पण राजकारणाचा एक Practical भाग आहे, ज्यानुसार राजकारण चालतं...

                    दिल्लीत निवडणुकाझाल्या..भाजपाला 31 (अकाली दल 1) , आपला 28, कॉग्रेसला 8, अपक्ष 2 जागा मिळाल्या.

   #भाजपा

-भाजपाने दिल्लीत सत्तास्थापन केली नाही कारण त्यांच्याकडे बहुमत तर नव्हतं पण त्यांना राष्ट्रपती राजवटलागू होऊन, विधानसभा आणि लोकसभा पुन्हा व्हाव्यात असं वाटतं होतं
-कारण दिल्लीतविधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकं म्हणतं होती..."विधानसभा के लिए अरविंद और लोकसभा के लिए मोदी!"
-कोणाला मानायचं नसलं तरी नरेंद्र मोदी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे..जो तरूणाईला, मध्यमवर्गीयांना,कॉग्रेसविरोधात प्रचंड राग असलेल्या जनतेत आहे....जर दिल्लीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर सगळ्यात जास्त फायदा भाजपाला होईल.
-त्याहून महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्ष दिल्लीतचं अडकून पडेल...आम आदमी पक्षाकडे कार्यकर्ते नाहीआहेत..या पक्षाचा एकचं चेहरा आहे, अरविंद केजरीवाल...जर केजरीवाल हे दिल्लीतल्या दोन निवडणुकांमध्ये गुंतले तर आम आदमी पक्ष दिल्लीबाहेर जास्त ताकद लावू शकणार नाही, मर्यादा येतील त्यांच्यावर!

#आम आदमी पक्षाविषयी

-आम आदमी पक्षविरोधी पक्षात बसायला तयार होता..त्यांना आपल्याला सत्ता स्थापन करावी लागेलं असं वाटलचं नाही...पण कॉग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची अडचण झाली.
-सत्ता स्थापन केलीनाही तर लोकंच दोष देणारं...संधी मिळून पण जबाबदारी टाळली...आणि कॉग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली तर दोष..म्हणून जनसभा करून त्यांनी हे दाखवलं दिल्लीची जनता सांगतेय म्हणून आम्ही सत्ता स्थापन करतोय.
-पण हे करताना आम आदमी पक्षाने हे स्पष्ट केलं की आम्ही कोणाचाही पाठिंबा घेतला नाही..तीन जानेवारीला विश्वासमत सिध्द करताना ज्यांना पाठिंबा द्यायचाय त्यांनी द्यावा..
-आम आदमी पक्ष तीनजानेवारी पर्यंत सात दिवस सरकार स्थापन करण्याच्या हिशोबानं आलयं...जर टिकलं तर त्यांना दोन महिने मिळतात.(फेब्रुवारी पर्यंत लोकसभा निवडणुक जाहीर होईल, Code of Conduct लागल्यावर कोणतेही निर्णय होत नाही)  या दरम्यानं लोकांसाठी काही  मोठे निर्णय घेऊन आपण करून दाखवलं हे सांगत  लोकसभा निवडणुकीला सामोरं जाता येईलं.

-जर तीन जानेवारीला सरकार पडलं तरी लोकांचा पुन्हा emotional पाठिंबा मिळेल, "अरे इन्होंने कोशिश तो की...दुसरीपार्टीयों ने सरकार चलने नहीं दी.." .त्यामुळे आपचं सरकार चालण ही आप पेक्षा दुसऱ्यापक्षांवर जबाबदारी जास्त आहे...कारण हे सरकार पाडल्याचं पातकं कुणालाही नकोय..
-आपने दिल्लीत सरकार स्थापन केल्यामुळे दिल्लीबाहेर हा पक्ष वाढायला, त्यांना मदत होतेय...राजकारणात असाही बदल घडू शकतो  दाखवल्यामुळे आपकडे अनेक तरूण, सुशिक्षित वळतं आहेत..आपची सध्या वेगवेगळ्या राज्यात कार्यकर्ता नोंदणी सुरू आहे..त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय..लोकसभा निवडणुकीसाठी  किमान आपकडे दिल्लीबाहेर कार्यकर्ते तरी वाढत आहेत ...जे आता कमी आहेत..


    #आता सगळ्यातमहत्त्वाचं म्हणजे कॉग्रेस

-कॉग्रेस हासत्ताधाऱ्यांचा पक्ष आहे...हे उगीचं कोणी म्हणतं नाही...कॉग्रेसला नुसत्या निवडणुकाचं जिंकता येत नाही...तर विरोधकांना सत्ता स्थापण्यापासून अडवता ही येतं..चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये सडकून मार खाल्यावर कॉग्रेसने किमान दिल्लीत भाजपाला सत्ता स्थापन करू दिली नाही.. म्हणून त्यांनी आपला पाठिंबा देत पुढे केलं..
-नितीन गडकरी काल जे म्हणाले त्यात तथ्य आहे...कॉग्रेसला या गोष्टीची पुरेपूरं कल्पना आहे की २०१४ च्यालोकसभा निवडणुकीत त्यांचं पानिपत होतं आहे....पण ही सत्ता काहीही झालं तरी नरेंद्र मोदींच्या हातात त्यांना जाऊ द्यायची नाही....त्यासाठी जे जमेल ते करायचंय!! ( नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये बारा वर्ष  जितका त्रास कॉग्रेसने दिलाय, त्याची परतफेड करण्याची एकही संधी कॉग्रेसला त्यांना द्यायची नाही! )
-कॉग्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना ताकद देतंय...जसं बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांना ते जवळ करणार आहेत..(लालू तुरूंगातून बाहेर येताचं नरेंद्रमोंदीच्या विरोधात बोलले)..उत्तर प्रदेशात मायावतींना ते जवळ करतील...ज्या ज्या राज्यांमध्ये जमेल तिथे ते मोदींच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करतील....
-२००९ लोकसभाच्यावेळी मुंबईत लोकांनी Emotional  होऊन मनसेला भरभरून मत दिली...याचा फायदा झाला कॉग्रेसला...त्यांचे खासदार निवडून आले...असाच फायदा कॉग्रेसला आपचा शहरी भागात  करून घ्यायचा आहे.
- आपला दिल्लीत तरूणांनी, पहिल्यांदा मतदान करणारे, मध्यमवर्गीय, सुशिक्षित,सोशल नेटवर्किंगचा प्रभावअसलेल्या मतदारांनी मत दिली...ही नरेंद्र मोदींची VOTE BANK आहे...आप आता ज्या ज्याशहरांमध्ये-राज्यांमध्ये जाईल तिथं ते कॉग्रेस विरोधातील पण नरेंद्र मोंदींनाअपेक्षित असलेली मतं घेतील..आणि कॉग्रेसचा फायदा होईल, असं कॉग्रेसला वाटतय....त्यामुळे आप जितकी मजबूत तितका कॉग्रेसचा फायदा

           सध्या विविध राजकीयपक्षात, ज्येष्ठ पत्रकारांमध्ये ज्या चर्चा चालू आहेत, त्यातून आलेले मुद्दे आणि मला जे दिसतयं, कळतयं ते इथे मांडण्याचा प्रयत्न आहे..हे चित्र दुसर्यांच्या नजरेतून वेगळही असेल...पण राजकारण हा अतिशय Interesting Game आहे...मतदार हा Emotional असल्यामुळे  त्याला कोणीभाबडी आशा दाखवली की तो त्याला मत देतो...पण त्याला हे समजतं नाही की त्यानेज्याला मत दिलं त्याचा खरा फायदा होतोयं कुणाला...आणि राजकीय पक्ष अशीच रणनीतीआखतं असतात...

'आम आदमी' की खास सरकार!!

          
            दिल्लीत आल्यावर सगळ्यात मोठी story कोणती cover केली असेल तरी ती अण्णांच जनलोकपालचं आंदोलन...या आंदोलनाच्या वेळी पत्रकार परिषदेत साध्या वेशात एक माणूस होता..त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून बाईट घेण्याचा प्रश्न नव्हता..अण्णाच्या पत्रकार परिषदेत अण्णा, किरण बेदी, मग प्रशांत भूषण दिल्लीचे वकील,ओळखीचा चेहरा..पण हा एक माणूस होता,त्याच्याकडे आम्ही आंदोलन कसं असेल, काय करणार याची माहिती घ्यायचो...जंतर मंतर दररोज अण्णाचे वन टू वन शक्य नव्हते..त्या साधा माणसाला जाऊन सांगितल..दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ ठरवा आणि प्रेस कॉन्फरन्स घ्या...त्याने चक्क ऐकलं...तो साधा माणूस अरविंद केजरीवाल...अरविंद केजरीवालांबरोबर पक्ष स्थापनेच्या दिवशी ते काही महिन्याआधी दिल्लीच्या रस्त्यावर बसून आंदोलन करताना बातम्या केल्या...पण तेव्हा जाणवलं नाही, ते पुढे जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री होतील...
                                                                                                                                                                              आज पुन्हा त्याचं रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम होती आणि पुन्हा तेचं आम्ही...ते व्यासपीठावर आले तेव्हा एकचं विचार मनात आला...अरे हा तर आपल्यातला माणूस होता...आज हा मुख्यमंत्री झाला...जंतर मंतरवरून राजकारणात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला...आणि आज त्यांनी राजकारण बदलू शकतं, हे उदाहरणासह दाखवून दिलं.. आम आदमी पक्षाविषयी आताचं जास्त आस्था नाही वाटतं मला...कारण मनसे असेल, अण्णांच आंदोलन असेल...दर वेळी वाटायचं काही होईल,ही लोकं आपल्याला निराश करणार नाहीत...पण वेळेनुसार अंदाज चुकले,अनुभव वेगळे आले आहेत...त्यामुळे आता पटकन विश्वास ते ही राजकीय पक्षावर...जरा कठीण आहे. 

           पण असं असलं तरी अरविंद केजरीवालांना एका गोष्टीसाठी मी मानते...त्या माणसानं राजकारणात उतरायचं ठरवल...एका वर्षात दिल्लीत पक्ष छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत नेला...राजकारणात एखाद्याचं मूल्यांकन हे निवडणुकातील निकालांनुसार ठरतं...आणि राजकीय पक्ष जात,धर्म आणि काय काय बघून मतदारसंघात उमेदवार उभे करतात.. अरविंद केजरीवाल स्वत हरियाणाचे ..निवडणुक लढवायची, सत्ताधार्यांना आव्हानं द्यायचं तर त्यांनी शीला दिक्षीत यांच्या विरोधात निवडणुक लढवली...आणि पंधरा वर्षात जी भाजपा शीला दीक्षितांना हरवू शकली नाही...त्यांना अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत हरवून दाखवल...हिंमत्त म्हणतात ती ही...अरे एकदा भिडायचं ठरवलं ना तर सरळ भिडायचं...आज अनेक नेते आपला आपला सुरक्षित मतदारसंघ निवडतात...त्यात आव्हान काय? 

        महाराष्ट्रात असे कोणते विरोधी पक्षातले नेते तुम्हांला दिसतात जे अजित पवारांना आव्हान देऊ शकतात?? ( इथे मुख्यमंत्री म्हणतं नाही कारण ते स्वत विधान परिषदेवर निवडून आले आहेत..) शिवसेना आणि मनसे अध्यक्ष अजित पवारांचं आव्हानं स्वीकारतील?...समोरासमोर निवडणुक लढवतील...?? अरविंद केजरीवाल झोपडपट्टीत गेले,छोट्यातल्या छोट्या माणसाशी बोलले...रस्तावर बसून आंदोलन केली...दिल्लीतील VVIP भाग -पंतप्रधानाच्या घराबाहेर संपूर्ण दिवस ठिय्या आंदोलन केले...पोलिसांनी फरफटत नेलं...असा माणूस पाहून मला पण वाटतं...नेता असावा तर असा...आज ते मेट्रोमधून आले शपथ घेण्यासाठी...मुंबईतील एक आमदार,खासदार, नेता मुंबई लोकलमध्ये प्रवास करेल.??..रस्त्यावर बसून आंदोलन करेल??...आदर्श प्रकरणावरून मुख्यंत्र्यांना विरोध करण्यासाठी वर्षा आणि मंत्रालयाबाहेर आंदोलन करतील??...सामान्य मुंबईकरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील??....या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला नाही मिळतात...खूप त्रास होतो....ही मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणारे, मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरणारे यांना काय माहितं एका छोट्या संधीसाठी सामान्य माणूस किती तडफडतो...निवडून आल्यावर यांची भाषा बदलते..अहंकार येतो...कसला अहंकार हा...हे त्यांनाचं ठाऊक..!! 

           रामलीलामध्ये आज 'जन गण मन'गाताना...खूप भरून आलं.. जंतर मंतर-रामलीलाच्या खूप आठवणी दाटून आल्या...एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटल...अण्णांना किमान लोकपाल मिळालं आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले..पण त्याचवेळी इतकीचं आशा वाटतं होती...आपल्या देशांचं,महाराष्ट्रातलं चित्रं पण बदलेलं असंच कधी तरी...आपल्यातला माणूस पण कधी तरी बनेल पंतप्रधान -मुख्यमंत्री...अरविंद केजरीवाल हा आशावाद देण्यासाठी Thank You आणि खूप खूप शुभेच्छा... 

Sunday 1 December 2013

दिल्लीतील मनसे-आम आदमी पक्ष ?

             
              दिल्ली विधानसभा निवडणुकी इतकी चुरशीची निवडणुक सध्या कुठलीचं नाही...कॉग्रेसविरोधात नाराजी, भाजपाचं चाचपडण आणि आम आदमी पार्टीचं या दोघांनाही आव्हान..
   खूप वर्षापासून दिल्लीत राहणारे ज्येष्ठ पत्रकारांशी बोलल्यावर ते सांगतात, दिल्लीत आधी राजकारण पंजाबी मतदारांवर अवलंबून होत...पण गेल्या वीस वर्षात उत्तर प्रदेश आणि बिहारची लोकसंख्या वाढली..याचा फायदा कॉग्रेसने घेतला..शीला दीक्षित या माहेरच्या पंजाबी, लग्नानंतर यूपीचे नेते उमाकांत दीक्षित यांची सून..त्यामुळे त्यांनी पंधरा वर्ष सत्ता गाजवली..

           पण आता या निवडणुकीत मात्र शीला दीक्षित यांना सगळचं कठीण दिसतयं...तसं बघितलं तर शीला दीक्षित यांना वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री म्हणून आजही लोकप्रियता आहे..पण यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजीचा सगळ्यात जास्त फटका त्यांना बसलाय..राहुल गांधीच्या सभा,याचं उदाहरण..

            कॉग्रेसविरोधात जर इतकं मत असलं तरी त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतं नाहीये..कारण आम आदमी पक्ष!!!
भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून जे काही मतभेद होते, ते सगळ्यांनाच दिसलं..पण आम आदमी पक्षाने प्रचारापासून,ते जाहीरनामा घोषित करण्यापर्यंत कधीचं आघाडी घेतली होती.. असं असलं तरी अण्णा हजारे यांच्या पत्रानंतर आणि 'आप'च्या उमेदवारांच्या स्टींग ऑपरेशन नंतर मात्र मतदार ही साशंक झाले आहेत..याचा फटका आम आदमी पक्षाला नक्कीचं बसलाय.

दिल्लीत आम आदमी पक्षाविषयी जितकं आकर्षण आहे,तितकचं आकर्षण लोकांना नरेंद्र मोदींचही आहे..मत कोणाला देणार याचं उत्तर केजरीवाल किंवा नरेंद्र मोदी हेचं येत...हे खूपचं विचित्र आहे..

             सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेले अरविंद केजरीवाल आणि चहा विकून,मेहनत करून इथंवर पोहचलेले नरेंद्र मोदी यांच्याविषयी तरूणांमध्ये आकर्षण तर आहेच..पण इतरांमध्येही आहे..यावेळी पहिल्यांदा मतदान करणार्या तरूणांची संख्या जास्त आहे( त्यातील किती जण खरचं मतदान करणार, हा वेगळा प्रश्न आहे)

           आम आदमी पक्षाविषयी विरोधक मुद्दा मांडतात, आमच्यापेक्षा ते वेगळ कसे...आम्ही ज्यांना तिकीट नाकारली..त्यांनीचं त्यांनी तिकीट दिली..त्यात राजकीय विश्लेषक म्हणतं आहेत,ज्या मतदारसंघात आम आदमी पक्षाचा उमेदवार खास नाही,तिथं ती मत भाजपाला जातील.

            आम आदमी पक्षाचीं मदार पण अरविंद केजरीवाल या एकाच नेत्यावर आहे...जशी मनसेची राज ठाकरेंवर
एकचं नेता प्रसिध्द,ज्याची जनमानसात ओळख आहे,ज्याला लोक ऐकतात,प्रतिसाद देतात...दुसऱ्या फळीत नेतृत्त्व कुठे आहे ..आम आदमी पक्षातील कार्यकर्ते मात्र सगळेचं तरूण असल्यानं उत्साह दांडगा आहे..सोशल मीडियावर भाजपा इतकेचं ते ही आक्रमक आहेत..अरविंद केजरीवाल यांचे रेकोर्डेड संदेश मोबाईल वर येतात...

             दिल्लीच्या एफएम वाहिन्यांवर तर सध्या राजकीय नेत्यांचेच संदेश येतात..एका ब्रेकमध्ये अरविंद केजरीवाल,नरेंद्र मोदी,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,शीला दीक्षित सगळेचं येऊन मत मागून जातात...असं असताना मतदार गोंधळणार नाही तर काय?

         तर एकूणच या निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती मत पडतात किंवा त्या मतांमधून किती जागा मिळतात हेचं खूप महत्त्वाचं आहे...पण आम आदमी पक्ष हा दिल्लीतील मनसे होण्याची शक्यता जास्त आहे..

 आज ड्राईव्हरने मला जाता जाता प्रश्न विचारला, "मॅडम confuse हूं".. म्हटलं "क्या हुवा?"..तो म्हणाला, "किसको वोट दूं , अभी तक डिसाईड नहीं किया"...विचारलं.. " Option क्या है?"  तर  म्हणाला, "आप (आम आदमी पक्ष) और बीजेपी!"

                    अशीचं अवस्था अनेकांची आहे...आता मतं कोणाला जातयं याचं उत्तरं आठ डिसेंबरला मिळेल...

Saturday 31 August 2013

बलात्कार ,भोंदू बाबा आणि ती!

                   ती एका सामान्य घरात जन्मलेली..आई-वडिल सुशिक्षित,आपल्या मुलांनी त्यांच्या आवडीचं शिक्षणं घ्यावंयासाठी प्रोत्साहन देणारे..अगदी मुलांनी धार्मिक आस्था किती पाळाव्या,कशा पाळाव्याइतकं स्वातंत्र्य तिला त्या घरात मिळालं..अध्यात्माची आवड होती..देव या संकल्पनेविषयी,फोर्सविषयी जाणून घेण्याची इच्छा तिला होती. कुटूंबातील ओळखीच्यांकडून एका अध्यात्मिकगुरूंची ओळख झाली.कठोर साधना करणारे अशी त्यांची ओळख..त्या गुरूंना भेटल्यावर तिला स्वत:ला जाणवलं ,की हे इतरं भोंदू बाबांसारखे नाहीत..त्यांची अध्यात्मिक बैठकआहे..त्यामुळे जमेल तेव्हा ती त्यांना भेटायची..मानसिक शांती,देव, आत्मा या अशा अनेक विषयांविषयी समजून घेण्यासाठी..
                हे अध्यात्मिक गुरू साधना करून एक पत्र लिहायचे आणि त्या पत्रात पुढील एका वर्षात येणाऱ्या त्यांच्या आसपास असणाऱ्या साधकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांविषयी लिहायचें...आणि अनेक साधक नेहमी सांगायचे, बाबाजी लिहीतात ते खरचं घडलयं...तिचा त्यावर विश्वास बसला नाही,आध्यात्मिक गुरूंच्या या गोष्टींकडे तिने जरा दुर्लक्षचं केलं.
        पण एकदा तिला अचानक त्या गुरूच्या एका साधकाचा फोन आलसला..बाबाजींच्या पत्रात तुझं नाव आलयं..तुला भेटायला बोलवलयं.तिला जरा आश्चर्यचं वाटल.मी त्या गुरूंच्या खास जवळची साधक नाही,नेहमी त्यांना भेटणं-बोलणं व्हायचं नाही...परिचयं झाल्यापासून अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या भेटी झाल्या असतील..घरच्यांना सांगितल्यावर ते म्हणाले जाऊन भेटून ये,भेटण्यात काही प्रॉब्लेम नाही..तीही ऑफिसमधून हाफ डे घेऊन तत्काळ निघाली. बसने  चार-पाच तास प्रवास करतं ती साधकाने सांगितलेल्या पत्त्यावर पोहचली.पूर्ण प्रवासात ती हाच विचार करत होती..काय लिहिलं असेल पत्रात, बाबाजींनी इतक्या पटकनं का बोलवून  घेतलं.माझा काय संबंध..
              बाबाजींकडे पोहचल्यावर त्यांनी तिला बसवून समजवलं, पत्रात कसं तिचं नाव आलयं, पण काय लिहिलयंहे सांगण्याआधी तिची खात्री पटावी म्हणून त्यांनी तिला सांगितलं, आधी तू तुझी काहीमाहिती एका कागदावर लिही, जसं की तुझ्या जवळच्या मित्रमंडळीची नाव,आवडतं फळ, आवडतंपुस्तकं...आणि तू लिहिलेली माहिती मी तशीचं सांगितली तर हे गुप्त पत्रवाचशील..तिने आपल्या Friendsची नावं लिहिलं..आवडती फळं,पुस्तक लिहीली..आणि आश्चर्याचाधक्का की त्या बाबाजींनी तिने लिहिलेली माहिती अचूक सांगितली..तिचा विश्वास बसायला  लागला..
              यापुढे त्या बाबाजींनी जे पत्र वाचलं ते ऐकून ती कोसळलीचं ..बाबांजीच्या भविष्यानुसार पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तिच्यावर बलात्कार होणार असल्याचं त्या पत्रात लिहिलं होतं...ती ज्या मित्रांवर विश्वास ठेवतं ,त्यातील कोणी फसवेल,तिच्यावर बलात्कार होईल आणि ती लोक तिच्या आई-वडिलांकडून पैसेही मागितली..आणि यात आई-वडिल कोणाला शॉक लागून मृत्यू ही होईल...यापुढे जाऊन पत्रात लिहिलं होतं..पूजा-शांती करून घटना टाळता येऊ शकते..पण सदर व्यक्ती या गोष्टी मानतं नसल्यामुळे,हट्टी असल्यामुळे तिच्यासोबत हे कुकर्म होण्याची शक्यता आहे...त्याक्षणी तिला हे सगळं तंतोतंत आपल्याविषयी असल्याची पूर्ण खात्री पटली...ती धडं रडूही शकतं नव्हती..काही समजतं ही नव्हतं..बाबाजींनी सांगितलं, आपण आजचं पूजा करूया,ती गोंधळात..पुढे ते म्हणाले, पूजेसाठी पाच लाख रूपये लागतील...हे ऐकल्यावर तिच्या डोक्यात तिडीक गेली..डोळ्यासमोर आयुष्यभर मेहनत करणारे आई-वडिल आठवले,ज्यांनी खूप कष्ट घेत,कर्ज काढून आपल्याला शिकवलं, चांगल घरं,सर्व सुखसोयी दिल्या..हे पैसे कुठून आणायचे,का आणायचे, आई-वडिलांनी का द्यायचे...त्याक्षणी इतकचं समजतं होतं, हे जे काही होतयं ते चुकीचं आहे..                           पाच लाखाची कोणती पूजा बलात्कार थांबवणार..कोणत्याही मुलीला तिच्यावर  बलात्कार होईल ,यासारखी वाईट भीती घालण्यासारखी नाही...पण असं कोणी सांगत असतानाही तिने बाबाजीला स्पष्ट सांगितलं..की ती ही पूजाकरणार नाही. तिने पटकनं आई-वडिलांना फोन केला...त्यांना सगळं सांगितलं...पाच लाखांची पूजा घालायची नाही,हे ही सांगितलं..त्यांनी तिला धीर दिला...तिला शांत व्हायला सांगितलं...तिच्या आई-वडिलांनीही तिला तिचा निर्णय योग्य असल्याचा विश्वास दिला आणि परतं यायला सांगितल..
              संपूर्ण रात्र तळमळत,रडतं तिने काढली...ती तिथून कोणालाही काहीही न सांगता पळून गेली..पहाटेच्या बसने घरी आली...आणि ती स्वत विचार करत होती..तिचे सगळे मित्र स्वभावाने चांगले आहेत... कोणीचं रात्रीउशीरापर्यंत बाहेर फिरत नाही,सगळे एकमेकांची काळजी घेतात..
           या घटनेनंतर नाही म्हटलं तरी तिचे आई वडिल पुढचं एक वर्ष तिला घरी यायला उशीर झाला की फोन करायचे,काळजी करायचे...ती पण या भीतीत कुठे जाणं टाळू लागली..आयुष्यात कधी नव्हे, तिनं गुढीपाडव्याची वाट पाहिली,प्रत्येक दिवसं मोजला...तिच्याबाबतं काहीचं असं झालं नाही...पण हे सगळं झाल्यावरं तिच्या लक्षात आलं आपणचं आपल्या प्रश्नांची उत्तर शोधली पाहिजे,  आपणचं गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजे, कोणावरही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही...यापुढे आयुष्यात कुणाच्याही भीतीनं जगायचं नाही...
          आसपास आज इतकी बलात्काराची प्रकरण होतं असताना तिला असं वाटतं, तिच्यावर बलात्कार होईल या भीतीतं कधी काळी तिने –तिच्या कुटुंबियांनीएक वर्ष काढलं...मग ज्या मुलीवर खरंच बलात्कार झाला,तिला काय वाटतं असेल..तिच्या आई-वडिलांची काय अवस्था असेल...
        आस्थेच्या नावावर तिच्यासारखे अनेक लोकं ,काही कारणाने अध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात येतात..पण यागुरूंचं वागणं, पैसे कमवण्याची वृत्ती आणि त्यासाठी समोरच्याला टोकाची घालणारी भीती-ही घाणेरडी वृत्ती  यामुळे तिने एका क्षणात विश्वास करण्याची ताकद गमावली....आज जिथे माणूस स्वतच्या नातेवाईकांवर विश्वास ठेवत नाही,तिथे तो या असल्या भोंदू बाबांवर सरसकट विश्वास ठेवतो..का??..अनेक भोंदू बाबांची दुकानं जोरात चालली आहेत, त्यांच्याविरोधात प्रकरण येऊनही सुशिक्षित लोकं,राजकारणी यांना पाठिंबा देतात, पोलिस संरक्षण देतात हे पाहून ती उद्विग्न होते...डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणून तिला हवे होते...पण कदाचित आता सगळचं  सावरण्यापलिकडे गेलयं...ती स्वता:पुरतं झगडतं आहे.. पण समाज कधीचं आंधळा झालायं.

Monday 3 June 2013

तुरतूक -भारताच्या वेशीवरच शेवटच गावं

                                   1971 च्या भारत पाकिस्तानच्या  युद्धात Ladakh scoutsचे  Major Chewang Rinchen यांनी पाकिस्तानच्या बल्तीस्थानातील चार गाव ताब्यात  घेतली ….  Chaulankha, Turtuk, Tasky and Thang. मग ही  गाव भारताची झाली यातील तुरतूक  हे गाव भारताच्या वेशीवरच शेवटच गाव आहे! कारण  या पुढे Tasky and Thang जी दोन गाव आहेत त्या गावांमध्ये मध्ये भारतीय सैन्याचा तळ असल्यामुळे तिथे कुणालाही जाण्यची परवानगी  नाही … पण  तुरतूक  गावामध्ये २ ० १ ०  पासून जाण्याची परवानगी भारत सरकारने दिली. त्यामुळे या गावात आता पर्यटक येऊ लागले आहेत . त्यासाठी स्थानिक पोलिसांकडे फक्त  आपली ओळखपत्र द्यावी लागतात. या गावात  अगदी कामासाठी बाहेरून कामगार ही  गेले तरी त्यांची नोंद पोलिसांकडे होते .
                          तुरतुक  हा शब्द आला 'डुकडूक'  या शब्दातून … डुकडूक  म्हणजे चलो बैठते है … येथील स्थानिक अशी कहाणी सांगतात , तुर्किश लोक या गावात सर्वात आधी आले. . त्यांनी  ठरवलं या गावात आराम करूया… आणि  या गावाचं  नाव डुकडूक  शब्दावरून तुरतूक झालं। हे गाव  पर्यंत पाकिस्ताना मध्ये होत…  गावातील जुनी लोक  आजही सांगतात ,आम्ही झोपलेलो पाकिस्ताना मध्ये , पण  सकाळी उठलो तर भारतात होतो. आजही या गावातील अनेकांचे नातेवाईक पाकिस्तान मध्ये आहेत .
                  भारतात  हे गाव आल्यावर  जी नवीन पिढी आहे , ते म्हणतात  इथे आल्यावर या गावाची प्रगती झाली. कारण भारतात आल्यावर आम्हाला शिक्षण , रस्ते, वीज या सोयीसुविधा मिळाल्याच  स्थानिकांच  म्हणणं  आहे . रशीद उल्लाह खान या एकवीस वर्षीय  तरुणाने सांगितलं , आमचे आजी आजोबा सांगतात …की  पाकिस्तान मध्ये ते असताना गाव दुर्लक्षित होतं . त्या देशातही हे गाव शेवटचं होतं… रस्ते, वीज, शिक्षणा सारख्या सुविधा नव्हत्या . पण भारतात आम्हाला रस्ते शिक्षण मिळाल. तुरतूक गावात आता पाच शाळा आहेत .  1999च्या कारगिल युद्धाची झळ  या गावालाही बसली . त्यानंतर या गावातील तरुण सैन्यामध्ये ही भरती झाले .
             या गावातली लोकसंख्या मोजून २ ५ ० ० आहे …  शेती आणि भारतीय सैन्याला आवश्यक असलेलं मनुष्यबळ पुरवणे हे या गावाच उपजीविकेच साधन आहे. पर्यटनाला या गावात २ ० १ ० पासून   सुरुवात  जरी झाली असली तरी   गावात आजही १० टक्के लोक पर्यटनाच्या व्यवसाय करत आहे . त्यातही वर्षातून फक्त तीन महिने पर्यटनाचा सीझन असतो . त्यामुळे लोक शेती वर जास्त अवलंबून असतात . तुरतूक गावात अंड्यापासून ते सिमेंट पर्यंत गोष्टी लेह मधून येतात … लेह या गावापासून २ २ ० किमी अंतरावर आहे . या गावातून लेह ला जाण्यासाठी खारदुंग ला पास  वरून जाव लागतं … जो रस्ता १ ८ हजार ft वर आहे
इथल्या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण ही  आपल्यापेक्षा वेगळी आहे . हे याचं मिश्रण आहे त्यांचे डोळे छोटे पण नाक मात्र मोठं.   इथे लोक  बल्ती भाषा बोलतात.  ही  भाषा फक्त बोलता  येते.   लिहिता  किंवा वाचता येत नाही कारण या भाषेची विशेष अशी  लिपी नाही. 
              तुरतूक गावात आजही  संध्याकाळी 7.30 ते रात्री 11 फक्त इतके तास वीज येते. आणि तरीही इथली लोक तक्रार करत नाहीत … कारण त्यांना आता सवय झालीये.  वर्षातले तीन महिने बर्फामुळे इथे शाळांना सुट्टी असते. जनजीवन  तेव्हा ठप्प असतं . या तीन महिन्यात लागणारं अन्नधान्य - सामान सगळं लोक natural fridge मध्ये जपून ठेवतात . लवकरच  इथे  वीज प्रकल्प उभा राहणार आहे .
             या गावातील ८ ० टक्के  लोक आजही या गावाबाहेर गेलेली नाहीत . गावाबाहेरच जग त्यांना माहित नाही . इथे सिनेमा हॉल  नसल्यामुळे प्रत्येक आठवड्याला येणारे नवीन movies माहित नाही .  TV वर लागणारे चित्रपट लोक पाहतात .  या गावातील अनेक मुलं  पदवीच्या शिक्षणासाठी गावाबाहेर जातात … तसाच  रशीद उल्लाह  खान-हा  एकवीस वर्षीय तरुण गेली ६ वर्ष शिक्षणासाठी बंगळूरू  या शहरात  आहे … त्याला कन्नड भाषा समजते। तो कन्नड भाषेत थोड थोड बोलतोही … कॉलेजला सुट्टी लागली कि तो गावात परत येतो आणि आपल्या कुटुंबियांना शेतात , कामात मदत करतो ऱशिद्च्य मामाच्या तंबू मध्ये आम्ही थांबलो होतो .  तेव्हा गावात फिरवून आणणं , गावाची माहिती देणं , हे सगळं  त्यानेच केलं . तो सांगतो पर्यटकांमुळे गावातल्या लोकांना बाहेरच्या जगाची झलक मिळते. इथल्या  लोकांना सगळेच पर्यटक परदेशी वाटतात.  रशीद सांगतो , आधी मी गावात English, Hindi मध्ये बोललो की  इतर लोक हसायचे , पण आता मात्र तरुण ही  भाषा  शिकतात,त्यांना जाणवलं ही  भाषा शिकणं  गरजेच आहे .
          या गावात आम्हांला  मोबाईल  नेटवर्क नव्हतं … इंटरनेट  तर अजून लांबची गोष्ट … इथे लोकांना Facebook, Twitter काहीच माहित नाही … जगापासून लांब , आपल्याचं कोशात जगणारी ही  तुरतूक गावातील लोक वेगळीच … आपल्याला पाहून लाजतात … कॅमेरा पाहून लपतात … काहीजण कुतूहलाने जवळ  येऊन  बोलतात … पण आपल्याच देशाचे हे बांधव आपल्यापासून इतके वेगळे आणि अपरिचित !

 

Monday 22 April 2013

व्यवस्थेची अवस्था आणि अस्वस्थता

                          घडतात …काही घटना घडतात …तश्या  त्या नवीन नसतात ….पण दरवेळी क्रूरतेची वाढत जाणारी पातळी माणूस  म्हणून हादरवून टाकणाऱ्या गोष्टी … अस्वस्थ होतो …  स्वतः जवळून हे पाहताना जाणवतं …किती बदलत चालल्या आहेत गोष्टी… कुठे चाललोय …हे थांबणार आहे का? कोण थांबवणार?  का कुणाला काहीच वाटत नाही … चिडतो _पेटून उठतो … मागच्या वेळी असेच चिडलेलो, काही   झालं  नव्हतं त्यावेळी …हे माहित असून…. मनं आहे ना …ते काही विचार करत नाही … मेंदू म्हणतो । शांत राहून विचार कर … व्यवस्था जर अशी आहे … तर गोष्टी अशाचं घडणारं … पण मनं मानत  नाही …त्याच्या समोर  दुट्टपी - स्वार्थी  लोकांचा नंगा नाच असतो… चिमुरडीला चिरडू  देणारा हा कुठला समाज? ज्या व्यवस्थेत निष्पाप छोट्यांना पण   हवे तसं जगून देत नाही … ती  काय व्यवस्था? नाही …  शांत नाही व्हायचं…गप्प नाही बसायचं … बोलायचं … लिहायचं  …टीकेचं  आसूड  उठले पाहिजे … 
                              व्यवस्था कशी असली पाहिजे- काय आहे …सगळे जण  घराच्या चार सुरक्षित भिंतीत बसून सल्ले देतात…  काय  व्हायला पाहिजे - पण  काय झालं …ह्यात  फरक आहे …. ह्या सर्वात एकाचा बळी  गेला …. आणि कुणाला काही वाटतं नाही …सगळे  ढिम्म  आहेत?    कुणाच्या वासना कधीही जाग्या झाल्या …जेव्हा  हवे तेव्हा काहीही करून मिळाल पाहिजे … अगदी हिसकावून ही …. झाली त्याची  भूक शांत झाली …तिल मारून …। सभ्य समाजाचा थोतरित  मारत त्याने भूक भागवली … प्राणी कसा सावज टिपतो …त्याने  मिळेल त्या संधीत फायदा उठवत …  नाती-संस्कृती-माणुसकी  सगळ्याचा एका फटक्यात खून केला …आणि  सगळे  सांगणार व्यवस्था काय करणार याला?  सुन्न करणार आहे हे … माणूस इतका निब्बर झालाय ? परत कसा ठेवायचा विश्वास? कुणावर ठेवायचा विश्वास?
                               राग शांत होईना …व्यक्त झाले…तर समाजातील संस्कृती रक्षक आले लगेच -आपला झेंडा  उंच मिरवत …. चूक तुमची …मर्यादेत  राहा …हद्दित राहा …. टाळी  एका हाताने वाजत नाही ! वाटल थोबाड फोडावी या दांभिक लोकांची!  तुमच्या  चुकांची किंमत दुसर्याने चुकवावी ? वर्तन कुणाचं चुकलं? कोणत्या संस्कृतीने माणसाला  हिंस्त्र श्वापद सारखं वागायला शिकवला?
                       या वेळी परत  लोक  खरंच उतरले रस्त्यावर … मनातून थोड हायस वाटलं …. आहे … आहे माणुसकी … Hopes सोडायला नको…  तिच्या नावावर आक्रोश वाढत गेला…आणि काही काळानंतर  ते ही  नाटकच  वाटू  लागलं !  तिच्या  नावावर  काही जण  स्वतःला चमकवून  घेऊ  लागले !  Dictonary मधून मोठे मोठे शब्द झाडत काहींनी अश्रू  ढाळले -काहींनी खेद व्यक्त केला …मेणबत्त्या लावायला विसरले  नाही…  जवाबदार नागरिक म्हणून कर्तव्याची इतिपुर्तीच होती ती !
                       हे इथच थांबल नाही … सत्ताधारी पक्षांच्या राज्यात काय झाल-विरोधकांच्या राज्यात पण पहा … आम्ही त्यांच्यापेक्षा बरे… असं  व्यवस्था चालवणार्यांनी   स्वतःलाच प्रशस्तिपत्रक दिलं …. त्यांचे समर्थक ही  ते पत्रक मिरवत आहेत …. व्वा …काय  कर्तृत्व !  ती  तडफडून मरते … जगण्याची इच्छा  असताना…हा सगळा समाज तिला मिळून मारतो ….  पण आम्ही उजळ माथ्याने फिरतोय !